सुधीर शाळेकडे जात होता. पाठीमागून येणा-या वाहनाचा त्याला धक्का लागला. तो खाली पडला. वाहन निघून गेले. मी सुधीरच्या मागे होते. मी चटकन् सुधीरच्या जवळ गेले. त्याची चौकशी केली. त्याला उठता येत नव्हते. रस्त्याने जाणा-या लोकांना मी थांबवले. त्यांच्या मदतीने सुधीरला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सुधीरला तपासले. औषधे दिली. सुधीरला फारसे लागले नव्हते. डॉक्टरांनी सुधीरला घरी नेण्याची परवानगी दिली. मी सुधीरला घरी नेऊन सोडले. त्याच्या आईला सगळी हकिगत सांगितली. औषधे त्याच्या आईकडे दिली. सुधीरच्या आईने माझे कौतुक केले.
कु. फुलकई
नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या मराठीच्या पाठय़पुस्तकांमध्ये भाषिक कौशल्यांबरोबरच जीवनकौशल्यांचा समावेश केलेला आहे. त्यासाठी अनुभवकथन, बातम्या, अहवाल, माहितीपत्रके, जाहिराती असे विविध लेखनप्रकार पाठय़पुस्तकांत दिलेले आहेत. पाठय़पुस्तकांमध्ये त्यांचा समावेश होण्यापूर्वीच आमच्या शाळेत अध्यापनाचा रोख जीवनकौशल्ये मुलांमध्ये रुजविणे, हाच राहिला आहे. कारण मुळात जीवन आणि शिक्षण या दोन भिन्न गोष्टी आहेत असे आम्ही मानतच नाही. आपल्याकडे जे अध्यापन साहित्य आहे त्याचा वापर करून, प्रसंगी स्वत:च असे साहित्य निर्माण करून, तसेच क्षेत्रभेटी, सहली व विविध उपक्रम राबवून, आपली कल्पनाशक्ती पणाला लावत आमचे शिक्षक शिक्षण जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करतात. हे कसे साधते? उदा. आपण इयत्ता तिसरीच्या मराठीच्या पाठय़पुस्तकातील ‘माझा अनुभव’ हा पाठ पाहू. या पाठामध्ये तिसरीच्या वयोगटातील दोन मुलींचे अनुभव दिले आहेत. त्यातील एक अनुभव चौकटीत दिला आहे.
पाठाच्या शेवटी स्वाध्याय नाही. मुलांनी आपण केलेल्या चांगल्या गोष्टी लिहून ठेवाव्यात, अशी अपेक्षा पाठाच्या सुरुवातीला व्यक्त केली आहे. त्यामुळे या अनुभवांच्या लेखन- वाचनाबरोबरच या पाठातून मुलांपर्यंत काय पोहोचवता येईल, यावर विचार करून हा पाठ शिकवायचे ठरवले.
अ) प्रत्यक्ष पाठय़पुस्तक हाती घेऊन वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी ‘अनुभव’ या शब्दावर मुलांबरोबर चर्चा केली. ‘अनुभवातून शिक्षण’ हे शाळेचे ब्रीद असल्याने ‘अनुभव’ हा शब्द मुलांच्या चांगल्याच परिचयाचा आहे. ‘अनुभव’ म्हणजे काय, असे विचारल्यावर-
१. जे आपल्याला माहीत असते ते,
२. जे आपल्याला कळते ते,
३. जे आपल्याला ‘फील’ होतं ते.. अशी उत्तरे मुलांकडून आली. मग उदाहरण म्हणून ‘आज सकाळी खूप थंडी पडल्याचा अनुभव मला आला’, असे मी मुलांना सांगितले. आणि मग सकाळी उठल्यापासून आत्ता शाळेत येईपर्यंत आपल्याला आलेले अनुभव मुलांना सांगायला सांगितले. स्वप्नीलने ‘इतरांना आलेले अनुभव ऐकण्याचा अनुभव मिळाला,’ असे सांगितले. यानंतर हे वेगवेगळे अनुभव आपल्याला कशामुळे समजतात, यावर गप्पा झाल्या. आपण जे करतो, वागतो, बोलतो, बघतो, ऐकतो, स्पर्श करतो, चव घेतो, वास घेतो.. या सगळ्यांतून आपण अनुभव घेतो, आपले अनुभव आपण एकमेकांना सांगतो, या अनुभवांचा आपल्याला पुढे कसा उपयोग होतो, यावरही गप्पा झाल्या. हे अनुभव एकमेकांना सांगण्याच्या पद्धती कोणत्या असतील, यावर लिहून-बोलून, या उत्तरांबरोबरच- खुणा करून, नजरेने, हावभाव करून, चित्र काढून, कविता करून, फोटो काढून, अभिनय करून.. अशी उत्तरे मुलांकडून आली. यानंतर मुलांनी पाठाचे वाचन केले. वाचन केल्यानंतर प्रत्यक्ष पाठावर आधारित मुद्दय़ांवर चर्चा केली. उदा. या अनुभवात एकूण व्यक्ती किती? कोणत्या? त्यांचे एकमेकांशी नाते काय? यातील मुख्य घटना कोणती? या घटनेतील विविध व्यक्तींच्या वागण्यामागील, बोलण्यामागील कार्यकारणभाव कोणता? अपघातानंतर सुधीरची परिस्थिती कशी झाली? सुधीरला घरी कोणी नेऊन सोडले?.. पाठातील मजकुरावर आधारित अशा प्रश्नांनंतर या प्रसंगांमध्ये मुलांनी जास्त खोलवर जाऊन विचार करावा, यासाठी थोडी चर्चा घेतली. मुलांचे प्रतिसाद कंसात दिले आहेत.
उदा. सुधीरला अपघात झाल्याचे समजल्यावर आईला काय वाटले असेल? तिने काय केले असेल?
(काळजी वाटली असेल, टेन्शन आले असेल, ती आपल्या स्कूटीवरून सुधीरला बघायला ताबडतोब बाहेर पडली असेल, रडू आले असेल, तिने सुधीरच्या बाबांना फोन केला असेल, देवाकडे प्रार्थना केली असेल, इ.)
– फुलकई मागून येत नसती तर काय झाले असते?
(सुधीर थोडय़ा वेळाने स्वत:च उठून उभा राहिला असता, त्याला कोणीतरी मदत केली असती, मागून येणाऱ्या शाळेच्या रिक्षाकाकांनी मदत केली असती, इ.)
– रस्त्याने जाणा-या लोकांना काय बोलून फुलकईने थांबवले असेल?
(या प्रश्नाच्या उत्तरासाठी मुलांनी गटागटाने प्रसंगाचे नाटय़ीकरण केले. घाबरून रडत मदत मागणा-या मुलीपासून ते ‘एका लहान मुलाला अपघात झाला असताना तुम्ही थांबलंच पाहिजे,’ अशी ‘दादागिरी’ करणा-या मुलीपर्यंत अनेक फुलकई साकारल्या.)
– पाठीमागून येणारे वाहन कोणते असेल?
(या प्रश्नावर तर आपल्याला किती गाडय़ांची नावे माहीत आहेत, हे सांगण्याची चढाओढच सुरू झाली.)
– वाहनचालकाने धक्का लागल्यावर काय करायला हवे होते?
(या प्रश्नावर मात्र सगळ्यांचं एकमत होतं की, त्याने थांबून सुधीरला दवाखान्यात न्यायला हवे होते.)
– वाहनचालक का थांबला नसेल?
(तो घाबरला असेल, पोलिसांची भीती वाटली असेल, त्याला उशीर होत असेल म्हणून तो घाईने गेला असणार, त्याला गाडी पकडायची असेल, त्याला इंटरव्ह्य़ूला जायचे असेल, इ.)
याचप्रमाणे पुढील प्रश्नांवरही चर्चा झाली- रस्त्यातील लोक मदतीला थांबले नसते तर? त्यावेळी तू रस्त्यात असतास/ असतीस तर काय केले असतेस? तू एखादा अपघात बघितला असशील तर त्याबद्दल सांग.
मुलांच्या प्रतिसादावरून हे सहज लक्षात येते की, मुले एकाच प्रसंगाकडे किती वेगळ्या दृष्टीने पाहतात.. चर्चा करू शकतात.. आपले म्हणणे सगळ्यांना पटवून देण्यासाठी युक्तिवादही करू शकतात. फक्त त्यांना बोलण्याची, स्वत:ला व्यक्त करण्यासाठी संधी हवी असते. आमच्या शाळेत ही संधी मुलांना पुरेपूर मिळते. मुलांच्या या व्यक्त होण्यातून शिक्षक मुलांच्या अंतरंगात डोकावून बघू शकतात. त्यांच्या भावविश्वात काय सुरू आहे, त्यांची घडण कशी होत आहे, काही चुकीच्या संकल्पना घेऊन तर ती पुढे जात नाहीत ना, हे सहज लक्षात येते. त्यांच्या घरात डोकावूनही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अधिक जाणून घेता येऊ शकते.
– ‘आनंद निकेतन’ टीम