समर्थ स्थापीत ११ मारुती
मनपाडळे हे समर्थांच्या अकरा मारूतीस्थानांपैकी सर्वात दक्षिणेकडचे स्थान. ज्योतिबाचा डोंगर आणि पन्हाळगड येथून जवळच आहे. पन्हाळगड किल्याचे राजकीय महत्व लक्षात घेऊन समर्थ रामदासांनी येथे शिष्यसंप्रदाय वाढविला असावा व हया मूर्तीची स्थापना केली असावी. ज्योतिबा हे ज्योर्तिर्लिंग देवस्थान येथून जवळ आहे. तेव्हा अशा पवित्र ठिकाणी मारूती मंदिर असावे अशा भावनेनेही कदाचित हया मारूतीची स्थापना समर्थांनी केली असेल. स्थापना शके १५७३.
हे मारूतीमंदिर अगदी एका टोकावर नदीच्या काठी आहे. मंदिर कौलारू आहे. मंदिराजवळून ओढा वाहातो. मंदिराच्या आसपास झाडी आहे. मंदिराचा गाभारा ७ फूट लांब ६ फूट रुंद असून त्याभोवती २६ फूट लांव १५ फूट रुंद असा सभा मंडप आहे. सभामंडपाचे बांधकाम नवीन आहे व चांगल्या स्थितीत ठेवलेले आहे. मंदिर व आतील मारूतीची मूर्ती उत्तराभिमुख आहे. मूर्ती सुमारे ५॥ फूट उंचीची आहे. मूर्ती साधी पण सुबक आहे. मूर्तीजवळ सुमारे दीड फूट उंचीची कुबडी आहे.
येथे अगदी जवळ पाडळी नावाचे गाव आहे तेथेही मारूतीची मूर्ती आहे. येथे मुख्य उत्सव दासनवमीचा असतो. येथे दर्शनासाठी येणा-या लोकांची मंदिराच्या मंडपात राहण्या उतरण्याची सोय होऊ शकते. भोजनाची मात्र खास व्यवस्था नाही.
पारगाव हे मनपाडळे हया मारूती देवस्थानापासून सुमारे पाच मैलांवर आहे. मात्र हया दोन देवस्थानांना जोडणारा थेट एस.टी.चा रस्ता नाही. क-हाड-कोल्हापूर रस्त्यावरील वाठार हया गावापासून वारणा साखरकारखान्याकडे जाणा-या रस्त्यावर नवे पारगाव आहे व त्याच्या उत्तरेस दोन मैलांवर जुने पारगाव आहे हया जुन्या पारगावचा मारूती हाच समर्थ स्थापित ‘पारगावचा’ मारूती. हया मूर्तीची स्थापना शके १५७४ मध्ये झाली असावी असे मानले जाते. पारगाव हे सुध्दा पन्हाळ गडाजवळचेच गाव असल्यामुळे समर्थांनी त्याचे राजकीय महत्व लक्षात घेऊन बहुधा येथे मारूती मूर्तीची स्थापना केली असावी. अनाजी दत्तो व कोंडाजी फर्जद यांना शिवाजी महाराजांनी पन्हाळयाची मोहीम सांगितली तेव्हा राजकीय खलबतांसाठी शिवाजी महाराज व समर्थ रामदास हे दोघे हया पारगावी येत असत असे म्हणतात.
समर्थांनी स्थापिलेल्या अकरा मारूतीतला हा शेवटचा असे मानले जाते. अकरा मारूतींपैकी ही सर्वात लहान मूर्ती आहे. काहीचे म्हणणे असे की समर्थांना अकरा मारूतींच्या मूर्ती एका रात्रीत तयार केल्या. त्या करता करता उजाडू लागले म्हणून समर्थांनी ही शेवटची मूर्ती लहान केली. त्या मूर्तीची उंची फक्त दीड फूट आहे. इतर मारूतींप्रमाणे ही मूर्ती शेणाची किंवा चुनामातीची नाही. एका सपाट दगडावर ही मूर्ती कोरलेली आहे. मूर्तीवर शेंदूरही चढविलेला नाही. या मारूतीने केसांची शेंडी बांधलेली आहे. तो डावीकडे तोंड करून धावत निघालेला आहे. समर्थांच्या इतर मूर्तीहून ही मूर्ती इतकी निराळी आहे की ही मूर्ती समर्थांची नव्हेच अशी शंका यावी.
हया मंदिराची मूळ घुमटी ८ फूट लांबरूंद आहे. त्याभोवती १९७२ साली ४० फूट लांब आणि १६ फूट रुंद असा सभामंडप बांधला गेला. परंतु हे बांधकाम बाहेरून देऊळ न वाटता एखाद्या हॉलसारखे वाटते. हया देवळाच्या भिंतीवर नामफलक नाही, ध्वजही नाही. देवळात पुरेशी स्वच्छता आढळत नाही. यात्रेकरूंची राहाण्या जेवण्याची सोय येथे नाही.
नागपंचमीच्या दिवशी होणा-या व गारूडयांच्या व नागांच्या खेळासाठी प्रसिध्द असलेले जे बत्तीस-शिराळे नावाचे गाव, तेच हे शिराळे.
शिराळे येथील महादजी साबाजी देशपांडे हे समर्थांचे शिष्य बनले होते. त्यांच्या आग्रहास्तव समर्थांनी शके १५७६ च्या सुमारास येथील मारूतीची स्थापना केली. पूजेअर्चेची जबाबदारी समर्थांनी देशपांडे यांच्यावर सोपविली.
अकरा मारूतींच्या देवळात सर्वांत सुरेख देऊळ शिराळयाच्या मारूतीचे असे काही लोक मानतात. देवळाचा वरचा कळस फार चांगला रंगविला आहे. समर्थांनी मुळात एक कमान बांधून तीत मारूतीची स्थापना केली होती. नंतर त्यांचे शिष्य जयरामस्वामी यांनी कौलारू मंदिर बांधले. सुमारे शंभर वर्षापूर्वी जठार नावाच्या मारूतीभक्त मामलेदारांनी दगडी देऊळ बांधून घेतले. सुमारे तीन वर्षांपूर्वी सध्याच्या ट्रस्टींनी कळस, मंडप वगैरेची दुरूस्ती करून घेतली. भक्तमंडळीनीही हया दुरूस्ती खर्चास हातभार लावला.
हे देऊळ उत्तराभिमुख आहे व मूर्तीचे तोंडही उत्तरेकडे आहे. ही वीरमारूतीची मूर्ती आहे. तिची उंची सुमारे सात फूट आहे. मूर्तीच्या कंबरपटयांतल्या घंटया, कटिवस्त्र व त्याचा गोंडा सुरेख चितारलेला आहे. मूर्तीच्या मस्तकाच्या डाव्या उजव्या बाजूला झरोके आहेत. त्यातून त्या वायुपुत्राभोवती सतत हवा खेळती राहाते. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी हया झरोक्यांतून मूर्तीवर प्रकाश पडतो व ते दृश्य फार सुदंर दिसते. ही मूर्ती उत्तम चुन्याची बनविलेली आहे.
हया देवळाला दक्षिणेच्या दिशेलाही एक प्रवेशद्वार आहे. देवळात वीज आहे. देवळाजवळून ओढा वाहातो. सभामंडप २२ फूट लांब व १७ फूट रूंद आहे. देऊळ एस.टी. स्टॅण्डजवळ आहे – यात्रेकरूंना देवळाच्या सभामंडपात मुक्काम करता येतो.
मारूतीच्या पूजेची व्यवस्था प्रत्येक वर्षी देशपांडे कुटुंबीयांपैकी एकेकाकडे वाटून दिलेली आहे. ज्यांच्याकडे व्यवस्था असेल त्याला ‘वर्षलदार’ अशी संज्ञा आहे. येथे चैत्र शु. १५ हया दिवशी हनुमानजयंतीचा उत्सव होतो. कीर्तन, जन्मकाळ, भडारा यांच्यायोगे हा उत्सव साजरा केला जातो.
संदर्भग्रंथ – समर्थ स्थापित अकरा मारुती
(लेखक – पु. वि. हर्षे)