गड-किल्ले


शिवपूर्वकाळातील ‘मनोहर-मनसंतोष’ गड!

Mansantosh Fort घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी चार घाट आहेत. पहिला आंबा, दुसरा बावडा, तिसरा दाजीपुर जंगलातून उतरणा फोंडा आणि सर्वात शेवटी आंबोली. या चारही घाटांचे वैशिष्ट म्हणजे त्यांच्या माथ्यावर किल्ले आहेत. यातील बहुतेक किल्ले हे शिवपूर्व कालखंडातील आहेत. या सर्वांमधील आंबोली घात तर चक्क महादेवगड फोडूनच बनविलेला आहे. याच्या घाटमाथ्यावर नारायणगड तर, पायथ्याशी मनोहर-मनसंतोष गडांसारखे बलदंड किल्ले आहेत. यापैकी नारायणगड हा मुख्य सह्यधारेपासून थोडा सुटलेला आहे. एके काळच्या प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी संस्थानाच्या पूर्व हद्दीवरील हे सारे किल्ले. परंतु फार कमी गिर्यारोहकांचे पाय इकडे वळतात.

मनोहर-मनसंतोष गडावर जाण्यासाठी पेठशिवापूर आणि शिरसिंगेजवळच्या गोथावेवादीतून रस्ता आहे. यातील पेठशिवापुरास जाण्यासाठी सावंतवाडीहुन एस.टी. ची सोय आहे. परंतु या एसटीच्या सेवा दुर्गभटक्यांसाठी उपयोगाच्या नाहीत. सावंतवाडीहुन पेठशिरापुरास मुक्कामाची एक एसटी जाते. या गाडीने रात्रीच गावात दाखल होत सकाळी गड जवळ करता येते. दुसरा मार्ग गोठवेवाडीतून जातो. या गोठवेवाडीसाठी सावंतवाडी-आंबोली रस्त्यावरील शिरसिंगे गावातून वाट जाते. सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये इथला निसर्ग आपल्या सौंदर्याची भुरळ घालणारा असतो. आजूबाजूच्या डोंगरदऱ्यामधून चालताना जलधारांचे प्रपात सतत कानावर पडत असतात. वाडीत पोहोचताच मनोहर आणि मनसंतोष गडाचे मोहक दर्शन घडते. ज्याचा पसारा मोठा तो मनोहरगड तर ज्याचा पसारा कमी तो मनसंतोषगड!

या गाठवेवाडीतूनच एक पायवाट या दोन्ही गडांच्या दिशेने झेपावते. वाट खड्या चढणीची असल्यामुळे छातीचा उये फाटतो की काय असे वाटते. जसेजसे आपण उंची गाठू लागतो, तसे आंबोली खोऱ्यामधील गावाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. साधारण तेथून दीड तासाच्या चढाईनंतर एक जंगलाचा पत्ता लागतो. मध्येच पेठशिवापुराहून येणारी वाट येऊन मिळते. त्यानंतर अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण किल्ल्याच्या तटबंदीपाशी पोहचतो. तेथून डावीकडे जाणारी वाट मनोहरगडास वेढा मारून मनसंतोषकडे तर उजवीकडची मनोहरगडाकडे जाते आधी आपले लक्ष मनोहरगडाकडे असल्यामुळे उजवीकडची कोरीव पायऱ्यांची वाट लागते. साधारण पन्नास पायऱ्या चढून गेल्यावर किल्ल्याच्या पूर्वाभिमुख उध्वस्त दरवाजाचे दर्शन होते. आत शिरल्यावर एक भक्कम बुरुजावर पोहचतो. इथून डावी उजवीकडे दोन वाट वळतात. यातील उजव्या वाटेवरून चालत गेल्यावर आपण उत्तर टोकापाशी पोहचतो. इथे तटामध्ये एक गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाची वाट मात्र मोकळीस आलेली नाही. त्यामुळे दरवाजा दुरूनच बघावा लागतो.

डावीकडील वाटेने गेल्यास तटबंदीची रांग थेट दक्षिण टोकापर्यंत धावत गेलेली आहे. समोरील उंचवट्यावर एक भक्कम चिरेबंदी दगडांची वास्तू आपले लक्ष वेधून घेते. खाली भलामोठा चौथरा आणि त्यावर बांधलेली ही इमारत दोन खोल्यांमध्ये विभागलेली आहे. या इमारतीच्या जवळच औदुंबराचे एक झाड आहे. या झाडाच्या खाली भैरोबांच्या दोन मूर्ती आहेत. याला स्थानिक लोक ‘गडाचा चाळा’ म्हणतात. पश्चिमेकडच्या टोकावर गेल्यावर मनसंतोषगडाचा संपूर्ण नजारा दिसतो. हे पाहून पुन्हा औदुंबराच्या झाडाकडे यायचे आणि उत्तर तटाकडे येताना वाटेत एक विहीर लागते. विहिरीमधील पाणी पिण्यायोग्य असल्याने इथे थोडा इसावा मिळतो. नंतर गड उतरायला लागल्यास मनसंतोषगडाकडे जाणारी वाट मिळते. या वाटेने थोडे चालू लागले की, काही अंतरावर एक भली मोठी गुहा दिसते. या गुहेत मधमाशांचे पोळे असतात त्यामुळे इथे थोडी दक्षता बाळगणे महत्वाचे ठरते.

थोड्या वेळेचा प्रवास करून आपण मनोहर आणि मनसंतोष खिंडीपाशी पोहचतो. इथून मनसंतोष गडाचा सुळका अंगावर आल्यासारखा वाटतो. मनसंतोष गडाच्या उजव्या हातास लागून एक पायवाट पुढे जाते. या वाटेने पुढे गेल्यावर किल्ल्याच्या उध्वस्त पायऱ्या दिसतात. या पुढचा रस्ता जरा अवघड असल्याने या ठिकाणी सुरक्षारक्षक दोर असणे आवश्यक आहे. या टप्पा पार केल्यावर आपण थेट गडाच्या माथ्यावर जाऊन पोहचतो. मनसंतोष गडाचा माथा निमुळता असून, तो पूर्व-पश्चिम पसरलेला आहे. सध्या या माथ्यावर एक-दोन वाड्यांची जोती दिसतात. याठिकाणी दोन पाण्याच्या टाकी आहेत. याशिवाय वर फारसे अवशेष नाहीत. मात्र गडावरून आंबोली घाटाच्या खोऱ्यातील निसर्गाचे नयनरम्य दृश्य दिसते. धाडसी गिर्यारोहकांसाठी हे अतिशय मोहक ठिकाण आहे. Location Icon

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग : सह्याद्री
जिल्हा :सिंधुदुर्ग
श्रेणी : मध्यम