समर्थ स्थापीत ११ मारुती
समर्थ रामदासांच्या जीवन-कार्यात चाफळचे महत्व फार मोठे आहे. समर्थांच्या चरित्राची फारशी माहिती नसलेल्या व्यक्तीलासुध्दा सज्जनगड आणि चाफळ ही नावे समर्थांच्या जीवनाशी निगडीत आहे हे माहीत असते. चाफळचे प्रसिध्द राममंदिर रामदासांनी शके १५६९ मध्ये आपले शिष्य व गांवकरी यांच्या मदतीने बांधले. प्रभु रामचंद्रानी दिलेल्या दृष्टान्ताप्रमाणे चाफळपासून जवळच असलेल्या अंगापूरच्या डोहातली रामाची मूर्ती त्यांनी बाहेर काढली व तिची हया देवळात प्रतिष्ठापना केली. पंचवटीचा राम कृष्णेच्या खोऱ्यात आला आणि समर्थ संप्रदायाच्या मुख्य मठाचे स्थान चाफळ हे ठरले.
अशी अख्यायिका आहे की ज्यावेळी प्रभु रामचंद्रांनी समर्थांना अंगापूरच्या डोहातील मूर्तीविषयी दृष्टान्त दिला त्याच वेळी मारूतीनेही समर्थांना दर्शन देऊन सांगितले की ‘हया रामाच्या समोर माझी मूर्ती स्थापन करून तू त्या मूर्तीत प्रवेश कर आणि माझी भीममूर्ती रामाच्या देवळाच्या मागे स्थापन कर.’ मारूतीच्या हया आदेशाप्रमाणे समर्थांनी राममंदिराच्या पुढे हात जोडून उभा असलेला ‘दासमारूती’ आणि मंदिराच्या मागे’प्रतापमारूती’ अशा दोन मूर्तीची स्थापना शके १५७० मध्ये केली.
दासमारूती – हा श्रीरामाच्या समोर ‘दोन्ही कर जोडोनि’ उभा आहे. श्रीरामासमोर नम्र हनुमंताची मूर्ती असली पाहीजे म्हणून समर्थांनी सुदंर दगडी मंदिर बांधून त्यात दासमारूतीची स्थापना केली. ही मूर्ती सुमारे 6 फूट उंच आहे. चेह-यावर अत्यंत विनम्र भाव, समोर असलेल्या प्रभु श्रीरामाच्या चरणांवर विसावलेले नेत्र, अशी ही मूर्ती आहे. तिचे अवयव रेखीव व प्रमाणबध्द आहेत. हया दासमारूतीसाठी समर्थांनी बांधलेले मंदिर आज सुमारे सव्वातीनशे वर्षानंतरही उत्तम स्थितीत आहे. 1967 सालच्या भूकंपातही हया मंदिरास कोठे धक्का लागला नाही, तडाही गेला नाही. राममंदिराचे मात्र हया भूकंपाने मोठे नुकसान झाले, त्यामुळे त्याचा आता कायाकल्प केला गेला आहे. परंतु हया कायाकल्पांतही दासमारूतीच्या मूर्तीत किंवा मंदिरात काहीही बदल केलेला नाही. समर्थकालीन सर्व शिल्प व वास्तू कायम ठेवण्यात आली आहे.
प्रतापमारूती – श्रीराम मंदिराच्या मागे सुमारे तीनशे फूट अंतरावर प्रतापमारूतीचे मंदिर आहे. हया मारूतीला ‘भीममारूती’,
‘प्रतापमारूती’ किंवा ‘वीर मारूती’ अशी तीन नावे आहेत. ते मंदिरदेखील समर्थांनी बांधले त्याच स्थितीत आहे. हया मंदिराला 50 फूट उंच शिखर आहे. त्या शिखराचे शिल्पकाम उत्कृष्ट आहे. प्रतापमारूतीची उंची सुमारे सात-आठ फूट आहे. मूर्ती अत्यंत भव्य,उंच व रेखीव आहे. ‘भीमरूपी महारूद्रा’ हया स्तोत्रात समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे ‘पुच्छ माथा मुरडिले’ आहे. मस्तकावर मुकुट, कानात कुंडले आहेत. कटिभोवती सुवर्णाची कासोटी व तिला रूणझुण करणा-या घंटया आहेत. टकाराचे ठाण मांडून बसलेली ही मूर्ती नेटकी व सडपातळ आहे. समर्थांनी आपल्या विशिष्ट शैलीत ठसकेबाज वर्णन केलेली ही मूर्ती पुण्यवान भक्तांना ‘परितोषविणारी’ व दुष्टांना ‘काळाग्नी व काळरूद्राग्नी’ सारखी भासते. ती नेत्रातून जणु अग्निवर्षाव करीत आहे अशी भासते. काळालाही कंपित करील असे हिचे रूप आहे. ही मूर्ती महाविद्युल्लतेप्रमाणे तेजस्वी आहे. चाफळ मठात वास्तव्य असले की समर्थ हया मूर्तीच्या चरणतलाशी बराच वेळ बसून समोर असलेल्या बकुलवृक्षावरील वानरांच्या लीला पाहात राहत. चाफळ गावावर आलेले कोणतेही दैवी संकट हया मूर्तीच्या पूजेने दूर होते अशी त्या भागातील भाविक जनतेची श्रध्दा आहे.
प्रतिवर्षी श्रावण महिन्यात हया महारूद्र मूर्तीला महारूद्राभिषेक करण्यात येतो व त्या अनुष्ठानाची सांगता श्रावण वद्य ३० ला यथासांग साजरी केली जाते. हनुमान जयंतीचा उत्सव तर अत्यंत थाटाने होतोच.
चाफळ येथील मरूतीच्या हया दोन्ही मूर्तीच्या दर्शनासाठी जाणा-या भाविकांची येथील मंदिराजवळील मठात राहाण्या-झोपण्याची चांगली व्यवस्था होते.
संदर्भग्रंथ – समर्थ स्थापित अकरा मारुती
(लेखक – पु. वि. हर्षे)