समर्थ स्थापीत ११ मारुती


Samarth Ramdas समर्थाची मारूती स्थापना : प्रेरणा व स्वरूप

ज्ञानेश्वर,नामदेव,एकनाथ,तुकाराम आणि रामदास हे संत म्हणजे मराठी भक्तिपरंपरेच्या पंचगंगाच मानल्या जातात. परंतु रामदासांच्या भक्तिगंगेच्या प्रवाहाचे इतर संतांच्या भक्तिप्रवाहापेक्षा असलेले वेगळेपण जाणकल्याशिवाय राहात नाही.

समर्थ रामदास स्वामींनी बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर संबंध भारतभर पायी भ्रमण करून हिमालयातील तीर्थक्षेत्रांपासून तो दक्षिणेस रामेश्वरापर्यंत सर्व तीर्थक्षेत्रांना भेट दिली. ह्यामुळे तात्कालीन समाजस्थितीचे दर्शन त्यांना घडले. सर्वत्र हिंदूंची दैन्यावस्था त्यांनी पाहिली. राम हे त्यांचे कुलदैवत असल्यामुळे आणि राम हा सामर्थ्यसंपन्न असुमारक आणि देवतातरक असल्यामुळे तसेच तो रामराज्य प्रदान करणारा असल्यामुळे त्याची भक्ती करण्याकडे हिंदू जनतेचे मन वळवावे म्हणजेच तिची सद्यस्थितीतून सुटका होईल असा विचार त्यांनी केला. तपश्चर्या करतांना आणि त्यानंतर तीर्थाटन करतांना, रामभक्ती आणि हनुमानभक्ती यांच्या योगाने स्वत:चा उध्दार करून घ्यावा हाच त्यांचा प्रधान हेतू होता. परंतु तपश्चर्या चालू असतांना श्रीराम आणि हनुमान यांनी दर्शन देऊन कृष्णातीरी जगदुध्दार कर असा त्यांना आदेश दिलेला असल्यामुळे, तीर्थाटन करून आल्यानंतर त्यांनी असे ठरविले की आपल्या ओजस्वी वाणीचा, आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा आणि आपल्याला प्राप्त झालेल्या सिध्दीचा उपयोग हिंदू जनतेची मने रामभक्तीकडे वळवून तिला तिच्या दुरवस्थेतून बाहेर काढण्यासाठी करावा. ‘संसार क्षणभंगूर आहे, मरण केव्हातर येणारच’, म्हणून आपले जीवन लोकसेवेत घालविल्यास जन्मसाफल्य होते व तीच रामाची सेवा होय

अशी शिकवण लोकांना द्यायला त्यांनी सुरवात केली. त्याचबरोबर, रामाचा संदेश पोहचवणारा सर्वश्रेष्ठ दास जो मारूती त्यांच्या ठिकाणी असलेल्या बलाची उपासना देखील लोकांना शिकवावी असेही त्यांनी ठरविले. हयासाठी लोकसंग्रह आणि लोकजागृती करणे आवश्यक आहे हे जाणून त्यांनी महाराष्ट्रात गावोगाव भ्रमण केले आणि कित्येक ठिकाणी मारूतींची स्थापना केली. लोकांना मारूतीच्या उपासनेला लावून धैर्य, वीर्य आणि बलसंपादनाची ईर्षा त्यांनी लोकांमध्ये निर्माण केली.

समर्थांनी आपल्या तीर्थाटनामध्ये उत्तर भारतातही मारूतीमंदिरे स्थापन केली. त्यापैकी हनुमंत घाटावरील हनुमान मंदिर, तेलंगणातील हनुमानाचे मंदिर, ही मंदिरे प्रसिध्द आहेत. तसेच दक्षिणेकडील रामेश्वराच्या सेतुबंधाजवळील हनुमान मंदिरही प्रसिध्द आहे. महाराष्ट्रात तर त्यांनी कित्येक ठिकाणी मारूतीच्या मूर्ती स्थापन केल्या. समर्थ रामदास आणि मारूती हया दोन गोष्टीचे साहचर्य लोकांच्या मनात इतके ठसले आहे की एखाद्या ठिकाणची मारूतीची मूर्ती कोणी केव्हा स्थापन केली हे माहित नसेल तर ती समर्थ रामदासांनी स्थापन केलेली असणार असे गृहीत धरले जाते. तसेच समर्थांनी स्थापन केलेली मूर्ती कोठेही असो, ती ओळखण्याची खूण म्हणजे, रातापुढे मारूतीराय असले की ते हीत जोडूनच उभे असणार आणि एकटे मारूतीराय असले की त्यांचे हात प्रहार करण्याच्या भूमिकेत असणार व पायाखाली राक्षस तुडविलेला असणार!

समर्थांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मारूतीची स्थापना केली असली तरी ‘समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारूती’ म्हणून जे प्रसिध्द आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत :

हया अकरा मारूतीच्या स्थापनेचा जो काळ येथे दिला आहे त्याबद्यल मतभेद आहेत. परंतु शहापूरचा मारूती हया ‘अकरा मारूतीत’ पहिला याबाबत मात्र मतभेद नाहीत.

वास्तविक समर्थांनी सर्वात प्रथम स्थापिलेली मारूतीची मूर्ती गोदावरीच्या तीरावरील टाकळी येथील गोमयाची मूर्ती ही होय. तीर्थाटनाला जाण्यापूर्वी त्यांनी ही मूर्ती आपला शिष्य उध्दव याच्या मारूती उपासनेसाठी स्थापिली. परंतू हया मूर्तीचा समावेश ‘अकरा मारूतीत’ नाही. तसेच, सज्जनगड येथील मारूती, शिवथर घळींतील मारूती, मिरज, महाबळेश्वर, वाई, तंजावर, टेंभू, शिरगाव येथील मारूती, हयांचाही अकरा मारूतीत समावेश नाही. असे का हयाचे समाधानकारक उत्तर सापडत नाही. रामदासांच्या विशिष्ट अकरा मारूतींपैकी काहीना कदाचित राजकीय दृष्टया मोक्याच्या स्थानामुळे महत्व दिले गेले असेल, कदाचित समर्थांनी अनुग्रह दिलेल्या शिष्यांच्या आग्रहास्तव त्यांतील काहीची स्थापना केली गेली म्हणून त्यांना महत्व दिले गेले असेल, किंवा काहींना अन्य कारणास्तव महत्व दिले गेले असेल; परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे की ज्या अकरा मारूतींना विशेष महत्व दिले गेले आहे ते सर्व मारूती कृष्णेच्या परिसरातील आहेत. ‘कृष्णातीरी जगदुध्दार कर’ हया दैवी दृष्टान्तामुळे हया कृष्णातीरीच्या मारूतींना विशेष महत्व दिले गेले असावे असाही तर्क काढता येण्यासारखा आहे.

समर्थांच्या शिष्या वेणाबाई हयांच्या पुढील अंभगात हया अकरा मारूतींच्या स्थलाबद्दल उल्लेख आहे :-

चाफळामाजी दोन, उंब्रजेसी येक । पारगावी देख चौथा तो हा ॥
पांचवा मसूरी, शहापुरी सहावा। जाण तो सातवा शिराळयांत॥
सिंगणवाडी आठवा, मनपाडळे नववा। दहावा जाणावा माजगावी॥
बाहयांत अकरावा येणेरीती गावा। सर्व मनोरथा पुरवील॥
वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास। कीर्ती गगनांत न समावे॥

समर्थांचे हे अकरा मारूती जागृत देवस्थाने आहेत असे मानले जाते. हया अकरा मारूतींना ‘वारीचे मारूती’ असेही म्हणतात.

संदर्भग्रंथ – समर्थ स्थापित अकरा मारुती
(लेखक – पु. वि. हर्षे)