मासिक सदरे


धार्मिक स्थळ

chappals ऑकलँडमधील भारतीय मंदिर हे बालमोराल रोडवर ११ वर्षांपूर्वी उभारले गेले. शहराच्या मध्यवर्तीची बस, रेल्वे, बागा या सगळ्यांच्या द्रुष्टीने सोयीची अशी ही भरवस्तीतील जागा. मंदिराच्या स्थापनेनंतर हळुहळु आसपास भारतीयांची वस्ती वाढत गेली. आता जवळपासच्या सगळ्या घरांत भारतीयांचेच प्राबल्य आहे. रोज मंदिरात होणा-या आरतीला, तसेच वर्षभर चालणा-या अनेक सणा-वारांना भारतीयांची हजेरी लक्षणीय आहे. बालमोरालवरील मंदिराप्रमाणेच इथे अनेक मंदिरे आहेत. खरे तर आम्ही भारतात असताना आयुष्यभरात जितक्यावेळा गेलो असू त्यापेक्षा कित्येक पटींनी इथल्या विविध मंदिरात जातो.

जागोजागी उभारलेल्या चर्चमधेही इथे आल्यावर बरेचदा जाण्याची वेळ आली. कधी कुणा बाळाचा बातिस्मा म्हणून, तर कधी ख्रिसमसनिमित्तच्या “मिडनाइट मास”च्या निमित्ताने. सर्वच भाविकांना आपल्याकडे खेचणा-या मंदिरातील अनुभव व चर्चमधील अनुभव हे किती परस्परविरोधी होते हे चांगले जाणवले. त्याविषयीचा हा लेख.

एकदा एका बाळाच्या बाफ़्प्त्मस्म्याला चर्चमधे गेलो होतो. सकाळी १० वाजता तिथे पोचायचे होते. एकूण ११ जोडपी आपल्या बाळाला घेऊन तिथे ९.४५ लाच हजर होती. चर्च आतून नेहमी अत्यंत स्वच्छ, शांतच असते. त्या दिवशी फुलांचे गुच्छ, मोठा पुष्परचना जागोजागी ठेवलेल्या होत्या. जोडपी व बाळे यांच्यासाठी व त्यांच्या मदतीला आलेल्या आज्या,मावश्या यांच्यासाठी पुढच्या राखीव जागा होत्या. बाळांचे दूध, कपडे, बाबागाडा यांच्यासाठी वेगळी जागा आरक्षित केलेली होती. बरोबर दहा वाजता अत्यंत शुभ्र असे कपडे घातलेला पाद्री आल्टरवर आला. ऑर्गनचे सूर वाजू लागले. उपस्थित भाविक एकदम उभे राहिले. काहीशी प्रार्थना होऊन सर्वांना खाली बसण्याची सूचना देण्यात आली.

नंतर मधून बायबलचे वाचन, प्रत्येक जोडप्याला बोलावून त्यांच्या बाळाला तेलाने व नंतर गरम पाण्याने स्नान , बाळाचे नाव कानात सांगणे, आल्टरवर बाळाला ठेवणे वगैरे विधी झाले.प्रत्येक कुटुंबाने मेणबत्त्या पेटवून मेणबत्त्यांच्या जागी त्या ठेवल्या. फोटाची क्लिकक्लिक झाली. एक तासात कार्यक्रम संपला. बाहेरच्या बाजूला पाहुण्यांना फराळाचे पदार्थ देण्यासाठी जागा होती. कुणी घरून आणलेले तर कुणी तिथेच मागविलेले पदार्थ खाऊन पाहुणे घरोघरी गेले.

ख्रिसमसच्यावेळीही रात्री १०.३० वाजता मास सुरू होणार होता.१० वाजल्यापासून चर्च गजबजले होते. बाहेर गाड्या पार्क करण्यासाठी गर्दी उडाली होती. पण शिस्तीने सर्वजण आपापल्या गाड्या योग्य त्या ठिकाणी पार्क करीत होते. बरोबर साडेदहावाजता ऑर्गनचे स्वर चर्चमधे उमटले. गायक व्रुंदाने व वाद्यव्रुंदाने धार्मिक गाणी अत्यंत शिस्तीत म्हंटली. मग बायबलचे वाचन. येशूबाळाचे बारावाजता जन्मणे, त्यानंतर पुन्हा गीते, एकमेकांना शुभेच्छा, फुलांची आरास, मेणबत्यांच्या ज्योतीचे सुंदर चमचमणे……१२.३० वाजता कार्यक्रम संपल्यावर लोक शिस्तीने पुन्हा आपापल्या घरी परतले.

चर्च कायम स्वच्छ व शांत असते. तिथे मुलांना धावपळ करायला परवानगी नसते. मुले दंगा करू लागली तर पालक त्यांना घेऊन लगेच बाहेर जातात. सर्व कार्यक्रमांचे वेळापत्रक असते व ते तंतोतंत पाळले जाते. येशूच्या पुढे फुलांचे गुच्छ असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे तिथे आल्यावर जी शांतता असते व ती ज्या काटेकोरपणे पाळली जाते त्यामुळे आपण एखाद्या वेगळ्या ठिकाणी आलो आहोत याची जाणीव होते.

या उलट आपली मंदिरे. मंदिरात शिरताना पादत्राणे बाहेर काढून ठेवण्याची सूचना लिहिलेली असते. (ती लिहावीलागते हेच खरे द्वंद्व!) तिथे चपलांचा वेडावाकडा पसरलेला ढीग. अगदी पादत्राणांसाठी भली मोठी शेल्फ बनविलेली असली तरी त्या जमिनीवर कशाही विखुरलेल्या, उलटा-पालटा पडलेल्या. मंदिरे आतून स्वच्छ असतात. मूर्ती चांगल्या सजविलेल्या असतात. धूप, दीप, फळे, फुले यांची रेलचेल असते.मोकळ्या जागेत लोक येऊन बसलेले असतात. कित्येकांच्या द्रुष्टीने मंदिर हा एक अड्डा असतो. तिथे येऊन मोठमोठ्याने कोणत्याही गोष्टींची चर्चा चाललेली असते. मुलांना मंदिराचा मोकळा सभामंडप म्हणजे खेळायची जागा वाटते. शिवाशिवी खेळणे, आरडाऒरडा करणे हे त्यांचे उद्योग सर्रास चालू असतात व त्यांचे पालक इतरांशी बोलण्यात गढलेले असल्याने मुलांना शांत रहाण्याबाबत काहीही बोलत नाहीत. भारतातल्यासारख्या वाती वळण्याचा उद्योग मात्र इथल्या मंदिरामधून चालत नाही.

अनेक सणावारांना महाप्रसाद असतो. म्हणजे सर्व भाविकांना मोफत जेवण असते. जेवणाच्या ठिकाणी असलेली परिस्थिती लाज आणणारी असते. प्रसादासाठी व्यवस्थित रांग नाही. प्रसादाची प्लेट घ्यायची कुठेही बसून किंवा उभे राहून ती खायची. त्या गडबडीत मुलांच्या धावपळी, मारामाया चालूच असतात. आमटीसारखा पदार्थ त्यावेळी धक्का लागून जमिनीवर किंवा सतरंजीवर सांडतो. घेतलेला प्रसाद संपत नाही म्हणून कचरापेटीत फेकून दिला जातो. जमिनीवरच्या एका जागी अडखळून पडण्याजोगी जागा आहे. त्यावर तात्पुरते झाकण घातलेले असते. आत्तापर्यंत दोन-तीनदा त्याला अडखळून वयोवृध्द व्यक्तींना चांगला मार बसला.

महाराष्ट्र मंडळातर्फ़े होणा-या गणेशोत्सवाच्या वेळी आरती सुरू झाली आणि भर आरतीतच सेक्रेटरींनी माइकवरून सूचना केली “अमुकअमुक क्रमांकाची कार चुकीच्या त-हेने पार्क केलेली आहे. ती टो अवे केली जाईल. तर ज्याची असेल त्याने ती ताबडतोब दुसरीकडे लावावी.” जमलेल्या शेकडो भाविकांना पवित्र प्रार्थनेमधे आलेला व्यत्यय खटकलाही नाही.

शंकराच्या पिंडीला सोमवारी दूध घालण्यासाठी रांग लागलेली असते. अर्ध्या लिटर ते अडीच लिटर पर्यंतच्या दुधाच्या बाटल्या शंकराच्या पिंडीवर उपडा केल्या जातात. ते तीर्थ म्हणून गटारात वळविता येत नाही, पण त्याचा योग्य निचरा करण्याची सोयही नाही. त्यामुळे साचलेले दूध नासून त्याचा मोठा प्रश्नच निर्माण होतो.

मंदिरामधे भजनी मंडळांची भजने चालतात. परमेश्वर हा ठार बहिरा असून आपण कर्कश ऒरडल्याखेरीज त्याला आपले भजन ऐकू येण्याची सुतराम शक्यता नाही असा गायक-वादकांचा ठाम विश्वास असावा. भजनामधे सहभागी झाले नाही तर मंदिरात बसून ते ऐकण्याची इच्छा होणे शक्यच नाही.

जिथेतिथे नियम आणि शिस्त, शांतता पाळल्या जाणा-या देशातली ही परिस्थिती. भारतातील परिस्थितीविषयी तर बोलायलाच नको. भारतातील तीर्थक्षेत्रे ही कचरा, बेशिस्त व लुटालूट यांची आगरे आहेत हे लिहिताना वाईट वाटले तरी सर्वांनीच हे सत्य अनुभवलेले आहे.

आपला धर्म, संस्कृती फार थोर म्हणून आपण गर्वाने बोलतो. मग त्यामधील पावित्र्याविषयी आपण एवढे उदास कां? लहान मुलांना समजत नाही. पण मोठी माणसेच जेव्हां पावित्र्य राखत नाहीत तेव्हां मुलांच्या मनावर ही मोठी माणसेच “इथे काहीही चालते” असा संस्कार करत असतात. मंदिरामधे अंतर्मुख होऊन प्रार्थना करण्याची, सदभावना जागृत करण्याची एकमेव गरज आहे हे पटविणे अगत्याचे आहे.

भारताला लक्षावधी “गाडगे महाराजांची” गरज आहे. तुम्हीही हे कबूल कराल ना?

– सौ. कल्याणी गाडगीळ, न्युझीलँड