संग्रहालये/ऐतिहासिक स्थळे

न्यू पॅलेस

New Palace ‘कसबा बावडा’ रस्त्यावरील ही प्राचीन इमारत आहे. ही इमारत १८८७ ते १८८४ च्या दरम्यान बांधली. घासून तुळतुळीत केलेल्या काळया दगडात बांधलेली ही इमारत, म्हणजे, वास्तूकलेचा एक उत्कृष्ट नमूना आहे. पर्यटकांचे खास आकर्षण आहे. कुस्तीचे मैदान, कारंजे, सुंदर बगीचे, यांनी न्यू पॅलेसचे आवार सुशोभित आहे. मध्यभागी उंच मनोरा असलेल्या हया इमारतीस आठ कोन आहेत. मनो-यावरील घडयाळ १८८७ साली बसविले आहे. इतर दोन मनोरे निराळया अंतरावर आहेत. प्रत्येक काचेवर शिवरायांच्या जीवनातील प्रसंग चितारले आहेत. इथे प्राणी संग्रहालय व तलाव आहे. आजही ही वास्तू म्हणजे, श्रीमंत शाहू महाराजांचे निवासस्थान आहे.

भाऊसिंगजी मार्गापासून आणखी उत्तरेकडे, १.५ किमी. अंतरावर नवा राजवाडा, किंवा हा न्यू पॅलेस आहे. बॅझाल्ट आणि सँड स्टोन हया विभिन्न प्रकृतीच्या खडकांचा वापर करून, रचनेतील वैधर्म्य तसेच नाविन्य साधून, बांधलेली ही अभिनव इमारत ज्या वर्षी इस्पीतळ बांधून पूर्ण झाले, त्याच वर्षी बांधली. दक्षिणेकडील प्रवेशद्वार किंवा मुखांग हे दुमजली आहे. दुहेरी कक्षाची धाटणी असलेल्या दरवाजाच्या वरच्या बाजूला मंदिर शैलीचे कॉलम्स व ब्रॅकेट्स तर खालच्या बाजूला, नव्य-मुघल शैलीची उतरती (लोब्ड) कमान आहे.

मधूनच उठाव देणाऱ्या, तिपानी आकृतीच्या कमानी, त्यावर बाकदार कार्निस, व छोटे घुमट यांनी हया इमारतीचे सौंदर्य खुलविले आहे. इमारतीच्या कोपऱ्यावरील अष्टकोनी मनोऱ्यांची शोभा याच वैशिष्टयांचा वापर केल्यामुळे वाढते. ठळक, बाकदार कार्निस लावून, मधला द्वारमंडप सजविला आहे. राजवाडयाच्या एका बाजूला ४५ मीटर उंच घडयाळी मनोरा असून, त्याच्या वरील, अष्टकोनी घुमटाकृती मेघडंबरी फार आकर्षक आहे. या न्यू पॅलेसच्या अंतर्भागात, कोल्हापूर संस्थानाच्या शासकांच्या स्मरणार्थ, बनविलेले, ‘शाहाजी छत्रपती संग्रहालय’ आहे. त्याची दालने व मधले मार्ग, हे नाना प्रकारची शस्त्रे, हौदा, तैलचित्र व छायाचित्र यांनी पुरेपूर सजविले आहेत. राजवाडयाच्या मध्यभागी असलेला ‘दरबार हॉल’ हा भव्य आणि दुप्पट उंचीचा आहे. कडेच्या भिंतींलगत असलेल्या काचा, उतरत्या कमानींनी सजविल्या असून त्यावर छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रसंग चितारले आहेत. कोरीव नक्षीकामांनी सजविलेले स्तंभ आणि त्याला जोडलेल्या मंदिराप्रमाणे असणाऱ्या ब्रॅकेटस् यांच्या आधारवर सुंदरशी बीडाची सज्जा तोलली आहे. दरबाराच्या एका टोकाला उंचावर, सिंहासन आहे.

शालीनी महाल

Shalini Palace कोल्हापूर संस्थानच्या राजकन्या श्रीमंत शालीनी राजे यांच्या प्रीत्यर्थ, इ. सन. १९३१-३४ दरम्यान आठ लक्ष रूपये खर्च करून शालीनी महाल बांधला. २.५ मैल व्यासाच्या रंकाळा तलावाच्या पार्श्वभूमीवर, तळयाच्या पश्चिम काठावर सुंदर बागा, उंचच उंच ताडाची झाडे व हिरवाईने हा महाल सुशोभित झाला आहे. महालाच्या बांधकामात काळया दगडामधे कोरलेले नाजूक नक्षीकाम आहे. इटालियन संगमरवराचा नक्षीकामामरिता केलेला उपयोग वाखाणण्यासारखा आहे. महालाचे दरवाजे लाकडाचें असून, त्यात भारी बेल्जियमची काच वापरून, त्या काचेच्या दरवाज्यावर कोल्हापूरच्या महाराजांची प्रतिमा आहे. या सा-यामुळे महालाचे राज-वैभव डोळयात भरते. महालातील भव्य कमानी व सज्जा हया चकाकणा-या काळया उंची प्रतीच्या दगडात बनविल्या आहेत. त्यामुळे महालाची एकंदर ऐट व भव्यता पाहाणा-याचे भान हरपून घेते. काचेचे नक्षीकाम व मनो-यावरचे घडयाळ आपले पारंपरिक वैभव दिमाखाने मिरवत आहेत. पौर्णिमेच्या रात्री महालाचे प्रतिबिंब रंकाळयाच्या संथ व शांत पाण्यात, संध्यामठाच्या बाजूने पाहणे हा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.