मूलाच्या संगोपनात आई आणि वडील दोघांचाही समान वाटा असतो. पण काही लोकांच्या बाबतीत कधी नाईलाजाने तर कधी जाणिवपूर्वक एकेरी पालकत्वाची अवघड वाटचाल चालावी लागते. सहचराचा मृत्यू झाल्यास अथवा घटस्फोट, मूल दत्तक घेणे, लग्न न करता केवळ प्रजोत्पादनासाठी संबंध प्रस्थापित करणे (surrogate motherhood) किंवा क्रुत्रिम बीजारोपणाद्वारे गर्भधारणा (artificial insemination) इत्यादी कारणाने पालक ही एकेरी वाटचाल चालतात. ह्यातील काहीजण कालांतराने आपल्यासाठी जोडीदार शोधून वाट सुखकर करतात. भारतापेक्षा हे प्रमाण प्रगत देशांत अधिक आहे. ऑस्ट्रेलियात १४% तर इंग्लड मध्ये ४०% पेक्षाही ह्याचे सातत्याने प्रमाण वाढते आहे.
स्वीडन मध्ये क्रुत्रिम बीजारोपणाद्वारे गर्भधारणा होऊन मूल होऊ देण्याला कायद्याने बंदी आहे. त्यासाठी स्वीडन मधल्या उत्सूक माता डेनमार्कला स्थलांतर करतात आणि मूलाला जन्म देऊन एकेरी पालकत्व स्विकारतात. जगभरात अनेक सेलिब्रीटीजनीही एकेरी पालकत्वाची वाट धरली आहे आणि त्यामुळे कित्येक वेळा ते वादाच्या भोव-यात अडकलेले असतात. आपल्याकडे नीना गुप्ता, सुश्मिता सेन ही वानगीदाखल उदाहरणे. ह्या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी – http://en.wikipedia.org/wiki/Single_parent
एकेरी पालकांना तुलनेने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अश्या वेळेला समान परिस्थितीतून जाणा-या इतर पालकांशी बोलायला त्यांना अधिक मोकळीक वाटते. पण एकेरी पालकांची संख्या अल्प असल्यामुळे प्रत्येकाच्याच बाबतीत असे घडेल असे सांगता येत नाही. ही समस्या नेटवरच्या साईट्सनी सोडवली गेली आहे. एकेरी पालकांनी एकत्र येऊन http://www.singleparentsnetwork.com/, http://www.singleparents.org येथे ग्रुप स्थापन केला आहे. येथे आई, बाबा, मुले, घटस्फोटीत पालक, विधवा स्त्रिया, कायदा, समस्या, संगोपन… वगैरे विषय हाताळले जातात, त्यावर चर्चा केली जाते आणि योग्य मदतही. ह्या साईटचे स्वतःचे पत्रकही निघते. ह्या साईटवरचे लेख वाचनीय आहेत. ‘एकेरी पालकांची मुले’ हा लेख मुलांच्या सकारात्मक आणि नकारात्मक वाढीवर प्रकाश टाकतो. बहुतेकदा एकेरी कुटूंबातून येणारी मुले मानसिक आणि शारिरीक ताणातून जात असली तरी आपल्या एकेरी आई किंवा वडीलांविषयी त्यांना आदर आणि प्रेम असते. आपल्या पालकाची धडपड ते अधिक जवळून पाहत असल्यामुळे ही मुले वेळेआधी अधिक प्रगल्भ होतात. घरकामात, भावंडांना सांभाळण्यात, बाहेरची कामे करण्यात पालकांना मदत करतात. कित्येक वेळा आपल्या आर्थिक स्थितीनुसार आपला खर्च भागवतात. पालकही आपल्या मुलांना अधिक आदराने व प्रेमाने वागवून कित्येक गोष्टीत त्यांचा सल्ला विचारतात. त्यामुळे मुले अधिक आत्मविश्वासू आणि आत्मनिर्भर होतात. एकेरी पालकांच्या मुलांना अनेक ताणांनाही सामोरे जावे लागते. भावनिक उब फारशी न मिळाल्यामुळे तसेच समाजाकडूनही थोडीफार वेगळी वागणूक, सहानूभूती आणि दया दाखवली जात असल्यामुळे मुलांचे ताण वाढण्याची शक्यता अधिक असते. परंतु बहुतेकदा ही मुले त्यातून आपली वाट काढण्यात यशस्वी होतात. मात्र मनाने कमकूवत मुले, एकेरी पालकाकडून फारसे लक्ष आणि प्रेम न मिळणारी मुले बिघडण्याची, मानसिक रुग्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या प्रकारचे लेख आपल्याला www.parentswithoutpartners.org, www.singleparentsmingle.com वरही वाचायला मिळतात.
भारतात एकेरी पालकांचे जीवन तुलनेने विशेष सुखकर नाही. ह्या विषयी आपल्याला http://living.oneindia.in/relationship/parents-and-children/single-paren येथे भारतातली परिस्थिती वाचायला मिळते. परंपरेनुसार आई-वडील असणारे कुटूंब प्रमाणानुसार मानले जाते. आई किंवा वडीलांचे निधन झाले असेल तर मदतीपेक्षा सहानूभूतीच्याच नजरा मुलांच्या वाटेला येतात. दत्तक, घटस्पोट, विवाहबाह्य संबंधातून झालेल्या संतती विषयी अनेक शंकाकुशंका, चर्चा, संशय, घृणा आणि अवहेलना मुलांच्या आणि पालकाच्या वाटेला येते. एकेरी कुटूंबातून येणा-या मुलांच्या शैक्षणिक प्रगती, संस्कार, चांगल्या वर्तवणूकी विषयी शंका घेतली जाते.
एकेरी पालक असणा-या आईला आपल्या मुलाला वाढवतांना तसेच एकेरी पालक असणा-या वडीलांनी आपल्या मुलीला वाढवतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. मुलगा वाढवतांना आईला, त्याच्या ‘मॅनली’ गोष्टींमध्ये सामील होता येईल का? मुलगी वयात येतांना जो भावनिक आधार लागतो तो एक पिता देऊ शकेल का? संगोपना दरम्यान असे अनेक प्रश्न पडतात, अडचणी येतात. मुलेही अश्या परिस्थिती आपल्या आजूबाजूच्या घरांशी तुलना करतांना दिसतात. दुर्दैवाने त्याबाबत नकारात्मकता किंवा पालक अयशस्वी होण्याकडे समाजाचे अधिक लक्ष असते. पण प्रत्यक्षात मात्र बहुतेकांच्या बाबतीत त्यांचे एकेरी पालक मुलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात आणि प्रेमाने अधिक सजगपणे दोन्ही पालकांची जवाबदारी पेलतात. कालांतराने मुले अधिक लवकर मॅचूअर झाल्यामुळे हया मुलांना आपल्या पालकांची दुहेरी कसरत कळायला लागते आणि त्यांच्या विषयी आदर वाटतो. निरिक्षणात असे दिसून येते एकेरी पालकांची मुले मोठेपणी आत्मविश्वास असणारी, स्वतःचे निर्णय घेणारी, खंबीर, कुठल्याही परिस्थितीशी सामना करणारी आणि लहान वयातच आपल्या आयुष्याची जवाबदारी पेलण्यास सक्षम होतात. ह्या विषयीचे विविध लेख आपल्याला
http://www.iloveindia.com/parenting/single-parenting/raising-daughter.html,
http://www.iloveindia.com/parenting/index.html येथे वाचायला मिळतात.
एकेरी पालकांचा पुनर्विवाह ही आपल्याकडे तशी अवघड बाब आहे. त्यामध्येही स्त्री आणि पुरुषांची परिस्थिती वेगवेगळी आहे. आजही आपल्याकडे अपत्य असलेल्या घटस्फोटीत पुरुषापेक्षा, अपत्य असलेल्या घटस्फोटीत स्त्रिचा विवाह जुळणे तुलनेने अवघड आहे. हया विषयी मार्गदर्शन करणारा लेख http://www.indiaparenting.com/relationships/article.cgi?art_id=45&sec_id=1 येथे वाचायला मिळतो. एकेरी कुटूंबात, विशेषता स्त्री प्रमुख असलेल्या कुटूंबात अर्थिक प्रश्न अधिक सतावतात. ह्या लेखात पुनर्विवाह करण्याआधी, विशेषता स्त्रियांनी, आर्थिक आणि भावनिक रित्या अधिक कणखर आणि स्वतंत्र होण्याचा सल्ला दिला आहे.
एकेरी पालकांनी विवाह करण्याआधी आपल्या मुलांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. विवाह करण्यामागची आपली कारणे मुलांना समजावून दिल्यास, प्रत्येक निर्णयात सहभागी करुन घेतल्यास त्यांना आपल्या नवीन कुटूंबाविषयी विश्वास वाटू लागतो. प्रत्यक्षात विवाह करण्याआधी बराचसा वेळ दोन्ही कुटूंबांनी एकत्रपणे घालवल्यास एकमेकांची अधिक चांगली ओळख होते. प्रत्येकाचे स्वभाव आणि आवडीनिवडी कळतात. ह्या साठी खालिल लिंक्स अत्यंत उपयुक्त आहेत –
http://single-parenting.families.com/blog/preparing-children-for-remarriage,
http://www.family.org/lifechallenges/A000000279.cfm
एकेरी पालकत्व ही काही सामजिक समस्या नसून बदलत्या काळानुसार विभक्त कुटूंबा कडून एकेरी पालकत्वाकडे जाणारी वाट आहे. एकेरी कुटूंब दुहेरी होण ही आनंदाचीच आणि परिपूर्ण गोष्ट आहे. परंतु एकत्र येतांना दोन्ही कुटूंबांनी लक्षात ठेवले पाहिजे की पुनर्विवाह म्हणजे आपल्या आधीच्या विवाहाची जोडणी नसून संपूर्णपणे वेगळी सुरुवात आहे आणि ती नव्यानेच करायला हवी. त्यासाठी दोन्ही कुटूंबाचे प्रयत्न आणि जाणारा काळ महत्त्वाचा आहे. एकेरी पालकांच्या पुनर्विवाहाचा विषय मांडणा-या बासू चॅटर्जींच्या ‘खट्टा मिठ्ठा’ हा नितांत सुंदर चित्रपटातल्या ओळी आठवतात “थोडा है, थोडे की जरुरत है!”
– भाग्यश्री केंगे