सखी

संगोपन

आनंद निकेतन ‘प्रयोग’ शाळा


देखो मगर ध्यानसे!

Dekhodhyansey लहान मुले म्हणजे प्रचंड कुतूहल आणि औत्सुक्याचा धबधबाच! त्यांना काय पाहू आणि किती बोलू, असं झालेलं असतं. त्यांचे कुतूहलाने लुकलुकणारे डोळे आणि उत्साही बडबड ऐकून आम्ही वय, चिंता सगळं विसरून जातो. आज तर मुलं विशेष उत्साहात होती. त्याला कारणही तसंच होतं. त्यांच्याशी खेळायला शाळेत ससे येणार होते! त्यांचं सगळं लक्ष दाराकडे होतं. तेवढय़ात सुचेता शुक्ल मावशी जाळीची बास्केट घेऊन वर्गात आल्या आणि त्यांनी बास्केटमधून दोन गुबगुबीत ससे काढले. सगळेजण गलका करून एकदम त्यांच्याभोवती जमले. तरी ईशान त्यांना समजावत होता, ‘अरे, वो डर जायेंगे.’ मग ताई म्हणाल्या, ‘जे गोलात छान बसतील,त्यांच्याकडे ससे आपणहून येतील.’ ही मात्रा लगेचच लागू पडली. सगळे गोलात बसल्यावर ससे इकडे-तिकडे फिरू लागले. सगळ्यांनी मिळून त्यांची चिंटू आणि पिंटू अशी नावे ठेवली. लगेचच ‘ए, माझ्याकडे येतोस? ये ना! मी तुला खाऊ देतो..’ वगैरे मुलं म्हणू लागली. त्याचबरोबर, ‘ताई, त्याचे डोळे गोल आहेत. तो बघा- नाक सारखं हलवतोय. कान ताठ करतोय..’ अशी टिपणीही चालू होती.

मग सगळी गंमतच झाली. ते दोन्ही ससे इतके सारखे होते, की मुलांना कोणता चिंटू आणि कोणता पिंटू, हे ओळखताच येईना. ताई काही गोष्टी मुद्दाम त्यांच्या लक्षात आणून देत होत्या. मग एकेकाने त्यांना मांडीवर घेण्याचा कार्यक्रम झाला. ज्ञानदाला सश्याला मांडीवर घ्यायचे होते, पण भीतीही वाटत होती. मग ताईंनी सश्याला तिच्या मांडीवर टेकवले. मांडीवर घेतल्यावर मुलांना, त्याचा स्पर्श किती मऊ आहे; पण त्याची नखं टोचतात, हे जाणवले.

मग मुलांनी मावशीकडे मोर्चा वळवला. ‘तुम्ही ससे कुठून आणलेत? त्यांना आंघोळ कशी घालता? ते किती वेळ झोपतात? त्यांना भूक लागलेली तुम्हाला कशी समजते?..’ अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. मावशींनी पण प्रेमाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. एवढय़ा वेळात ससे इतके मुलांचे होऊन गेले होते, की निरोप देताना जणू आपलेच ससे या मावशी घेऊन चालल्या आहेत, असे भाव त्यांच्या चेह-यावर होते.

मुलं सहजपणे अनेक गोष्टी बघत असतात. पण शाळेत प्रत्येक मुलाला जाणीवपूर्वक बघण्यासाठी (निरीक्षण करण्यासाठी) सतत प्रोत्साहित केले जाते. मग अनेक न लक्षात आलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतात. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आणि प्रतिक्रियाही वेगळ्या असतात. मुलांकडून कविता, गोष्टी, चित्रे, छोटी वाक्ये यांतून त्या व्यक्त होतात. या स्वातंत्र्यातून निरीक्षणशक्ती वाढते आणि आणखी माहिती गोळा करणे आपोआपच जमते.

त्यासाठी काही प्रसंग आपोआप चालून येतात, तर काही मुद्दाम घडवून आणावे लागतात. असे उपक्रम बालवाडीपासूनच सुरू होतात आणि पुढे वाढत जातात. काही एखाद्या प्रसंगापुरते असतात, तर काही वर्षभर चालतात. ते शाळेतच चालतात असे नाही, तर कधी कधी ते गृहपाठाचाही भाग असतात. पाचवीतील मुलांना घरासमोरील एक मोठे झाड निवडून त्याचे रोज निरीक्षण करायला सांगितले आणि त्या झाडात होणा-या विशेष बदलांच्या नोंदी ठेवायला सांगितले. झाडे तर आसपास असतातच; पण सवयीने आपल्याला ती सावलीपुरतीच जाणवतात. मात्र, अशा नोंदी ठेवायला सांगितल्यावर वर्षभरात २५ झाडांच्या माहितीचा कोशच तयार झाला.
झाड वर्षभर हिरवे असते का? पानगळ कधी होते? फुले कधी येतात? त्यांना वास येतो का? फळं कधी येतात? त्यांचा आकार कसा असतो? झाडावर पक्षी येतात का? कुठले? ते घरटी बांधतात का?.. अशा अनेक नोंदी मुलांनी ठेवल्या. मुलांबरोबर पालकही या नोंदी ठेवण्यात नकळत सहभागी झाले. केतकीच्या नादाने तिच्या आईनेही आपल्या ओटय़ासमोरच्या झाडाच्या नोंदी ठेवल्या आणि इतके दिवस न दिसलेले अनेक पक्षी तिच्या जीवनाचा भाग बनून गेले. हे तिने आवर्जून शाळेत येऊन सांगितले. निरीक्षण व काटेकोर नोंदी हाच तर विज्ञानाचा पाया असतो. तो रुक्ष न करता रम्य केला की झाले. मुलांना मग ती सवयच लागते. कितीतरी नव्या गोष्टी मुले टिपतात.

वेगळ्या प्रकारचे नुसते प्राणीच नाही, तर घरटी, वैशिष्टय़पूर्ण फुलं, पानं, भाज्या, दगड अशा कितीतरी वस्तू शाळेत येत असतात. स्वत: वेगवेगळे प्रयोग करून, त्याच्या परिणामांचे निरीक्षण करून लिहिण्यात जास्त मजा येते. शाळेच्या या उपक्रमाची माहिती आता अनेकजणांना झाली आहे. इतकी, की एकदा मुक्त विद्यापीठाच्या मागच्या जंगलात एक घोरपड सापडली. ती प्राणिसंग्रहालयात जमा करण्यासाठी येथे पाठवायची होती. तिथून सरांचा फोन आला- ‘जाता जाता तुमच्या शाळेत पाठवतो. थोडा वेळ ती मुलांना दाखवा आणि मग पुढे जाऊ.’ मग काय, फक्त तानाजीच्या गोष्टीत माहीत असलेली घोरपड मुलांना प्रत्यक्ष बघायला मिळाली. अशा गोष्टींमुळे मुलांची निसर्गाकडे बघण्याची दृष्टीच बदलून जाते.

मुलं जन्माला आल्यापासून आजूबाजूचे, भोवतालचे निरीक्षण करत असतात. सुरुवातीला मुलांच्या मेंदूची वाढ झपाटय़ाने होत असते. त्यातून निरीक्षणांना प्रतिसाद म्हणून त्यांच्या मनात जगाबद्दल असंख्य प्रश्न निर्माण होतात. मग या प्रश्नांना उत्तरे मिळवण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी धडपड सुरू होते. यातूनच मुलं शिकतात. त्यांच्या मर्यादित जगामध्ये सुरुवातीला शिक्षक व पालक यांच्याकडूनच त्यांना उत्तरे मिळवता येतात. त्यामुळे मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देणे हे पालकांना व शिक्षकांना महत्त्वाचे वाटायला हवे. नाही तर मुलांचे प्रश्न विचारणे कमी होत जाते आणि मुलांची निरीक्षणाची सवयही तुटते.

तुम्हालाही मुलांच्या निरीक्षणशक्तीचा, त्यासोबत येणा-या प्रश्नांचा अनुभव नेहमीच येत असेल. मग तुम्ही काय करता? मुलांना गप्प करता, की आपणही त्यांच्या खेळात सामील होता? यासाठी साहित्य काहीच लागत नाही. उलट, मुलांबरोबर आपल्याला पण मजा येते. करून तर पाहा!

– ‘आनंद निकेतन’ टीम