धबधबे

बर्की धबधबा, कोल्हापूर

Waterfall धरणीमाता हिरावा शालू लेण्यासाठी पावसाची वाट पहात असते. डोंगरदर्‍यांमध्ये पडणारा धुवाँधार पाऊस, त्यामुळे डोंगरकपारीमधील छोटया-मोठया कपारीमध्ये निर्माण होणारे ओहोळ आणि हे ओहळ कोसळल्यामुळे त्याचे झालेले धबधब्यातील रुपांतर, त्याचा झुळझुळणारा खळाळत जाणारा आवाज आपल मन गुंतवून टाकतो. आणि हे पाणी सर्व डोंगरदर्‍यांना हिरवा शालू कधी लपेटून देतो, ते आपल्याला कळतच नाही.

कोल्हापूरनगरी महालक्ष्मीचे अधिष्ठान, शिवरायांची स्नुषा ताराराणी त्यांनी स्थापन केलेली मराठयाची ही नगरी म्हणजे कोकण आणि घाट माथा यांचा सुंदर संगम आहे. पर्यटकांना भुरळ घालतील अशा अनेक स्थळांचं आगर या जिल्ह्यात आपणाला येण्याचा आग्रह करीत आहे. अशाच एका पावसाळी पर्यटन स्थळा विषयी जाणून घेऊ.

निसर्गाची ओढ मानवी मनाला नेहमीच भुरळ घालत आलेली आहे. पावसाळ्यात तर निसर्गाचे सौंदर्य नेहमीच खुलते. हिरवाई, ऊन-पावसाचा लंपडाव, येणारी एखादी सर, गवताच्या पात्यावरचे दवबिंदू, त्यावर पडलेले सोनेरी किरण मनाला मोहवतात. शाहुवाडी जवळील बर्की या छोटयाश्या गावाजवळ सह्याद्रीच्या रांगामध्ये हा धबधबा निर्माण झालेला आहे. या परिसरात हा बर्की धबधबा म्हणून ओळखला जातो. पावसाळी पर्यटनाचे बेळगाव, सांगली, कोल्हापूर परीसरातील पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे. हजारो पर्यटक दरवर्षी येथे स्नानाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत असतांना, धबधब्याखाली भिजणे, म्हणजे स्वर्गीय अनुभव आहे. निसर्गाचा मुक्त अविष्कार पाहून आपले मन प्रसन्न होते. आणि एक वेगळी ऊर्जा पुन्हा आपली नेहमीची दैनंदिन कामे करण्यास यामुळे प्राप्त होते.

कोल्हापूरपासून ५६ कि. मी. अंतरावर हा धबधबा आहे. या ठिकाणी बाजारभोगाव- करंजफेणमार्गे किंवा मलकापूर-येळवण यामार्गे येथे आपण पोहोचू शकतो. धबधबा पाहण्यासाठी मात्र ३ कि. मी. पायी जावे लागते. धबधब्याकडेही जात असताना हिरवे डोंगर, दर्‍या, ओढे-नाले, डोलणारी झाडे-फुले-पाखरे अशी निसर्गाची किमया आपल्या दृष्टीस पडते. दाट जंगलातून पायी जात असतांना छोट-छोटे ओढे पार करताना होणारा पाण्याचा स्पर्श; एक वेगळी अनुभूती देतो.

Kolhapur Mahalaxmi भरपावसात अंगाला येणारा घामाचा दर्प, शिणवटा मात्र हा निसर्ग पहात असतांना कुठल्याकुठे दूर पळून जातो, ते कळतच नाही. मात्र यावेळी एक खबरदारी घ्यावी लागते. ती म्हणजे, वाटेत पाण्यातील जळवापासून सावध राहिले पाहिजे. धबधब्याजवळ पोहचताच शुभ्र जलधारा पाहून आपलं मन मोहरुन तर जातच, रसिक माणसांच्या मनात तर काव्यपंक्तीच येतील अशी, ही निसर्गाची किमया आहे. डोळ्याचे पारणे फिटेल असे हे, दृश्य मनाला उभारी देते. पर्यटक क्षणभर हे दृष्य पाहून थक्कच होतात.

कोसळणार्‍या पाण्याच्या संगीतावर येणारे विविध पशु-पक्ष्यांचे आवाज एका वेगळ्याच संगीताची निर्मिती करत असतात. त्यातच सदाहरीत वृक्षवेलींनी चौहो बाजूंनी दिलेला वेढा, असे हे सारे वातावरण आपणाला एक वेगळीच ऊर्जा देत, मन ताजेतवाने करते.

शाहुवाडी तालुक्यातील फारशी वर्दळ नसलेले हे ठिकाण पावसाळ्यातील चार महिने पर्यटकांना आकर्षित करत असते.

Location Icon

मोहिली धबधबा

Waterfall पावसाळ्यात उंच डोंगरमाथ्यावरून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे पाहण हे पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असतो. कर्जत तालुक्याला निसर्गाने “मोहिली धबधबा ” हे देणं दिलं आहे.

मोहिली धबधबा हा कर्जत पासून ६ ते ७ कि. मि लांब आहे. उल्हास नदी पार करून प्रत्यक्ष मोहिलीत प्रवेश होतो. डोंगरावरून भिरभिरणारा वारा, हिरवीगार वनराई, तेथून दिसणारा आजूबाजूचा निसर्ग असे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून ठेवावे असे वाटते. डोंगरमाथ्यावरून मुंबई – पुणे रेल्वेचा रस्ताही दिसतो. धबधब्याजवळ पर्यटकांची हॉटेल्स आहेत. मोहिली धबध्ब्याजवळ थंड वातावरणात गरम-गरम वाफाळता चहा आणि मक्याची कणसे खाण्याची मजाच काही और आहे असे इथे येणारे पर्यटक सांगतात. यापुढे ७ -८ कि. मी. दूर गेल्यास कोंडाणा परिसरातही अनेक धबधबे आहेत.

कसे जाल ?
नाशिकहून कल्याणमार्गे कर्जतला जावे. कर्जत स्टेशनवरून श्रीराम पुलावरून रिक्षाने मोहलीकडे जाता येते. स्वतःचे वाहन असेल तर अधिक सोयीचे.