त्या दिवशी आमच्या घराचं दार सताड उघडं पाहून एक पाहूणा घरात शिरला. तो थेट बेडरूममध्येच घुसला. भारद्वाजचं नुकतच उडू लागलेलं पिलू होतं ते! गेले काही दिवस आमच्या आणि पलीकडच्या घराच्या अंगणात त्याच्या उडण्याचं शिक्षण चालू असलेलं मी पहात होतो. सुरवातीला ते त्याच फांदीवर छोटया छोटया उडया मारायचं मग खालच्या फांदीवर टेकायचं मग त्याहून वरच्या फांदीवर झेपायचं. त्याची आई अथवा बाप जवळ राहून त्याच्यावर देखरेख करायचे.
पूर्ण वाढ झालेला भारद्वाज उडायला तसा जडच वाटतो. नव्यानं चालणारं मूल जसं अडखळत चालतं तसच भारद्वाजचं हे पिलू थांबत थांबत उडायचं कधी हिय्या करून जमिनीवर उतरायचं. सावकाश सावकाश पावलं टाकतांना तोल सांभाळायला शेपटी उजवीकडे डावीकडे झुकवायचं हे काही कुणी त्याला शिकवलं नव्हतं. नैसर्गिकरीत्याच त्याचं शरीर तोल सावरायचा प्रयत्न करायचं त्याला थेट बेडरूममध्ये शिरलेला पाहून मला नवलच वाटलं. त्याचबरोबर त्याला जवळून न्याहाळता येणार म्हणून आनंदही वाटला. त्याचा काळेपणा अजुन कुळकुळीत झालेला नव्हता पंखावरचा चॉकलेटी रंगही फिकटच होता आणि विशेष म्हणजे त्याचे डोळे काळे होते. पूर्ण वाढ झाली की भारद्वाजचे डोळे कसे लाल माणकाप्रमाणे चमकतात.
पूर्ण वाढ झालेला भारद्वाज रानकावळयापेक्षा थोडासा थोराड असतो. त्याच्या लांब शेपटीमुळे तो आणखीनच मोठा भासतो. काळया रंगाच्या पायघोळ अंगरख्यावर चॉकलेटी जाकीट चढवून अक्कडबाजपणे चालणा-या खानदानी कलावंताप्रमाणे तो भासतो.
भारद्वाज अनेक नावांनी ओळखला जातो. सोनकावळा कुकुटकुंभा, कुंभारकावळा, देवकावळा ऋषीच्या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी तेवढा साळसूद नाही. गोगलगायी, सरडे, छोटे उंदीर तो फस्त करतोच वर छोटया पक्ष्यांच्या घरटयातील अंडी पळवायला कमी करत नाही. एवढया बाबतीत तो कावळयाचा दोस्त आहे असं म्हणायला हरकत नाही. कोकीळ कुळातला असुनही तो स्वत:चं घरटं बांधतो.
आमच्या शेजारच्या कॉलनीत एका घराच्या अंगणातल्या आंब्याच्या झाडावर भारद्वाजाची कायमची वस्ती असायची. ठराविक वेळी त्या बाई अंगणात त्याच्याकरता पोळीचे तुकडे टाकायच्या. ही वेळ टळून गेली की तो अंगणात उतरायचा आणि कुकू-कुकू हूप-हूप असा आवाज करून चला ताई उशीर झालाय माझा टॅक्स चुकवा’ असं सांगायचा. एक दिवस त्यांच्या मुलानं त्याचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी टेपरेकॉर्डर चालू करून ठेवला होता. पोळीचे तुकडे करून टाकण्याऐवजी अर्धी पोळी ठेवली. भारद्वाज पोळीजवळ येताच त्या मुलानं ती ओढून घेतली. त्याचबरोबर त्यानं रागानं फिस्स् असा मोठयानं आवाज काढला. तो आवाज त्याच्या संग्रहात आहे. ओढून घेतलेली पोळी त्याच्यापुढे फेकताच तो ती आनंदाने खाऊ लागला. त्याचा आवाज रेकॉर्ड झाला होता. पण हे दृश्य कॅमेऱ्यात नोंदवायचं राहूनच गेलं होतं.
भारद्वाज – Centropus Sinesis, [Crow Pheasant/Coecal] | |
आकार | रानकावळया एवढा (सुमारे ४५ सेंमी) पण लांब आणि रूंद शेपटीचा. लांब शेपटीमुळे त्याला फेजंट हे विशेषण चिकटलेले आहे. डोळे लालबुंद आणि पंख चॉकलेटी |
विणीचा हंगाम | फेब्रुवारी ते सप्टेंबर |
आवाज | कूक-कूक-हूप-हूप. |
खाद्य | आळया, सुरवंट,सरडे, छोटे उंदीर, पक्ष्यांची अंडी. |
त्या दिवशी संध्याकाळी मी फिरायला निघालो होतो. पूर्वी जो कॅनॉल रोड म्हणून ओळखला जाई त्या वळणावरच्या कुंपणाच्या तारांवर तीन रांगा करुन चिमण्यांचा मोठा थवा बसलेला होता. तो पहाताच मी थांबलोच. कितीतरी दिवसांनी एवढा मोठा थवा दिसला होता. तिथेच उभा राहून मी त्या चिमण्या मोजू लागलो. चक्क ६५ ! पण माझं मोजणं त्यांना आवडलं नसावं. त्या भुर्रsदिशी उठल्या आणि उंच विजेच्या तारेवर लांबलचक ओळ धरुन बसल्या. पण तेवढयातल्या तेवढयात मी हेरलं होतं- नर चिमणे अल्पसंख्येने होते. मादया बहुमतात होत्या आणि त्या खालोखाल पिलांची संख्या होती.
गेले कित्येक दिवस चिमण्या कमी होत असल्याबद्दलची वार्तापत्रं किंवा लेख वाचायला मिळाले होते. त्यावरुन जगात सगळीकडेच चिमण्या कमी होत असल्याची शंका दाटलेली दिसत होती पण रोज सकाळी फिरत असतांना कॉलनीला लागून असलेल्या मोठया रस्त्यावर, कॉलनीच्या रस्त्यावर त्या रोज ४, ६ च्या थव्यात ब-याच ठिकाणी दिसत असल्यानं नाशकात तरी त्या फारशा कमी झाल्या नसतील असं मी मानून चाललो होतो . त्यात एवढा मोठा थवा दिसल्यानं मी नक्कीच सुखावलो होतो.
खरचं का जगातल्या चिमण्या कमी होत आहेत? मध्यंतरी बंगलोर मधल्या चिमण्या जवळजवळ अस्तगत झाल्याबद्दलचा लेख मी वाचला होता. त्या पाठोपाठ लंडन मधल्या चिमण्या मोठया प्रमाणवर कमी झाल्याचं वाचलं होतं. लंडन शहरात सेल फोनचा सुकाळ झाल्यानं वातावरणात एकसारख्या नाचणा-या ध्वनिलहरीमुळे ही संख्या कमी झाल्याचा अंदाज सांगितला होता. त्याबाबत अधिक संशोधन बहुधा हाती घेतलं गेलं असावं
चिमणी हा इतका सर्वपरिचित पक्षी आहे की त्या खुप दिसल्या कमी दिसल्या वा क्वचित् दिसल्याच नाहीत तरी ते कोणाच्या लक्षातही येत नसावं. पण त्यादिवशी हिवाळी अंधुक प्रकाशात जुंग गॉगमेई याला एक चिमणी पलिकडच्या फुटपाथवरच्या बर्फात दिसली आणि तो अत्यांनदांने जवळजवळ ओरडलाच. कारण कित्येक वर्षांनी तो चीनच्या भूमीवर चिमणी पहात होता. १९५८ मध्ये तरुण जुलान पक्षीशास्त्रज्ञ म्हणून कामाला सुरुवात केली होती, त्यावेळी काही रशियन तज्ञ तिथे आले होते. तोपर्यंत अभ्यासासाठी पक्षी मारून त्यांचं निरीक्षण करण्याची पध्दत रुढ होती त्याऐवजी पक्ष्याचं निसर्गात निरीक्षण करावं, त्यांच्या सवयी, स्वभाव, परिस्थिती याबद्दल नोंदी घ्याव्यात असं नव्याने सांगण्यात आलं होतं. हा प्रकार रुढ होत असतानाच तिथल्या सर्वकष औद्योगिकरणाच्या धडाक्यानं लागोपाठ भीषण दुष्काळ आले.
चिमणी धान्य खाते म्हणून तिला घातक पक्षी ठरविण्यात आलं. कम्युनिस्ट पार्टीनं चिमणी हटाव मोहीम आखली. शहरं, खेडी, रानं, शेतं यातून लाखो लोक चिमण्यांमागे हात धुवून लागले. प्रत्येकानं रोजच्या रोज चिमण्या मारण्याचा कोटा पुरा केलाच पाहिजे असा सक्त इशारा असल्यानं केवळ तीन दिवसात लक्षावधी चिमण्या खलास झाल्या चिमण्यांच्या जोडीला इतरही पक्षी बळी पडले जे पाहुन उद्विग्न झालेल्या जुंगनं नोकरी सोडून दिली. पण पुढे त्यानं पक्षी प्रामुख्याने कीटकभक्षी असतात, कीटक वनस्पतींचा नाश करतात. पक्षां अभावी कीटकाचा सुळसुळाट होईल हे त्यानं पार्टीला पटवून दिलं आणि चिमणीवरचं संकट टळलं.
आमच्या लहानपणी जुन्या पध्दतीच्या घरात वळचणीला चिमण्या नेहमी घरटी करायच्या पण आता काँक्रीटच्या सरळसोट भिंतींमुळे त्यांना घरटी करायला चांगली जागाच मिळत नाही घरोघर वाळवणं पडायची तिथे चिमण्यांना अळया, कीडे, दाणे टिपायला मिळायचे आता प्लॅस्टिकच्या पिशवीतून धान्य येत असल्यानं चिमण्यांची उपासमार होऊ लागली आहे. चिमण्यांची संख्या खरचं का कमी होत आहे. हे पहाण्यासाठी हैद्राबादच्या पक्षीमित्रांनी चिमण्या दिसतात का? त्यात नर किती? माद्या किती? त्यांची कुठे घरटी दिसतात का? हे कळवावं असे आवाहन केल्यावर जे लोक कधी पक्षीनिरीक्षण करत नव्हते तेही कुतुहलाने चिमण्या पाहू लागले. त्यांच्या नोंदी घेऊ लागले. अशा रीतीनं चिमण्या चिमणीकडे लोकांचं लक्ष वळलं आहे आपापल्या गावतही अशी मोहीम काढता येईल त्यातून ‘चिमणी बचाव’ म्हणजे निसर्ग बचाव याला चालना मिळू शकेल.
चिमणी – House Sparrow [Passer domesticus] | |
आकार | १५ से.मी (सर्व परिचीत असल्याने चिमणीचा आकार संदर्भाकरता वापरतात जसे चिमणीपेक्षा मोठा/लहान) |
विणीचा हंगाम | जवळ जवळ वर्षभर |
गावर | मनुष्यवस्तीच्या जवळपास |
आवाज | चिव-चिव/चिर्र-चिर्र |
– दिगंबर गाडगीळ