सखी

संगोपन

पालकत्व पेलतांना

Parenting एकवेळ आईबाबा होणं सोप पण मुलांचे पालक होणं अधिक अवघड आणि आव्हानात्मक आहे. उत्तम पालक होण्याचे कुठलेही विशिष्ट नियम अथवा पध्दती नाहीत त्यामुळे प्रत्येक पालक आणि त्यांचे मुलं हे एक स्वतंत्र आणि वैशिष्टयपूर्ण व्यक्तीमत्व आहे. बाळ राजाच्या आगमनापासूनच त्याचे आईबाबा उत्तम पालक होण्यासाठी प्रयत्न सुरु करतात. मोठयांचे सल्ले, समवयस्क पालकांचे अनुभव, पुस्तके आणि आता इंटरनेटच्या माध्यमातून होतकरु पालक अधिकाअधिक प्रगल्भ होत जातात. एव्हढी सगळी पूर्व तयारी करुनही प्रत्यक्ष आपल्या मुलाचा स्वभाव, वागणे, प्रतिक्रीया पाहूनच पालक आपआपली भूमिका निभावत असतात. हे करत असतांना त्यांच्या अनेक चुका होतात, तोल सुटतो, राग येतो, हताश होतात, निराश होतात पण आपल्या बछडयाच्या प्रेमापोटी सारे विसरुन परत नव्याने पालकाच्या भूमिकेत शिरतात. पालकत्व अर्थात Parenting ही काही दिवसांची कामगिरी नसून दीर्घकाळाची प्रक्रीया आहे आपल्या मुलाला जन्म देऊन, त्याचे प्रेमाने संगोपन आणि शिक्षण देऊन एक चांगली व्यक्ती घडवण्याची. ह्या व्याख्येत मुख्यता आपले स्वतःचे मूल गृहीत आहे पण त्याबरोबर दत्तक किंवा अनाथ मुलांचेही पालकत्व स्विकारता येते. http://en.wikipedia.org/wiki/Parenting ह्या लिंकवर पालकत्वाचा अर्थ सांगितला आहे. ह्यात आपल्या मुलाची शारिरीक, मानसिक आणि भावनिक संरक्षण, संवर्धन आणि वाढ अपेक्षित आहे. तसेच त्याच्या शिक्षणासाठी, आकस्मित आपत्तींसाठी आणि भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणेही अपेक्षित आहे. येथे आपल्याला पालकत्वाचे वेगवेगळे टप्पेही वाचायला मिळतात. आपल्या मुलाच्या प्रत्येक वाढीच्या टप्प्यावर जसे बाल्य, शिशू, बालक, विद्यार्थी, पौगंडावस्था, तारुण्य; पालक आपली भूमिका बदलत असतात. आपल्या मुलाच्या वाढी बरोबरच पालक म्हणूनही ते वाढत असतात, अधिक समृध्द होत असतात.

इंटरनेटवर पालकत्व विषयावर सर्च करतांना असे आढळून येते की बालसंगोपनाविषयीच अधिक मजकूर आपल्याला वाचायला मिळतो. वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांविषयी तुलनेने फरशी माहिती उपलब्ध नाही. परंतु http://www.indiaparenting.com ही साईट अतिशय माहितीपूर्ण आणि वाचनीय आहे. गर्भारपण, संगोपन, स्त्री आरोग्य ह्या विषयांना ही साईट स्पर्श करतेच परंतु कौटूंबिक बाबींवरही प्रकाश टाकते. Raising Children ह्या सदरात वेगवेगळ्या वयात मूल वाढवतांना येणारे संभाव्य अडथळे, अडचणी अनुसरुन वेगवेगळ्या उपविभागात त्यानुरुप माहितीपूर्ण लेख आहेत. एकटे मूल, दोन भावंडे, भाषा विकास, वागणूक, भिती, अस्वस्थता, सामाजिक जवाबदारी अश्या अनेक विषयांवर लेख वाचायला मिळतात. ह्या मध्ये अनेक विषयांवर भारतीय तसेच परदेशी पालकांचे, तज्ञांचे लेख आहेत. ह्या लेखांमध्ये ‘प्रसन्न सकाळ’ हा वेगळया विषयावरचा लेख आहे. आजच्या गतीमान जीवनानुसार प्रत्येकाची सकाळ धावपळीची असते. आईबाबा दोघेही नोकरी करणारे असल्यास बहुतेकदा त्याचा फटका मुलांना बसतो आणि नकळत त्याचा ताण मुलांवर येतो. आपल्या मुलाची प्रत्येक सकाळ प्रसन्न आणि उत्साहपूर्ण असली पाहिजे ही जबाबदारी पालकांनी ओळखली पाहिजे. त्यासाठी आदल्या दिवशी रात्री सर्व पूर्व तयारी करुन ठेवल्यास घाई गडबड टाळता येऊन संपूर्ण कुटूंबाची दिवसाची सुरुवात चांगली होईल.

अश्याप्रकारे ‘महिलांचा आदर’ हाही लेख वेगळा आहे. आपल्या घरातला मुलगा आणि मुलगी वाढवतांना पालकांनी महिलांचा आदर राखण्याचे विशेष भान जागरुकपणे मुलांना दिले पाहिजे. मुलाला घरकामास प्रवृत्त करणे, महिलांविषयी विनोद अथवा अनादराने न बोलणे, मुलगा म्हणून विशेष वागणूक न देणे ह्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत. आईने सतत बाबांवर अवलंबून राहण्यापेक्षा मुलाला स्वतःहून विविध गोष्टींची माहिती पुरवणे, बाबांनीही आईला सल्ला विचारणे अश्या सारख्या छोटया छोटया गोष्टी पाळल्यास मुलालाही आपल्या आईची क्षमता कळून तिच्या विषयी आदर वाढेल. ह्या सगळ्या गोष्टींमुळे अर्थातच मोठा होत असतांना महिलांविषयीही त्याचा आदर वाढेल आणि एक सभ्य व्यक्ती समाजाला मिळेल. अश्या प्रकारचे वाढत्या वयासंबंधी अनेक लेख आपल्याला ह्या साईटवर वाचायला मिळतात.

आजच्या युगात Parenting Skills ला अधिक महत्त्व आहे. आपल्या जवळ असलेला कमी वेळ आपण Quality time म्हणून कसा उपयोगात आणतो ह्यावर पालकत्वाची कौशल्ये अवलंबून आहे. http://www.theparentszone.com/category/parenting-skills ह्या लिंकवर आपल्या मुलांमध्ये वेगवेगळी कौशल्ये जसेकी घरकाम, पैशाचे व्यवस्थापन, संभाषण, अभ्यास अशी अनेक कौशल्ये वाढविण्यासाठीची माहिती दिली आहे. आपले मुल वाढत असतांना आपल्याला अनेक प्रश्न पडतात, “माझी मुलगी शाळेत शांत असते पण घरी मात्र भरपूर हट्टीपणा करते असे का? “, ”माझा पाच वर्षाचा मुलगा अंधाराला खूप घाबरतो”, ”लहानपणी हुशार असणारा माझा मुलगा मोठया इयत्तेत गेल्यावर कमी मार्क मिळवायला लागला आहे”, ” माझ्या वयात आलेल्या मुलीला मी ह्या वयात बाळगायची सावधगिरी कशी सांगू” हे आणि असे असंख्य प्रश्न प्रत्येक पालकांना कधीतरी पडतातच. अश्या वेळी कुणा तज्ञांचा सल्ला मिळाल्यास दिलासा वाटतो. त्यासाठी http://www.raisingkids.co.uk ह्या साईटवर वयोगटा प्रमाणे आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात.

http://www.lifepositive.com/mind/parenting/spiritual-parenting.asp ह्या लिंकवर spiritual Parenting अर्थात अध्यात्मिक पालकत्वाची संकल्पना मांडली आहे. येथे पालकांचे विविध अनुभव वाचतांना आपल्याच घरात घडणारे प्रसंग आहेत असे वाटत राहते. सुजाण पालकत्वासाठी कुठलही शॉर्टकट नाही. काहीजण पालकत्व जाणीवपूर्वक शिकतात, काही आपल्या चुकातून आणि अनुभवातून शिकतात तर काही कधीच शिकत नाहीत. अध्यात्मिक पालकत्वानुसार आपण आपल्या मुलांचे फक्त ‘पालक’ असतो. देवाने दिलेली ही अमूल्य भेट आपण फक्त वाढवायची आणि फुलवायची. त्यांच्यात सृजनशिलता, आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि आपल्या मनापेक्षा हृदयाचे ऐकण्याची, वेगळ्या वाटेवरुन जाण्यासाठीचे धैर्य त्यांना मिळावे ह्यासाठी पालकांनी अथक परिश्रम घ्यायला हवेत. त्यासाठी त्यांनी देवाबरोबर भागीदारी करायला हवी. पंधरावीस वर्षे ह्या पालकत्वाच्या वाटेवरुन जातांना वेळोवेळी पालकांना स्वयंशिस्त, निस्वार्थी, दयाळू, क्षमाशिल, सहनशिल, परिवर्तनशिल, तर असलेच पाहिजे त्याबरोबर कुठलीही अपेक्षा न ठेवता मुलांवर निस्वार्थ प्रेम करता आले पाहिजे. फक्त आपलेच घोडे पुढे न दामटता मुलांना बोलायची संधी देऊन त्यांचे ऐकून घेतल्या आपल्या पालकत्वाच्या कक्षा अधिक रुंदावतील ह्यात शंकाच नाही. ह्या अवघड वाटेवरुन चालतांना मुलांवर पैसा अधिक खर्च करण्यापेक्षा अधिक वेळ दिल्यास अनेक गोष्टी सोप्या होतील.
खलिल जिब्रानने पालकत्वाविषयी अतिशय समर्पक विचार मांडले आहेत :

Your children are not your children.
They are the sons and daughters of Life’s longing for itself.
They come through you but not from you,
And though they are with you yet they belong not to you.
You may give them your love but not your thoughts,
For they have their own thoughts.
You may house their bodies but not their souls,
For their souls dwell in the house of tomorrow,
which you cannot visit, not even in your dreams.
You may strive to be like them, but seek not to make them like you.
For life goes not backward not tarries with yesterday.

– भाग्यश्री केंगे