गड-किल्ले


अग्रपूजेचा मानकरी – शिवनेरी (जिल्हा पुणे)

Shivneri भीमाशंकराच्या जटात अन् नाणेघाटाच्या ओठात एक बुलंद किल्ला आहे. त्याचे नाव शिवनेरी. १९ फेब्रुवारी १६३० , फाल्गुन वद्य ३, शके १५५२ या दिवशी शहाजी राजे भोसले अन् त्यांच्या लाडक्या राणीसाहेब सकल सौभाग्य संपन्न श्रीमंत जिजाऊसाहेब यांना पुत्ररत्न झाले अन् शिवसूर्याचा उदय झाला. स्वातंत्र्याची मंगल पहाट झाली. शिवनेरी भोवती नाणेघाटातला जीवधन, भैरवगड उर्फ सारंगगड, चावंड उर्फ प्रसन्नगड, हडसर उर्फ पर्वतगड अन् नारायणगड या किल्ल्यांचा वेढाच पडला आहे.

शिवनेरीला कसे जाल?

या किल्ल्याला जायचे तर पुणे किंवा मुंबई येथून जुन्नर या गावी एस.टी. बसने जाता येते. पुण्याहून जुन्नरला पोचायला सुमारे तीन ते साडेतीन तास लागतात. जुन्नरला पोचले की गावापासून सुमारे चार किलोमिटर अंतरावर किल्ला आहे. त्याच्या पायथ्यापर्यंत जायला गावातून रिक्षा मिळू शकते नाहीतर पायीच जावे लागते. किल्ल्यावर रहाण्याची किंवा जेवणाची काहीही सोय नाही. जुन्नर गावात मात्र रहाण्याची व जेवणाची अत्यंत साधी अशी सोय उपलब्ध आहे. Location Icon

शुभशकुनी किल्ला – तोरणा उर्फ प्रचंडगड (जिल्हा पुणे)

Torna गुंजण मावळातला हा बलदंड दुर्ग, पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला. त्याची उंची आहे १४०४ मीटर किंवा ४६०६ फूट. ऐन पायथ्यालगत असणा-या वेल्हा गावापर्यंत पुण्याहून राज्य परिवहनाची बस, बारमाही वाहतूक करते. या डोंगरावर तोरणाची खूप झाडं होती. म्हणून हा तोरणा ! पण पुढे शिवरायांनी तो ताब्यात घेतल्यावर त्याचा प्रचंड विस्तार पाहून त्याचं नाव ठेवलं ‘प्रचंडगड’. याच किल्ल्याची डागडुजी करीत असताना शिवाजीराजांना अमाप भूमीगत धन मिळालं.

तोरण्याला कसे जाल?

तोरण्याला जायचे तर मुंबई किंवा पुण्याहून वेल्ह्याला जावे लागते. वेल्ह्यापर्यंत एस. टी. बसेस आहेत. पुण्याहून तिथे पोचायला साधारणत: दोन ते सव्वादोन तास लागतात. वेल्ह्याहूनच तोरणागडाची डोंगरचढाई सुरू होते. वर रहाणे किंवा जेवण अशा कोणत्याही सोयी नाहीत. Location Icon

क-हे पठाराचा स्वामी – पुरंदर (जि. पुणे)

Purandar दिवेघाटाचा हा संरक्षक दुर्ग इंद्रनील पर्वताच्या माथ्यावर पुरंदर आणि वज्रगड उर्फ रुद्रमाळ हा जोड किल्ला आहे. शिवरायांची पहिली लढाई (खळद-बेलसर) आणि त्यात फत्तेखानाचा झालेला पाडाव, शिवाजीराजे अन् श्रीमंत सईबाईसाहेब यांचे पुत्र संभाजी यांचा जन्म, पुढे मुरार बाजींची दिलेरखानाशी लढाई आणि पुरंदरचा अपमानास्पद तह, बारभाईचे कारस्थान अन् श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचा जन्म अशा अनेक महत्त्वाच्या घटना पुरंदरावर घडल्या.

पुरंदरला कसे जाल?

पुरंदर पुण्यापासून जवळ आहे. पुण्याहून साधारणत: ३४ किलोमिटरवर सासवड गाव आहे. सासवडपर्यंत बस किंवा पी.एम.टी. जाते. सासवडपासून पुढे सहा किलोमिटर अंतरावर पुरंदरचा पायथा आहे व तिथपर्यंत जायला अनधिकृत वाहने मिळतात. पुरंदर किल्ल्यावर एन्.सी.सी.चा कॅंप असल्यामुळे वर जाण्यासाठी तिथेच एन.सी.सी.च्या लोकांची परवानगी काढावी लागते. वरपर्यंत कोणतेही वहान जाऊ शकत नाही व वर रहाण्या-जेवण्याची काहीही सोय नाही. परंतू सासवडला मात्र जेवणे व रहाणे दोन्हीच्या सोयी होऊ शकतात. Location Icon

पुणे प्रांताचा मानबिंदू सिंहगड – उर्फ कोंडाणा (जिल्हा पुणे)

Sinhagad कोंडाणा हा प्राचीन किल्ला शिवरायांच्या ताब्यात खूपच प्रारंभी आला. ‘आधी लगीन कोंडाण्याचे अन् मग रायबाचं’ असं ठरवून आलेला, पोलादी छातीचा नी कणखर मनगटाचा तानाजी मालुसरे इथं यशाचा धनी झाला. नावजी बलकवडे यांनी याच पराक्रमाची पुढे पुनरावृत्ती केली. राजारामांचे देहावसान इथंच घडलं. श्रीमंत नारायणराव पेशव्यांचे लग्न युध्दाच्या धामधुमीत इथेच उरकलं. लोकमान्य टिळकांचं वास्तव्य या प्राचीन किल्ल्यावर अनेक वेळा झालं. भारत सरकारच्या पोस्ट खात्यानं सिंहगडाचे चित्र असणारं एक टपाल तिकीटही काढलं आहे. इथल्या देवटाक्याचं पाणी अन् इथलं ताक- दही – त्यासम तेच! सध्या या गडावर दुरूनही सहज दिसू शकेल असा टी.व्ही.चा मनोरा आहे.

सिंहगडाला कसे जाल?

सिंहगड पुण्याहून फक्त १७ कि.मिटर दूर आहे. पुणे शहरातून आतकरवाडी या सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावापर्यंत पी.एम.टी. बसेस मिळतात. सहा आसनी रिक्षा, साध्या रिक्षा आणि स्वत:च्या कारने किंवा मोटरबाइकनेही सिंहगडापर्यंत जाता येत. गाडीने वरपर्यंत पोचायचे असेल तर आतकरवाडीच्या अलिकडेच गोळेवाडी नावाची छोटी वस्ती आहे . तेथून वरपर्यंत जावयाचा गाडी किंवा मोटरसायकलचा रस्ता आहे. वर रहाण्यासाठी टिळक बंगला, एम.टी.डी.सी. चे हॉटेल वगैरे आहे. जेवणाचीही सोय वर होते. येथील झुणका-भाकर, ताक-दही प्रसिध्द आहे. Location Icon

गडांचा राजा अन् राजांचा गड – राजगड (जि. पुणे)

Rajgad Fort कानंदी अन् गुंजवणी, नीरा अन् वेळवंडी नद्यांच्या विळख्यात एक शिवनिर्मित दुर्ग आहे. उत्तरेकडे कोंडाणा उर्फ सिंहगड, पूर्वेकडे पुरंदर – वज्रगड , दक्षिणेकडे रोहिडा उर्फ विचित्रगड अन् पश्चिमेकडे तोरणा उर्फ प्रचंडगड अन् कांगोरी उर्फ मंगळगड अशा सुरेख कोंदणात हे दुर्गरत्न जडवलेलं आहे. १६४५ ते १६७२ असा अदमासे पंचवीस वर्षांचा कालखंड म्हणजे आपलं निम्मं आयुष्य शिवरायांनी या गडावर घालवलं. त्यांचे धाकटे पुत्र राजाराम यांचा श्रीमंत सोयराबाई साहेबांच्या पोटी याच किल्ल्यावर जन्म झाला.

राजगडाला कसे जाल?

राजगडाला जायचे तर पुणे- वेल्ह्या रस्त्यावर मार्गासनी पर्यंत जाऊन मार्गासनी येथे डावीकडे वळावे. तेथून गुंजवणे, वाजेघर, पालखुर्द आणि भूतोंड अशा चार गावांपासून राजगडावर जाता येते. ही चारही गावे वेगवेगळया दिशेला आहेत. साधारणत: फेब्रुवारी ते जूनपर्यंत वाजेघर व गुंजवणे येथपर्यंत एस.टी. जाते पण पाऊस सुरू झाला की एस.टी. बंद होते. गडावर जेवण्याची किंवा रहाण्याची काहीही सोय नाही. परंतू वेल्ह्याला मात्र रहाण्याची व जेवणाची साधी सोय होते. Location Icon

मावळचा रक्षक – लोहगड (जि. पुणे)

Lohgad Fort पुण्याहून मुंबईला जाताना लोहगड आणि विसापूर ही किल्ल्यांची जोडगोळी रस्त्याच्या डाव्या हाताला म्हणजे दक्षिणेकडे दिसते. मोगलांची सुरत लुटून आणलेली संपत्ती शिवरायांनी प्रथम नेताजी पालकरांच्या हाती लोहगडावर पाठवून दिली. बोरघाटाच्या रस्त्यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त ठरणारा हा पोलादी किल्ला त्याच्या वैशिष्टयपूर्ण दरवाजांसाठी प्रसिध्द आहे. गडाची विंचूकाटा माची आकर्षक आहे.

लोहगडाला कसे जाल?

लोहगडाला जाण्यासाठी पुणे किंवा मुंबई येथून मळवली या गावापर्यंत रेल्वेने जाता येते. मळवलीपासून तीन किलोमिटर अंतरावर भाजे गाव आहे. भाजे येथील लेणी प्रसिध्द आहेत.भाजेगावापासूनच डोंगरचढाई सुरू होते. भाजे गावापर्यंतही कोणतेही अधिकृत वाहन नाही. लोहगडावर जेवण-रहाणे अशी कोणतीही सोय होऊ शकत नाही. मळवली स्टेशनावर मात्र चहा मिळू शकतो. Location Icon