समर्थ स्थापीत ११ मारुती
क-हाड-मसूर रस्त्यावर सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर शहापूरचा फाटा आहे. मारूतीचे मंदिर मुख्य सस्त्यापासून दोन फर्लांग तरी आत आहे. शहापूर गावाच्या एका टोकाला नदीतीरावर हे मंदिर आहे.
येथील मारूतीची मुर्ती नेमकी कशाची बनविली आहे हे सांगता येत नाही, पण ती चुन्याची बनविलेली आहे असे मानले जाते. मुर्तीची उंची सुमारे ६ फुट आहे. हया मारूतीला ‘शहापूरचा चुन्याचा मारूती’ असेच म्हणतात. मूर्तीचा चेहरा उग्र वाटतो. मारूतीच्या डोक्याला गोंडयाची टोपी आहे. देऊळ आणि मूर्ती पूर्वाभिमुख आहे. देवळाला तीन चौकटी आहेत. मूर्तीच्या पूजेची व्यवस्था शहापूरकर कुलकर्णी घराण्याकडे आहे. येथे चैत्र शुध्द १५ हया तिथीला दरवर्षी हनुमानजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. हया देवळात मारूतीची वीतभर उंचीची एक पितळेची उत्सवमूर्ती आहे. चाफळ येथील रामनवमीच्या उत्सवात ही मूर्ती तेथे असणे आवश्यक असते.
समर्थाच्या अकरा मारूतींपैकी हा मारूती कलानुक्रमे पहिला मानला जातो. शके १५६६ मध्ये त्याची स्थापना झाली.
हया मूर्तीच्या स्थापनेबद्दल एक अख्यायिका आहे, ती अशी-
शहापूर हे गाव आदिलशाहीत होते. तेथील बाजीपंत कुलकर्णी हे देवभक्त होते. कुलकर्णी आपल्या कामात चोख असत. समर्थाचा मुक्काम त्यावेळी तेथूनच जवळ असलेल्या चंद्रगिरी डोंगरावर असायचा व ते शहापुरात माधुकरी मागायला यायचे. ते बाजीपंत कुलकर्ण्यांच्या घरासमोर ‘जयजय रघुवीर समर्थ’ असे शब्द उच्चारून भिक्षा मागायला उभे राहात, तेव्हा बाजीपंताची पत्नी सतीबाई हिला ते आवडत नसे. ती समर्थाना ‘गोसावडा ‘ म्हणायची आणि त्यांना भिक्षा वाढलीच तर तणतणत येऊन नाइलाज असल्यासारखी वाढायची हा क्रम असाच चालला असता एक दिवस समर्थांना त्या घरातले वातावरण दु:खी वाटले. बाई सुध्दा तणतणत आल्या नाहीत. समर्थांनी चौकशी केली तेव्हा त्यांना घरातल्या मंडळीनी सांगितले की बाजीपंत कुलकर्ण्यांना गावकीच्या हिशोबाच्या संबंधात मुसलमानांनी पकडून विजापुरास नेले आहे म्हणून सर्व मंडळी काळजीत आहेत. तेव्हा समर्थ सतीबाईना म्हणाले, ‘आजपासून पाचव्या दिवशी बाजीपंत सुखरूप परत आले तर तुम्ही रामनामाचा जप कराल काय?’ सतीबाई म्हणाल्या, बाबारे तसे झाले तर मी रामनामाचा जप एकदा काय, हजारदा करीन’.
समर्थ निघून गेले. ते कारकुनाच्या वेषात आदिलशहा समोर हजर झाले व म्हणाले, ‘बाजीपंताच्या श्वशुरांकडून व पत्नीकडून मी बाजीपंतांचा गावकीचा हिशोब समजावून सांगायला व पुरा करायला आलो आहे. माझे नाव दासोपंत.’ त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचा प्रभाव आदिलशहावर पडला. त्याने आपल्या एका अधिकाऱ्याला ‘दासोपंता’कडून हिशोब समजावून घ्यायला सांगितले. समर्थांनी त्या अधिकाऱ्याला हिशोब नीट समजावून दिला व बाजीपंताची सुटका करून घेतली. सुटका झाल्यानंतर बाजीपंत व ते शहापूरला यायला निघाले. बाजीपंत दासोपंतांना एकसारखे विचारीत, ‘तुम्हाला कोणी पाठविले? श्वशुरांच्या तोंडून तुमचे नाव कधी ऐकले नाही.’ समर्थ त्यांना सांगत, घरी चला. सगळी लोंक तुमची वाट बघत आहेत. तेथे गेलात की कळेल.’ गावच्या वेशीपर्यंत बाजीपंत व समर्थ बरोबरीने चालत होते. नंतर समर्थ हळूच मागच्या मागे निघून गेले. बाजीपंत मागे वळून पाहातात तो दासपंत अदृश्य ! घरी येऊन त्यांनी चौकशी केली, ‘तुम्ही कोणी दासोपंत नावाचा कारकून आदिलशहाकडे पाठविला होतात काय? सतीबाई आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी तर कोणालाच पाठविले नव्हते, मग हा चमत्कार काय झाला? तेवढयात त्यांना दारावर भिक्षा मागायला येणाऱ्या गोसाव्याची आठवण झाली. त्याने सांगितलेले शब्द आठवले. त्याने सांगितलेल्याच नेमक्या दिवशी बाजीपंत सुखरूप घरी आले होते. आता त्यांच्या मनाला चुटपूट लागून राहिली, वाईटही वाटले. त्यांनी व बाजीपंतानी ओळखले की तो साधासुधा माणूस नव्हता, कोणीतरी सिध्द पुरूष होता.
सतीबाई आणि बाजीपंतानी ठरविले की त्या साधूचे पुन्हा दर्शन होईपर्यंत भोजन घ्यायचे नाही. तीन दिवस असेच गेले. समर्थांना अंतज्र्ञानाने कळले. त्या दोघांची दया आली व चौथ्या दिवशी ते त्या घरी आले व त्यांनी घोष केला, ‘जयजय रघुवीर समर्थ.’ सतीबाई धावत आल्या व समर्थाच्या पाया पडल्या व आतापर्यंतच्या आपल्या वर्तनाबद्ल त्यांनी समर्थांची क्षमा मागितली. त्या दोघांनी समर्थांनी अत्यंत आग्रह करून भोजनास ठेवून घेतले. त्यांनी समर्थांची पूजा केली व त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. यानंतर सतीबाईनी नियमच केला की समर्थांचे दर्शन झाल्याशिवाय भोजनच घ्यावयाचे नाही. पंरतु समर्थाची नेहमी भ्रमंती चालू असे, त्यामुळे सतीबाईना वारंवार उपवास घडू लागले. एकदा तर सतत सात आठ दिवस समर्थाचे दर्शन झाले नाही. सतीबाई उपाशी अवस्थेतच समर्थांना शोधीत डोंगरावर गेल्या. तेथे त्यांना गुहेत समर्थ भेटले. समर्थांनी त्यांना तेथे जेवायला ठेऊन घेतले. भोजन तयार करून नैवेद्य दाखविण्यापूर्वी त्यांनी सतीबाईना पाठमोरे बसायला सांगितले, पंरतु सतीबाईनी मध्येच वळून पाहिले तो समर्थाच्या ठिकाणी त्यांना तेजस्वी मारूतीची प्रचंड मूर्ती दिसली. ते तेज त्यांना सहन न होऊन त्या मूच्र्छित पडल्या. त्या शुध्दीवर आल्यावर समर्थ त्यांना म्हणाले ‘तुमच्या थोर पूर्वपुण्यामुळे तुम्हाला आज मारूतीरायांचे दिव्य दर्शन झाले.’
त्यानंतर समर्थानी एक चुन्याची मूर्ती तयार केली व सतीबाईच्याच गावात एका योग्य ठिकाणी तिची प्रतिष्ठापना केली. ते सतीबाईना म्हणाले ‘तुम्हास ज्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले त्या मारूतीरायांच्या हया मूर्तीचे तुम्ही रोज दर्शन घ्या व भोजन करा., माझ्या दर्शनासाठी उपोषण करत जाऊ नका.
सतीबाईंना समर्थांनी स्थापन करून दिलेली तीच ही शहापूरच्या देवळांतली मारूतीची मूर्ती.
हया मारूतीमंदिराची सध्यांची स्थिती विशेष चांगली नाही. दर्शनोत्सुक यात्रेकरूंना मारूती मंदिराशिवाय दुसरीकडे राहण्याउतरण्याची सोय नाही.
संदर्भग्रंथ – समर्थ स्थापित अकरा मारुती
(लेखक – पु. वि. हर्षे)