गड-किल्ले


रामासेज किल्ला

Ramshej नाशिकच्या जवळ पेठ तालुक्यात, आशेवाडी गावाजवळ रामशेज किल्ला आहे. हा किल्ला मराठे व मुघल साम्राज्यातील युद्धाचा साक्षीदार आहेत.

इतिहास : नाशिक जेव्हा मुघलांच्या ताब्यात होते तेव्हा संभाजी महाराजांनी रामशेज किल्ला जिंकला. यामुळे चिडून औरंगजेबाने चाळीस हजार सैनिकांना रामशेज किल्ला ताब्यात घेण्यासाठी फिरोजजंगच्या नेतृत्वाखाली पाठवले होते. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी साल्हेर किल्ल्याचा किल्लेदार (नाव माहित नाही) याला रामशेज किल्ल्याचा किल्लेदार नेमला. त्यांनी मुघलांच्या प्रत्येक आक्रमणास समर्थपणे कडवी झुंज दिली. फिरोजजंगने यामुळे गडाला मोठे, सुरुंग लावले. वेढा आवळला पण सर्व प्रयत्न वाया गेले. यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी वेढा फोडण्यासाठी रुपाजी भोसले आणि मानाजी मोरे या सरदारांना मदतीस पाठवले. औरंगजेबाने चिडून फिरोजजंगच्या जागी बहादुरशहा कोकलताश याला गड जिंकण्यासाठी पाठवले, परंतु मराठे त्यालापण शरण गेले नाहीत.

यामुळे बहादुरशहा कोकलताश याने मराठ्यांना फसवण्यासाठी गडावर एका बाजूने हल्ला केला व दुस-या बाजूने सैन्याची एक तुकडी गडात घुसण्यासाठी रवाना केली मात्र गडावरील किल्लेदारास याची पूर्वकल्पना आल्यामुळे त्याने त्या बाजूस सैन्य तैनात केले. त्यांनी दोरखंडाने वर चढणा-या सैनिकांना गडापर्यंत पोहोचूच दिले नाही. यामुळे बहादुरशहाचा हा डाव पण फसला. अशाप्रकारे किल्लेदाराने रामशेज किल्ला साडेपाच वर्षे लढवला, मात्र या नंतर किल्ला लढवणे अशक्य झाल्याने किल्लेदाराने हा किल्ला सोडला तेव्हाच मुघलाना हा किल्ला ताब्यात घेता आला.

किल्ल्यावर पाहण्यासारखे : रामशेज किल्ल्याचा विस्तार फार मोठा नाही. मात्र गडावर पाण्याच्या टाक्या असून वाड्याचे जोते आहेत. तसेच गडावरून गंजकरंग, वाघेरा, देहेरे व सातमाळा रांग बघता येते.

कसे जावे : आशेवाडी किंवा शेवाडी गावापर्यंत खासगी किंवा इतर वाहनांच्या मदतीने पोहोचावे. तेथे गेल्यावर काताळमाथा रामशेज किल्ला दिसतो. ह्या कातळमाथाच्या डावीकडून वळसा मारल्यानंतर गडाला जाण्यासाठी पायवाट लागते. Location Icon

बोरगड

आजच्या सिमेंटच्या जंगलात एखादे निसर्गरम्य ठिकाण असणे म्हणजे नवलच नाही का ? असाच एक प्रकल्प नेचर क्न्झरवेशन सोसायटी ऑफ नाशिकने महिंद्र एण्ड महिंद्र कंपनीच्या सहकार्याने बोरगड येथे साकारलेल्या ‘महिंद्रा हरियाली’ या प्रकल्पामुळे उपलब्ध झाली आहे.

नाशिकपासून अवघ्या १८ की.मी. अंतरावर असणारे बोरगड छोटया जंगल सफारीचा अनुभव देणारे आहे.
येथे अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती व वृक्ष आढळतात उदा. साग, तेंदू, मोह, शिसम, बहावा, तिवस, पंगारा, भूतकेश वगैरे. त्यामुळेच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी देखील आहेत जसे रेड व्हीस्कल्स, शिका, मलबार, आयोरा यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी एकाच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात.

पक्ष्यांसह प्राण्यांसाठीदेखिल पाणी पिण्यासाठी ठिकठीकाणी छोटीछोटी तळे बांधली आहेत. दुर्मिळ वनस्पती, वनौषधी, करवंदाच्या जाळ्या अशी निसर्ग समृध्द रेलचेल येथे आहे. नेहमीचे सरडे तर आहेतच पण त्याचबरोबर

‘लेपड ग्याको’ या दुर्मिळ जातीसह कमीलीयान, रॉग ग्याको असेही सरडे दर्शन देतात. शिवाय ५ ते ६ फूट घोरपड, तरस, रानमांजर असे प्राणी आहेत. साधारणतः १००० एकर जागेवर साकारलेल्या या परिसरात विविध प्रकारचा निसर्ग खजिना दडलेला आहे.

तीन वर्षांपूर्वी हा रीतसर हिरवागार करण्याचा विडा उचलला महिंद्राने, संपूर्ण प्रकल्पाचा भार सोसत ८००० हून अधिक वेगवेगळ्या प्रजातीचे वृक्ष, वनस्पती व फुलांनी भरला आहे. या प्रकल्पाला भेट देण्यासाठी संस्थेशी संपर्क साधून निसर्ग सहलीचा आनंद कधीही विनाशुल्क घेऊ शकता. Location Icon