मध्यंतरी ‘Do flowers fly’ नावाची डॉक्युमेंटरी पाहण्यात आली. अॅनिमेशन तंत्राने केलेली ही जेमतेम पाच मिनिटांची फिल्म. या फिल्ममधील छोटा मुलगा. जगाविषयीचे अपार कुतूहल डोळ्यांत वागविणारा. पाऊस कसा पडतो? इंद्रधनुष्य कशामुळे दिसतं? अळीचं फुलपाखरू कसं होतं? पक्षी त्यांच्या पिल्लांना कसं भरवितात? अशा अनेक गोष्टींकडे कुतूहलाने पाहणारा. त्यामागचं रहस्य समजून घेणारा, पण शाळेत जाऊ लागतो आणि स्वत:च्या स्वप्नवत जगातून दाणकन व्यवहाराच्या जमिनीवर आपटतो. वर्गातील घोकंपट्टी पोपटपंचीसारखं लिहिणं नाही तर ऐकणं या चाकोरीत त्याच्या डोक्यातील प्रश्नचिन्हे मनातच विरतात. पालकांनाही हवा असतो पदके मिळविणारा, चमकणारा मुलगा. घरी पालक व शाळेत शिक्षक हे मोठे मासे त्याचे बाल्यच गिळू पाहतात. हळुहळू आपल्याला तोंड हा अवयव आहे, याचाच त्याला विसर पडतो. आज अनेक मुलांची कमी-जास्त प्रमाणात अशीच स्थिती झालेली दिसते.
यामुळे थोडी चाकोरी सोडून विचार करणा-या पालकांच्या व शिक्षण क्षेत्रात काम करणा-या कार्यकर्त्यांच्या मनात शिक्षणाविषयीचे अनेक प्रश्न निर्माण होतात. मूल शिकतं म्हणजे नेमकं काय होतं? ते कसं शिकतं? कुठे वसतं हे शिक्षण? पाठय़पुस्तकात की अनुभवांच्या उघडय़ा पुस्तकात? ते जर शिक्षण असेल तर ते एक ‘बेट’ असतं की, जीवनाची उघडी शाळा? असतो का त्या शिक्षणाचा संबंध जीवनाशी शाळेबाहेरच्या जगाशी- ‘बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरू’ म्हणणा-या ‘त्या’ शाळेशी. पण या प्रश्नातच अडकून न पडता उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नातून नाशिकमध्ये १२ वर्षांपूर्वी ‘आनंद निकेतन’ शाळेची सुरुवात झाली. मग ‘हमसफर मिलते गये, कारवाँ बनता गया’ या उक्तीनुसार काम करणारा गट वाढत गेला.
अभ्यास विषय, अभ्यासक्रम, इयत्तावार विषयरचना ही चौकट मोडायची नाही, पण चौकटीचं कुंपणही करायचं नाही. तिला थोडा थोडा धक्का देत आतील अवकाश वाढवत न्यायचा. त्या अवकाशाची पोकळी न बनवता त्यात आशयही भरायचा. शिक्षकांची व मुलांची सृजनशीलता, कल्पकता, स्वातंत्र्य, व्यक्त होण्याची उर्मी, संवेदनशीलता यांना खतपाणी घालत, इथे शिकवणारे कोणी नाही, शिकणारे मात्र अनेक आहेत, असं वातावरण कायम जोपासायचं, हा येथील सर्व प्रयासामागचा मूळ गाभा आहे.
आज शिक्षण क्षेत्रात ‘ज्ञानरचनावाद’ या संकल्पनेची मोठी चर्चा आहे. विद्यार्थी हा निष्क्रिय श्रोता नसून ज्ञानाचा रचयिता आहे आणि शिक्षक या प्रक्रियेचा सहाय्यकर्ता, फॅसिलिटेटर आहे, हे ज्ञानरचनावादाचे मुख्य सूत्र आहे. हे सूत्र ज्ञानरचनावादाचा अभ्यास न करताही आम्ही प्रथमपासूनच अमलात आणले. शालेय, शालाबाह्य व सहशालेय उपक्रमांतून मुलांना वेगवेगळे अनुभव देणं, यातून त्यांचा जीवनाशी संबंध जोडणं व जे शिकवायचे आहे ते सहजतेने शिकले जाईल याची व्यवस्था करणं असं साधं-सोपं तंत्र या १२ वर्षांच्या वाटचालीतून विकसित झालं. या तंत्रातील काही मंत्र शिक्षक व पालक यांच्यापर्यंत पोहोचवावे, या हेतूने आम्ही हे पाक्षिक सदर लिहित आहोत.
आज एकीकडे शाळेच्या भिंतीबाहेर आहे रंगीबेरंगी, विविधतेने, चमत्कृतींनी भरलेले जग आणि भिंतींच्या आत आहे संवेदनांचा कोंडवाडा, शिस्तीचा बडगा. हे बाहेरचे जग आत आणता आलं तर? आतलीही दुनिया रंगाने न्हाईल. आमचा प्रयत्न हाच आहे- ‘गप्प बस, बोलू नको’ ही वाक्ये हद्दपार करून कुतूहलाला मुक्त वाट देण्याचा.
या सदरातील अनुभवांना संदर्भ आहेत, आमच्या शाळेत झालेल्या प्रयोगांचे. पण अर्थात असे प्रयोग पालकांनाही अनुकरणीय वाटू शकतात. पालकांना त्यातून नवनव्या कल्पना सुचू शकतात. घर ही मुलांची पहिली प्रयोगशाळा असते. पालकांनी मुलांच्या कुतुहलाला खतपाणी घालण्याचा दृष्टिकोन अंगिकारला तर असे प्रयोग घरोघरी होऊ शकतात. ‘समूह शिक्षण’ हा घटक मुलांसाठी प्रभावी ठरतो. त्यामुळे स्वत:च्या मुलासोबत त्याच्या भावंडांना, मित्र-मैत्रिणींना घेऊन असे काही प्रयोग करून पाहता येतील. त्यामुळे मुलांचं शिकणं-वाढणं नैसर्गिक आणि आनंददायी होईलच, पण पालकत्वाचं समाधानही आपण अधिकाधिक घेऊ शकाल.
आमचे हे जे प्रयास आहेत, ते या मार्गावर चालू पाहणा-या शिक्षकांपर्यंत व पालकांपर्यंत पोहोचावेत, हा या लेखनामागील हेतू आहे. कारण चौकट शासनाची मानायची का खासगी व्यवस्थापनाची यावर शिक्षकाचे नियंत्रण नाही, पण वर्गखोली हे शिक्षकाचे क्षेत्र आहे. आणि घर हे पालकांचे. मुलापर्यंत काय पोहोचवायचे, कसे पोहोचवायचे, हे स्वातंत्र्य शिक्षकाला व पालकाला घेता येते.
मुलांच्या शैक्षणिक संगोपनात सहभागी असणा-या सर्वाची ‘हे फूल त्याच्याच रूप, रस, गंधानुसार फुलवायचं’, अशी भूमिका असेल तरच या घडणीच्या प्रयासांना गती मिळू शकते. शेवटी प्रत्येक पालक हा शिक्षकाचीही भूमिका बजावत असतो आणि शाळेत शिक्षक हा मुलाचा पालकही असतो. त्यामुळे या भूमिकांमधील द्वैत जेथे संपेल, तेथेच गुलाब गुलाबासारखा फुलेल.. कमळ त्याच्या धुंदीत उमलेल.
– शोभना भिडे, मुख्याध्यापक – आनंदनिकेतन