लेख १ | असे पुस्तक असलेच पाहिजे | लेख ७ | टी.व्ही.वरचा सुंदर कौटुंबिक कार्यक्रम |
लेख २ | फळांची तोड - एक रम्य अनुभव | लेख ८ | सुपरमार्केट शॉपिंग गाईड |
लेख ३ | बॅकपॅकर्स | लेख ९ | न्युझीलँड मधील ’सॅंटा परेड’ मिरवणुक |
लेख ४ | गराज सेल - एक उपयुक्त संकल्पना | लेख १० | धार्मिक स्थळ |
लेख ५ | रस्ते कसे ओलांडाल? | लेख ११ | वृक्षवल्ली |
लेख ६ | वाचाल तर वाचाल | लेख १२ | कृती करूया |
लिंकन रोडवरील भर रहदारीच्या रस्त्यावर संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर गाडयांची ही… भली मोठी रांग लागलेली होती. कुठे ऍक्सीडेंट झाला का काय? दहा मिनिटे कुणीही हॉर्न न वाजवता शांतपणे थांबून राहिलेले होते. बाहेर डोकावून पाहिले तर अगदी गमतीशीर दृश्य पहायला मिळाले. एक बदकी व तिची तीन पिल्ले निवांतपणे रस्ता ओलांडत होती. पिल्ले अगदीच लहान असल्यामुळे हळु हळु चालत होती. शिवाय खेळकरपणामुळे कुठे मागेच जा, परत पुढे जा, मधेच थांबून रहा असले पिल्लांचे उद्योग चालू होते. आई त्यांना चोचीने ढोसून पुढे जायला लावत होती. पण शेवटी त्यांच्या त्यांच्या सवडीने मंडळी रस्ता पार करून गेली. रस्त्यातला वाहतुक खोळंबा संपला.
हे दृष्य पाहिल्यावर मनात आले.. काय चैन आहे या पक्षांची! न्यूझीलँडमधे प्राणी आणि पक्षांची चैन आहे ही गोष्ट खरीच.
कोणत्याही पार्कमधे जा. तिथे असलेले प्राणी व पक्षी अगदी मुक्तपणे विहार करीत असतात. वेस्टर्न स्प्रिंग्ज नावाचे पार्क तर प्राणि आणि पक्षी यांच्याच मालकीचे. ऑगस्ट महिन्याच्या सुमारास या बागेतील बदके, राजहंस, ससे, टिल , गीज सगळ्यांना पिल्ले होतात. पार्क या पक्षांच्या पिल्लांनी भरून जातो. आई-बाबा आणि मधे पिल्ले अशी कुटुंबेच्या कुटुंबे पार्कभर विखुरलेली असतात. लहान मुले मोठी माणसे त्यांना पाव खायला घालत असतात. पक्षीही अजिबात न घाबरता आपल्या जवळ येतात. राजहंस तर हातातूनसुद्धा पावाचे तुकडे घेतात.
गायी, मेंढयांचे कळप निर्धास्तपणे चरत असतात. त्यांना कुणीही त्रास देत नाहीत. कुत्र्यांना मोकळेपणी फिरण्यासाठी राखीव जागा असतात. इतरत्र मात्र त्यांना साखळी बांधलेली असलीच पाहिजे. खेडेगावात लोक हौशीने घोडेही पाळतात. शेक्स्पियर पार्कमधे तर भरपूर मोर आहेत. मोकळेपणी हिंडणारे मोर भारतातही कधी पहायला मिळालेले नव्हते. दिसले होते ते बेलबागेत किंवा पेशवेपार्कच्या पिंज-यात. समुद्रावर फिरायला गेले तर सीगल, शियर वॉटर या पक्षांचे थवेच्या थवे दिसतात. लोकांनी टाकलेले फिश व चिप्स यांचे तुकडे टिपत असतात. या भूमीवर रहाण्याचा माणसांइतकाच अधिकार या सर्वांना आहे हे जाणवते. त्यांना कुणीही दगड मारीत नाहीत. रस्ते ओलांडताना “राइट ऑफ द वे” म्हणजे पहिला मान प्राणी व पक्षी यांचा! इथे आलेले लोक म्हणतात ” सुख हवे असेल तर कुत्र्यामांजराचा जन्म घ्यावा आणि न्यूझीलँडमधे जन्माला यावे. लाडच लाड”.
“रोड कोड” या वाहतुकीच्या नियमांच्या पुस्तकात स्पष्ट शब्दात नियम लिहिलेले असतात की गायी, घोडे, बदके जर रस्त्यावरून जाताना दिसली तर रस्त्याच्या कडेला जाऊन, वेग कमी करायचा व त्यांना पुढे जाऊ द्यायचे. जिथून गायी, घोडे, मेंढया, बदके इत्यादी रस्ता ओलांडण्याची शक्यता आहे, अशा जागी निर्जन रस्त्यांवरसुद्धा बोर्ड लावलेले असतात व त्या त्या प्राण्यांचे चित्र काढलेले असते.
प्राणी पक्षांची जी जपणूक, तीच झाडांची सुद्धा. फळा-फुलांनी ओसंडलेली झाडे शहरात, बागांमधे, समुद्रकिनारी आढळतात. गुलाबाच्या टपो-या कळ्यांचे ताटवे रस्त्याच्या कडेला असले तरी कुणीही चुकूनही फुले तोडत नाहीत. पाच डॉलरला एक गुलाब विकत घेऊन फुलदाणीत ठेवतील किंवा कुणाला प्रेमाने भेट म्हणून देतील. सिटीकाउन्सिल रस्त्यावर लावलेल्या झाडांची निगा राखते. रस्त्याच्या कडेचे गवत कापते. मोडलेल्या फांद्या कापून नेते. एखादे झाड धोकादायक वाटल्यास Park in Newzeland त्याविषयी पूर्ण चर्चा होऊन ते झाड कापले गेले तर त्याजागी दुसरे झाड लावण्याची जबाबदारी पार पाडते. आमच्या घरासमोरची दोन झाडे नीट वाढत नव्हती. ती सिटी काउन्सिलने कापली. घरी आल्यावर पाहिले तर एक चिठ्ठी होती. “ही दोन झाडे या या… कारणासाठी कापलेली आहेत. त्या जागी अमुक अमुक तारखेला अमुक अमुक झाडे लावली जातील. याबद्दल तुम्हाला काही म्हणायचे असले किंवा तक्रार असेल, तर अमुक अमुक नंबरला फोन करा.” आम्ही तारीख विसरून गेलो होतो. पण घरी आल्यावर एके दिवशी जशी अचानक झाडे नाहीशी झाली तशीच एके दिवशी अचानकपणे दोन टवटवीत हिरवीकंच झाडे दारासमोर लावली गेली होती.
उन्हाळा सुरू झाला की पारनेल नावाच्या एका भागातील गुलाबांची बाग बहरते. बहरते म्हणजे अक्षरश: हजारो प्रकारच्या रंगीत, सुगंधी फुलांनी बाग डवरते. आणि “गुलाब महोत्सव” साजरा केला जातो. स्पेशल बसेसने, प्रवासी गाडयांतून हजारो लोक या बागेत येतात. फुलांसमवेत फोटो काढतात. गुलाबाची रोपे विकत घेतात. चित्रकार झाडाफुलांची, निसर्गाची चित्रे बागेमधे विक्रीसाठी मांडतात. या गुलाब महोत्सवामधे एखाद्या बाकडयावर किंवा हिरवळीवर बसून डोळे मिटून बसायचे. हवेत भरलेला गुलाबाचा सुगंध वारा हलकेच तुमच्यापर्यंत पोचवतो. ते सुखाचे क्षण अनुभवायचे.
घर बांधणे, फर्निचर वगैरेंसाठी झाडे वाढविली व कापली जातात. पण त्यासाठी सरकारी परवाना आधीच घेतलेला असतो. याबाबतची एक केस फार बोलकी आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ हा एक धंदेवाईक बिल्डर. त्याच्या कंपनीने घरे बांधण्यासाठी एक प्लॉट विकत घेतला. त्या प्लॉटमधे “पोहुटुकावा” नावाचे एक भले थोरले प्राचीन झाड होते. पोहुटुकावा हे न्यूझीलँडमधले “ख्रिसमस ट्री” म्हणून मानले जाते. घरांचे बांधकाम करण्यासाठी या प्लॉटमधील प्राचीन सुंदर झाड शॉने सिटी काउन्सिअलची परवानगी न घेताच कापून टाकले. त्याबद्दल त्यांच्यावर खटला भरला गेला. आसपास रहाणा-या नागरिकांनी निषेध नोंदवला. इतके सुंदर झाड पुन्हा दिसणार नाही व आमचे हे सुख हिरावून घेतल्याबद्द्ल शॉ यांना शिक्षा झालीच पाहिजे असा लोकांनी आग्रह धरला. याआधीही झाड तोडण्याचा गुन्हा त्यांनी दोनवेळा केलेला असल्याचे निष्पन्न झाले व एक झाड तोडल्याबद्द्ल ८०,००० (ऎंशी हजार डॊलर) दंड, याशिवाय २०,००० (वीस हजार डॊलर) झाडांची रोपे विकत घेऊन ती जागोजागी लावण्यासाठी ही आर्थिक शिक्षा झाली. लोकांसमोर बोलावून त्यांना त्या परिसरातील लोकांची माफी मागावी लागली. शिवाय रोपे लावण्याच्या उपक्रमात त्यांनी स्वत: जातीने हजर राहिले पाहिजे असेही त्यांना बजावण्यात आले. त्यांनी जनतेची विनाशर्त माफी मागितली. इतकेच नव्हे आता शॉनी बिल्डरचा धंदाच बंद केलेला आहे!
भारतात काय घडते आहे? जंगले नाहीशी होत गेल्याबद्दल पर्यावरणवादी नेहमी तक्रार करीत असतात. भुरट्या चोरांपासून ते चंदनतस्कर “वीरप्पन” यांची नुसती चलतीच नव्हे तर त्यांचेच राज्य आहे असे म्हंटले पाहिजे. जंगले कापली गेली म्हणून वाघ आणि बिबटे आसपासच्या वस्तीवर जाऊन गाया-गुरे-माणसे मारू लागले. भर दिवसा पुण्याच्या कर्वे रोडवर बिबटया अवतरला आणि लोकांची चांगलीच तंतरली. ज्या गायीला हिंदू पवित्र मानतात त्या गायांचे खपाटीला गेलेले पोट पाहून करुणा निर्माण होते. गायीचे प्रचंड फुगलेले पोट पाहून आश्चर्य वाटत असतानाच त्या गायीच्या पोटातून अनेक किलो वजनाच्या प्लास्टिकच्या पिशव्या निघाल्याची बातमी वर्तमानपत्रात आली. रस्त्यातून कोंबडयांना ज्या पद्धतीने सायकलला उलटे बांधून नेले जाते ते पाहून कोंबडया कापण्या आधीच मरत असतील असे वाटते. गायी-गुरे, कुत्री यांना दगड मारणे, गणेशोत्सवात बैलांना दारू पाजून मिरवणुकीतून २४-२४ तास ताबडविणे….. हे सगळे पाहिले की वाटते आपल्या धर्माची शिकवणूक गेली तरी कुठे? गायींना “गोधन” मानणारे आपण गायींची देखभाल करताना मात्र का कचरतो? झाडांना देव मानणारे आपण झाडे कापताना एकदम आपला धर्म कां विसरतो? शिवाजीमहाराजांनी जंगलाची कशी काळजी घेतली पाहिजे याविषयीचे लेख आपण फक्त “इतिहासाचे धडे” म्हणूनच वाचायचे कां? भारतातल्या ज्या जंगलावर जिम कॉर्बेटसारख्या ब्रिटिशांनी मनापासून प्रेम केले त्या आपल्या जंगलाच्या तोडी थांबविण्यासाठी “चिपको” आंदोलन करायला भारताच्या स्वातंत्र्यानंतर ४५ वर्षांनी वेळ यावी? ज्या चिऊच्या गोष्टींनी तुम्हा-आम्हासारख्यांची बालपण घडली त्या चिमण्यांचे अस्तित्वच शहरातून नाहीसे झाल्याबद्दलचे उदास करणारे श्रीकांत इंगळहळ्ळीकरांचे लेख वाचून खिन्न व्हायचे?
हे सगळे पाहिले की वाटते तुकारामांनी लिहिलेला अभंग “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती” भंग करण्याचे व्रतच आपण घेतलेले आहे कां?
नाही! आपण आपल्या संस्कृतीविषयी फक्त बोलतो आहोत. त्या वाटेने चालायला सुरुवात करायला हवी. चला तर मग. वाट कशाची पहाता? शुभस्य शीघ्रम. आपली जन्मभूमी पुन्हा एकदा सुजलां-सुफलां होईल यासाठी शरिर-मनाने सज्ज होऊ या. आपल्या परिसरातील झाडांची काळजी घेऊया.
– सौ. कल्याणी गाडगीळ, न्युझीलँड