चांदवड


Renuka Devi महाराष्ट्रात मालेगावच्या जवळ असलेले चांदवड हे एक छोटेसे गाव. पर्वतांनी वेढलेलल्या गावास धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. चांदवड शहरात फिरायला गेल्यास तिथे आपणास अहिल्याबाई होळकर यांचा रंगमहाल, रेणुका माता मंदिर पहावयास मिळते. तसेच नजीकच्या वडाळीभोई गावाकडे गेल्यास केद्राई माता मंदिर लागते.

रंगमहाल : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी हा महाल स्वत:साठी बनवला होता. या महालात वास्तव्यास असतांना अहिल्याबाई रेणुका मातेच्या दर्शनास जात असत तसेच विंचूरजवळ असलेल्या विहिरीवरही भेट देत असत. तिथे शत्रूंपासून बचावासाठी सुरक्षित जागा केलेली होती.

रेणुका माता मंदिर : ऋषी परशुरामांनी वडिलांच्या आदेशावरुन आई रेणूका मातेचा वध केला. रेणूका मातेचे मुख चांदवड शहरात व धड माहूर गावाजवळ पडले. त्यामुळेच चांदवडला रेणूका मातेचे मंदिर बांधण्यात आले.

केद्राई माता मंदिर : वडाळीभोई पासून दक्षिणेला ५ किमी खडकओझर गावाच्या शिवारात हे मंदिर आहे. अपत्य प्राप्तीसाठी अनेक जोडपे केद्राई मातेजवळ नवस करतात. यावेळी नवस फेडण्यासाठी बोकड बळी दिला जातो. प्रत्येक पौर्णिमेला व अमावस्येला या ठिकाणी यात्रा भरते. या वेळेस हजारो भाविक नवस करण्यासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मंदिराच्या बाजूलाच केद्राई धरण असून ते पण फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी अतिशय थंड वातावरण असते.

कसे जाल?
नाशिक पासून चांदवड ६४ किमी लांब असून खाजगी वाहनांनी दिड तासात पोहोचता येते. येथे जाण्यासाठी नाशिकहून बस तसेच छोटया गाडयांची सोयही उपलब्ध आहे.

सुंदरनारायण मंदीर

Sundarnarayan Temple नाशिकचे वैशिष्टय असणारे सुंदरनारायण मंदीर हे गोदावरीकाठी अहिल्याबाई होळकर पुलाजवळ आहे.

सुंदरनारायणाचा पुराणात उल्लेख आहे. वृंदादेवी ही अतिशय सुंदर व सुशील असणारी स्त्री जालंदर नावाच्या राक्षसाची पत्नी होती. जालंदर दुष्ट राक्षस होता. परंतु तो शंकराचा परम भक्त होता. वृंदादेवीची पुण्याई व जालंदरची भक्ती ह्यावर प्रसन्न होऊन शंकराने त्याला अमर होण्याचे वरदान दिले. वरदान मिळाल्यावर जालंदर आणखीनच अहंकारी झाला व पृथ्वीवरच्या मानवांना तसेच स्वर्गात देवतांना त्रास देऊ लागला. इतकेच नव्हे तर खुद्द भगवान शंकरा बरोबर जालंदराने वाद छेडला. असह्य होऊन भगवान विष्णुनी त्यास ठार मारायचे ठरविले.

विष्णू जालंदाचे रूप धारण करून वृंदा देवी बरोबर राहू लागले. अश्या त-हेने वृंदादेवीचे पवित्र्य धोक्यात आहे व तिची पुण्याई संपुष्टात आली. त्यामुळे जालंदरला मारण्यात विष्णूला यश आले. वृंदादेवीला विष्णूची चलाखी लक्षात येताच ती अतिशय संतापली. तिने विष्णूला शाप दिला त्यामुळे भगवान विष्णू पूर्ण काळे पडले. विष्णूंनी गोदावरीत स्नान करून आपली काया परत मिळावली व पूर्वी इतकेच सुंदर ते दिसू लागले. म्हणूनच भगवान विष्णूंना नाव प्राप्त झाले सुंदरनारायण.

नाशिकचे सुंदरनारायण मंदीर १७५६ साली गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी बांधले. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेस आहे. कपालेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारातून बरोबर पश्चिम दिशेला पाहिले की सुंदरनारायण मंदिरातील मूर्तीचे दर्शन घडते. व्हिक्टोरिया पुलाजवळ असलेल्या या मंदिराची रचना भृगशिल्पानुसार आहे. मंदिराचे बांधकाम हे अतिशय आकर्षक असून त्यावर मोगल शैलीचा पगडा दिसून येतो. कारण त्याकाळात बरीचशी मंदिरे मुसलमानांनी नष्ट करून त्याजागी कबरी बांधल्या होत्या. मंदिराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे दरवर्षी २१ मार्च रोजी सूर्योदयाच्या वेळी सूर्य किरणे प्रथम मूर्तीवर पडतात. त्याकाळच्या वास्तूशिल्पाचा हा चमत्कारच म्हटला पाहिजे विष्णूच्या मूर्तीच्या डाव्या बाजूस लक्ष्मी व उजव्या बाजूस सरस्वती विराजमान आहे.

देवाळाजवळ नदीच्या दिशेने बद्रीका संगम नावाचे कुंभ आहे असे म्हणतात की, देवगिरी राजाने ह्या कुंभात आंघोळ करून सर्व विधी पार पाडले. ह्या कुंभाचा उल्लेख ज्ञानेश्वरीत सुध्दा आपल्याला आढळतो. असे हे पुरातन मंदीर निश्चितच भेट देण्याजोगे आहे.