समर्थ स्थापीत ११ मारुती
चाफळच्या नैऋत्येस सुमारे अर्ध्या मैलावर शिंगणवाडीची टेकडी आहे. शिंगणवाडीला सिंगणवाडी किंवा सिंघणवाडी अशीही नावे आहेत. तेथील गुहेत समर्थ रामदास जपजाप्य करायला जात म्हणून त्यांनी आपल्या आराध्य दैवतांची म्हणजेच मारूतीची मूर्ती तयार करून तिची स्थापना येथे केली. चाफळच्या दोन मारूतींच्या स्थापनेमागोमागच, म्हणजे शके १५७१ मध्ये, हया मूर्तीची स्थापना झाली असावी असे मानले जाते. चाफळ येथे मुख्य मठ स्थापन करण्यापूर्वी समर्थांचा मठ येथे होता. शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट झाली ती हया मठालगतच्या बागेतील एका शेवरीच्या वृक्षाखाली झाली. (काहीच्यां मते तेथील एका चिंचेच्या वृक्षाखाली ही भेट झाली.) हया भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांकडून गुरूदक्षिणेदाखल मिळालेले होन समर्थांनी तेथे जमलेल्या लोकांवर उधळले व त्यातील काही नाणी अगदी परवा-परवांपर्यंत हया परिसरात सापडत असे म्हणतात. येथून जवळच ‘रामघळ’ हे समर्थांचे चितंनाला बसण्याचे ठिकाण आहे. तसेच, शिवाजी महाराजांची तहान भागविण्यासाठी समर्थांनी आपल्या कुबडीने दगड उलथून दगडाखाली पाण्याचा जो झरा दाखविला तो ‘कुबडीतीर्थ’ म्हणून ओळखला जाणारा झरादेखील येथून जवळच आहे.
शिगंणवाडीच्या टेकडीवरील हया मारूतीला ‘खडीचा मारूती’ अथवा ‘बालमारूती’ असे म्हणतात. सुमारे ६ फूट लांबीरूदींच्या देवळात साडेतीन फूट उंचीची ही मूर्ती उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. हया मारूतीच्या डाव्या हातात त्रिशुळासारखी वस्तू आहे. ती बहुधा ध्वजा असावी. चाफळचा प्रतापमारूती व पारगावचा मारूती यांच्या डाव्या हातातही अशीच ध्वजा आहे. दुसरा हात उगारलेला आहे. या मारूतीस सभा मंडप नाही. मात्र देवळासमोरच्या जागेत सावली देणारे वृक्ष आहेत. देवळाचा परिसर आल्हाददायक व पवित्र वाटतो. टेकडीच्या पश्चिमेकडून ओढा वाहातो, त्याच्या काठीही गर्द झाडी आहे. अकरा मारूतीत हे देऊळ सर्वात छोटे आहे. हे मंदिर उंचावर आहे व त्याच्या शिखराला तांबडा रंग दिलेला आहे, त्यामुळे चाफळच्या परिसरातून ते कुठूनही दिसते. दुरून पाहणा-याला एखादा दर्गा किंवा मशीदच असावी असे वाटते. हया मारूतीची स्थापना चाफळच्या मारूतीच्या मागोमागच झाल्यामुळे व चाफळपासून फारच जवळ हा मारूती असल्यामुळे काही लोक हयाला चाफळचाच तिसरा मारूती समजतात.
हया मारूतीची पूजा-अर्चा व हनुमानजयंतीचा उत्सव हयाबाबतची सर्व व्यवस्था चाफळच्या श्रीराम देवस्थानाकडूनच केली जाते.
अलीकडे शिंगणवाडीचे लोक हनुमानजयंतीचा उत्सव साजरा करतात व त्या दिवशी भंडारा घालतात.
संदर्भग्रंथ – समर्थ स्थापित अकरा मारुती
(लेखक – पु. वि. हर्षे)