नाशिकमधील पंचवटीतील हे एक मुख्य मंदीर. या मंदिराला चारही दिशांनी दरवाजे आहेत. सभोवती १७ फूट उंचीचा दगडी कोट आहे. मंदिरात पाय-या चढून गेल्यावर राम, लक्ष्मण, सीता यांच्या काळया पाषाणाच्या सुमारे २-२ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या सभोवती सर्व बाजूंनी ओव-या आहेत. मधील पटांगण २४५ फूट लांब व १०५ फूट रूंद आहे. मंदिरापुढे मोठा सभामंडप आहे. त्यात १२ फूट उंचीचे ४० खांब आहेत. त्यात पश्चिमाभिमुखी मारूतीची काळया पाषाणाची मूर्ती आहे. इ. स. १७७८ साली सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदीर बांधण्यास सुरुवात केली असे कागदपत्रावरून कळते. काळयारामाचे हे वैभवशाली मंदीर ओढेकर जहागिरदारांनी बांधले आहे. १७८२ साली त्याच्यावर कळस चढला. येथे चैत्र शु. १ पासून चैत्र शु. ९ रामनवमीपर्यंत उत्सव साजरा होतो. चैत्र शु. ११ ला एका रथातून रामाची स्वारी व दुस-या रथातून मारूतीची स्वारी निघते. हा रथाचा सोहळा पहाण्यासारखा असतो.
रथ यात्रा –
लक्ष्मण आणि सीता समवेत श्रीराम असलेले – ‘काळाराम मंदीर’ पंचवटीच्या परिसरामधे, चैत्र प्रतिपदेपासून तो चैत्र पौर्णिमेपर्यंत असा १५ दिवस श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करतात. दुपारी ठीक १२ वाजता जन्मोत्सव सुरू होतो. हजारो यात्रेकरू या मंगलसमयी हजर राहतात. पंचवटी येथील श्री. काळाराम मंदीर संस्थानामार्फत हा जन्मोत्सव साजरा होतो. नवमीनंतरच्या दुस-या दिवशी देवळाच्या पूर्व दरवाजामधून निघणारी भव्य रथयात्रा हे जन्मोत्सवातील आकर्षण. सा-या नाशिक गावामधून ही यात्रा भ्रमण करते. साधारणपणे दुपारी ४ वाजून ३० मिनीटांनी निघणा-या या मिरवणुकीमधे ‘श्रीराम रथ’, तसेच ‘गरूड रथ’ देखील असतात. श्रीमंत पेशवे यांनी इसवी सन १७८५ मधे, श्रीराम रथ करविला. हा रथ बराच वजनदार असून त्या काळी तो श्रीमंतांनी सरदार रास्ते यांच्याकडे सोपविला. यात्रेच्या आधीची रोषणाई, तसेच रथाची डागडुजी यांच्या पोटी दरवर्षी दोनशे रूपयांचा निर्वाह खर्च त्या काळी दिला जात असे. काळाच्या ओघात हा निर्वाह खर्च देखील आज कितीतरी पटींनी वाढला आहे. ‘राम रथा’ची व्यवस्था ही पंचवटी येथील रास्ते आखाडयावर सोपविली आहे. या आखाडयातील स्वयंसेवक या रथाची संपूर्ण जबाबदारी घेतात. दुसरा रथ म्हणजे, ‘गरूड रथ’, हा श्री काळाराम मंदीर संस्थानच्या मालकीचा आहे.
उंची व वजनाने देखील हा रथ रामरथापेक्षा जरा लहानखुरा आहे. यात्रेच्या दिवशी श्री. अहिल्या राम व्यायामशाळेमार्फत, ‘गरूड रथा’ची सर्व काळजी घेतली जाते. अहिल्या राम व्यायाम शाळेतील विद्यार्थी व स्वयंसेवक आपणहून या दिवशी पुढे येतात व यात्रेमधे नेटाने झटतात. कै. श्री. दिगंबर दिक्षित यांच्याकडे ‘गरूड रथा’चे नेतृत्व इ. सन १९४० पर्यंत होते. फक्त एकदाच एका यात्रेकरूला प्राण संकटातून वाचवण्याचा प्रकार वगळल्यास, एरवी कुठलाही अनुचित प्रकार न घडता, श्री. दिगंबर दिक्षितांच्या समर्थ नेतृत्त्वाखाली, शिस्तबध्द रितीने रथ यात्रेचे आयोजन होत असे. या दुर्घटनेत रथाचे चाक त्यांच्या मांडीमधे घुसले, आणि ५ दिवसांनंतर त्यांचा अंत झाला. त्यानंतर रथाचे नेतृत्त्व इ. सन. १९४१ मधे, त्यांच्या मोठया मुलाकडे, श्री. बाबूरावजी दिक्षितांकडे गेले. श्री. बाबूरावजी दिक्षित यांच्या समर्थ नेतृत्त्वामुळे, रथ यात्रेमधे नेटकेपणा आला, शिस्त आली. त्यांच्या निधनानंतर इ. सन. १९९९ मधे श्री. गोविंदराव दिक्षित यांनी रथाचे नेतृत्व आपल्याकडे घेतले. एकूण ५ कडयांनी मिळून ही रथयात्रा सजते. सनई, चौघडा वाहून नेणारी बैलगाडी, दुस-या कडयामधे प्रभु रामचंद्रांची पालखी, मग त्यामागून येणारे पूजाधिकारी, मग गरूड रथ आणि सरते शेवटी श्रीराम रथ या यात्रेमधे असतो. रथाभिमुख उभे राहून, दोन्ही हातांनी वंदन करून, संपूर्ण दिवसभर पूजाधिकारी हा, या रथ यात्रेबरोबर चालत जातो. चैत्र प्रतिपदेपासून रथयात्रेच्या दिवसापर्यंत तो उपवास करतो. निरनिराळया संस्थांमधून आलेले रथ सेवक हे, एका मजबूत दोरखंडाच्या साहाय्याने दोन्हीही रथ ओढतात. या रथांना ‘धुरी’ म्हणजे, एक मोठा गोलाकार लाकडी दंड जोडलेला असतो. ज्या यात्रेकरूंची देवळातला जन्मोत्सव पाहण्याची संधी हुकली आहे, त्यांना सारा दिमाखदार सोहळा पाहता यावा, हा या रथ यात्रेमागील हेतू आहे. या रथ यात्रेस दरवर्षी हजारोंनी भाविकांची गर्दी उसळते. श्रीरामांच्या प्रतिमेस गंगा स्नान घालतात. ‘अवभृत स्नाना’करिता गोदावरीच्या काठावर ही रथ यात्रा २ तासांकरिता थांबते. पावन राम-घाटापाशी हा स्नान-समारंभ पार पडत असताना फटाक्यांची आतषबाजी, आणि रंगीबेरंगी भुईनळया यांनी सारे वातावरण दुमदुमून जाते. या यात्रेची सांगता, जिथून सुरू झाली तिथेच म्हणजे, ‘काळाराम मंदिरा’पाशी खूप उशीरा म्हणजे रात्री २ वाजता होते.
http://shrikalaramsansthannashik.org