आठ ऑक्टोंबरची सकाळ, रोजच्या सारखा सकाळी फिरून आल्यावर मी वर्तमान पत्र उघडून बसलो होतो. सवयीप्रमाणे अधूनमधून अंगणात लक्ष टाकत होतो, आणि ‘तो’ मला पारिजातकाच्या खाली बसलेला दिसला ‘ऐकलंत का’ मी पत्नीला हाक दिली. ‘थिरथि-या आलाय बर का!’ माझ्या आरोळी सरशी पत्नीही लगबगीने पोचली. ‘खरंच की हो, यंदा हा काहीसा लवकर आला, नाही?’ तिनं विचारलं. तिचं निरीक्षण बरोबर होतं. एरवी हिवाळयाची चाहूल लागली की अगोदर वेडे राघू दिसू लागतात. झाडावरून वा तारेवरून सुरकांडया मारून पुन्हा त्याच जागी वारंवार येऊन बसणारे हिरवे राघू हिवाळयाचे अग्रदूत असतात. पण यावर्षी ते आढळले नव्हते. अंगणात वा रस्त्यावरदेखील हे वेडे राघू अगदी जवळून येणारे पाहूणे. यावर्षीची ऑक्टोबर हीट काहीशी चमत्कारीकच आहे. एरव्ही दिवसा तापलं तरी उत्तररात्रीला गार व्हायला लागतं, आणि सकाळी तर सुरेख गारवा पसरलेला असतो. पण यंदा पहाटेसुध्दा थंडी नाही. अन् काहीसं कोमट वाटतं. त्यामुळे तर वेडया राघूंनी आपला मुक्काम हलवला नसेल?
थिरथि-या म्हणजे ब्लँक रेड स्टार्ट. हा थेट हिमालयातून हिवाळयात देशभर सगळीकडे पसरतो. उघडया माळावर, विरळ जंगलात ज्याचा आढळ होतो. नेहमीप्रमाणे त्यानं हिमालय सोडून दक्षिणेचा पल्ला गाठल्यावर ‘अरे बाबा, इथं अजूनही गरम होतयं’ असं म्हणत तो लगेच परत जाणं शक्य नाही. सध्याचं हवामान आवडलं नाही म्हणून दोन-तीन हजार कि.मी. परत जाणं शक्य नाही. तो परतणार फेब्रुवारी मार्चमध्येच पक्ष्यांचं स्थलांतर हा फार मनोरंजक विषय आहे. त्यातली सगळी कोडी उलगडली आहेत असं नाही, पण स्थलांतराबद्दल आणखी काही दिवसांनी आजतरी थिरथि-यांची गाठ पडली आहे, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी त्याच्याबद्दलच बोललं पाहिजे.
चिमणीएवढा आकाराचा, डोकं, छाती, आणि पंख काळे असणारा हा पक्षी. पोटाकडे आणि शेपटीकडे मात्र नारिंगी, चॉकलेटी असतो. हा कुठेही स्थिर असत नाही. बसेल तिथे तो आपली शेपटी हलवत असतो. त्यामुळे त्याचं शरीरही थोडसं हलत असतं. एखादा अवखळ मुलगा एका जागी स्थिर नसतो, त्याप्रमाणे हा स्थिर राहत नाही आणि बसला तरी अंगाला हेलकावे देण्याचं काम चालूच असतं. नृत्याचं शिक्षण घेतलेली स्त्री साधी चालली तरी तिच्या पद्न्यासात जो डौल असतो तशाच हालचाली याच्या वाटतात. पहिल्यानं जेव्हा हा थिरथि-या ब-याच वर्षापूर्वी आमच्या अंगणात उतरला होता तेव्हा त्याचा डौल पाहून ती मादीच आहे. असं विधान माझ्या पत्नीनं केलं होते. तेव्हा तिला सांगावं लागलं होतं की पक्षीसृष्टीत बहुतेक नर अधिक रंगतदार असतात. तेव्हा तो नरच आहे आणि नर नर्तक नसतात का? गोपीकृष्ण किंवा बिरजू महाराज यांच्या अंगविक्षेपात कायम नृत्याचा नखरा दिसत असतोच. थिरथि-याची मादी त्याच्यासारखंच अंग आणि शेपटी हलवत असली तरी ती रंगाला अगदी फिकी असते त्यामुळे नराकडेच लक्ष वेधलं जातं. रंगभूमीवर चमकदार किनखापी मखमली रंगाचे पोशाख करून राजे रजवाडे वावरतात ना तसाच पक्षीसृष्टीतील नरांचा दिमाख असतो.
थिरथिरे पक्षी जमिनीवरचे किडे, कोळी पकडत असतात. हा उद्योग चालू असतांना विट्-विट् अशी बडबडही चालू असते. डॉ. सलीम अलींनी त्यांच्या आवाजाचं वर्णन तेल न दिलेली सायकल हळू जाताना जसा खडखडाट करते तसा कर्कश आवाज यांचा असतो असं म्हटलं होतं. जमिनीवर वावरतांना जवळपास उडणारा कीटक दिसला तर वेडया राघूप्रमाणे ते त्याला हवेतल्या हवेत पकडतात. वेडे राघू बिनधास्त मधमाशांना धरतात पण थिरथिरे मधमाशांच्या वाटेला जात नाहीत.
बहुतेक नर पक्षी विणीच्या हंगामाच्या सुमारास आपल्या विशिष्ट क्षेत्राचं जागरूकपणे रक्षण करतात. तिथे दुस-या नराला यायला प्रतिबंध करतात पण नर थिरथिरे हिवाळयात आपल्याकडे येतात. तेव्हा त्यांचा विणीचा हंगाम केव्हाच मागे पडलेला असतो तरी ते आपल्या क्षेत्राबद्दल जागरूक असतात. त्यामुळेच थिरथिरे कधी कळपाने आढळत नाहीत. आमच्या अंगणात एकच थिरथि-या नर वावरताना दिसतो. ते त्यामुळेच.
थिरथिरा – (Black redstart) [Phoenicurus ochruros] | |
आकार | चिमणी एवढा |
विणीचा प्रदेश | हिमालयात अनेक हजार मीटरवर, इराण ते मंगोलिया |
विणीचा हंगाम | मे ते ऑगस्ट |
आवाज | व्हिट-व्हिट-व्हिट |
खाद्य | जमिनीवरील किडे, नाकतोडे, कोळी, कीटक |
घरटे | गवत, शेवाळ, लोकर, पिसे यापासून बनवलेले |