सखी

संगोपन

आनंद निकेतन ‘प्रयोग’ शाळा


सहल स्मशानाची!

Eye Donation सकाळी सकाळीच आमच्या शाळेतील मृण्मयीचे आजोबा गेल्याचा निरोप मिळाला. हसतमुख, उत्साही गृहस्थ. व्यवसायाने ते डॉक्टर होते. त्यांच्या घरी सांत्वनासाठी भेटायला गेले तेव्हा समजले की, त्यांनी मरणोत्तर देहदान केले होते. एवढी सामाजिक जाणीव आणि बुद्धिप्रामाण्यता असलेली माणसे तशी विरळाच!

घरातली कामे आटोपून शाळेत पोहचले तरी तो विषय डोक्यातून जात नव्हता. शाळेत आठवीच्या वर्गावर पहिलाच विज्ञानाचा तास होता. मी मुलांना सकाळचा प्रसंग सांगितला. मुलांनी ‘नेत्रदान’ हा शब्द ऐकला होता, पण त्यांच्या मनात त्याविषयी अनेक प्रश्न होते. ‘माणूस गेल्यावर किती वेळात डोळा काढावा लागतो? डोळा काढल्यावर तिथे खड्डा पडतो का? किती वेळात तो डोळा दुस-या माणसाला बसवावा लागतो? नेत्रदान करणा-या माणसाला चष्मा असेल तर काय होते?..’ यातल्या काही प्रश्नांना परस्पर मुलांनीच उत्तरे दिली तर त्यांच्या काही शंकांचे निरसन मी केले. त्यामुळे नेत्रदानाविषयी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली, पण देहदान ही गोष्टच मुलांना माहीत नव्हती. मग स्वाभाविकपणेच चर्चा त्या विषयाकडे वळली.

‘वैद्यकीय महाविद्यालयात शरीराची रचना अभ्यासण्यासाठी मानवी देहाची गरज असते, पण ते सहज उपलब्ध होत नाहीत. हे सर्व डॉक्टर आजोबांना माहीत असल्याने त्यांनी आपला देह नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयास देण्यात यावा, अशी इच्छा आधीच फॉर्म भरून प्रकट केली होती. घरच्यांनी त्यांच्या इच्छेचा मान ठेवत त्यांचा देह महाविद्यालयाला दिला’, असे मी मुलांना सांगितले. त्यावर मग मुलांनी ‘मृण्मयीचे आजोबा किती ग्रेट आहेत!’ अशी टिप्पणी केली.

एकूणच ‘मरण’ या गोष्टीविषयी मुलांना भयंकर कुतूहल असतं, पण आपण मुलांशी सहसा या विषयावर बोलत नाही. आम्ही शाळेत सगळ्या विषयांवर मोकळेपणाने मुलांशी बोलतो. माणूस गेल्यावर देहाची विल्हेवाट लावण्याच्या वेगवेगळ्या जाती-धर्माच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, याची काहीशी कल्पना मुलांना होती. हिंदूंमध्ये मृतदेह जाळतात तर ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये पुरतात, हे घरातील मोठय़ांच्या गप्पांमधून, चित्रपट व मालिकांमधून मुलांना माहीत झाले होते, पण चित्रपटातील स्मशानापलीकडे खरे स्मशान कुणीच पाहिले नव्हते. सर्वानाच ते पाहायची अनावर उत्सुकता होती.

नाशकातील स्मशानात विद्युतदाहिनी असल्याचे आपण रेडिओवर ऐकल्याचे वीणाने सांगितले. मग ‘विद्युतदाहिनी म्हणजे काय?’, असा प्रश्न आलाच. यातले काहीच मीही पाहिलेले नव्हते. ‘मग स्मशान पाहायलाच जाऊया,’ अशी सूचना कुणीतरी केली. विशेषत: मुली तर मागेच लागल्या की, ‘ताई, आपण जाऊच स्मशान पाहायला.’

शाळेतील अरुणदादांच्या पुढाकाराने स्मशान-सहल ठरली! शाळेच्या ‘प्रयोगां’ना नेहमीच साथ देणा-या पालकांनी याही सहलीला हरकत घेतली नाही. गाडीत बसल्यापासून ‘आत्मा, भूत’ या विषयांवर मोठी चर्चा सुरू झाली. ‘स्मशानाच्या आसपास राहणा-यांना भीती वाटत नाही का?’, असे अनेक प्रश्न मुलांच्या डोक्यात घोळत होते. (आणि पोटात भीतीचा गोळा होता!)

‘नदीच्या दोन्ही तीरावर स्मशान का?’ या प्रश्नाचं उत्तर देत दादांनी ‘पंचवटीतलं स्मशान जास्त प्रशस्त असल्याने तिथे आधी जाऊ’, असे सांगितले. हे स्मशान एकदम छान होते. मोठे प्रवेशद्वार, चिता रचायच्या सात-आठ लोखंडी कठडय़ाच्या जागा, पुढे ऐसपैस पायऱ्या आणि सुरुवातीला लाकडाची वखार. एकूण एखाद्या रम्य स्थळासारखेच वातावरण होते! चितेवर एक प्रेत जळत होते. ते मुलांनी उत्सुकतेने पाहिले. हिंदूंमध्येही काही जातींत पुरतात, असे सांगत दादाने त्यांची पुरण्याची जागा दाखविली. ही माहिती मुलांना नवीन होती. दोन्ही तीरावरील स्मशानातील पाय-यांवर बरीच मुले अभ्यास करीत बसलेली पाहून तर मुलांची भीती पळालीच. इथे शांतता असल्याने अभ्यास चांगला होतो, असे त्या मुलांनी सांगितले. विद्युतदाहिनी बंद असल्याने ती पाहता आली नाही, पण त्याबद्दल माहिती समजली.

येताना ऋताने सांगितले की, तिला ती जागा अंधारी असेल, असे वाटले होते, पण हा परिसर शांत, स्वच्छ होता. ‘येथे भिण्यासारखे काय असते’, या शब्दांत अक्षयने प्रतिक्रिया दिली. एकूणच इतर क्षेत्रभेटींहून परततो, तितक्याच सहजतेने आम्ही परत आलो.

बरोबरच्या सर्व ताईंनाही असेच वाटले. कुठलाही विषय आपण मुलांशी बोलायला टाळला तरी आजुबाजूच्या घटनांतून, वर्तमानपत्रांतून, पडद्यावरून तो विषय मुलांपर्यंत पोहोचतच असतो. मुलांची उत्सुकता ताणून गैरसमज, भीती निर्माण होण्यापेक्षा मोकळेपणाने बोललेलेच बरे असते. मात्र काही विषय असे असतात की, कसे आणि किती सांगावे, हे आपल्याला समजत नाही. अशा वेळी एखाद्या मित्र-मैत्रिणीची मदत घेता येते. एकटय़ा मुलाशी बोलण्याऐवजी पाच-सहा मुलांचा गट करून बोलणे सोयीचे ठरते. मार्ग शोधायचे, पण मुलांचे प्रश्न थांबवायचे नाहीत, हे महत्त्वाचे. मग तो विषय स्मशान का असेना! हे काही परीक्षेत विचारणार नाही, असे म्हणून आपण विषय दडपला तर मुलांच्या औत्सुक्याचे स्मशान बनते!

– ‘आनंद निकेतन’ टीम