गावापासून थोडं दूर चालत असतांना तुम्ही टॉक-टॉक-टॉक असा आवाज पुष्कळदा ऐकला असेल. एखादया ऑईल इंजिनचा आवाज म्हणून त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं असणार, पण हा आवाज ताबंट पक्षाचा असतो. चिमणी एवढा हिरव्यागार रंगाचा पक्षी सहजा -सहजी नजरेला येत नाही. प्रत्यक्ष दर्शनापेक्षा आपल्या आवाजाने अस्तित्व दाखविणारा असल्याने ‘दूरदर्शनवर हजेरी लावण्याची उत्सुकता न दाखवता आकाशवाणीवर प्रेम करणारा कलावंत’ अशी मी त्याची संभावना करतो.
या हिरव्या पक्ष्याच्या गळयाजवळ व कपाळावर लाल ठिपका असतो. गळा पिवळा व पोटाखालचा भाग हिरवट पिवळसर असतो. चोच चिमणीच्या चोचीपेक्षा जाड असते. त्याच्या नाकाजवळ आणि चोचीच्या बुडाजवळ तुरळक जाड केस मिशांसारखे डोकावत असतात. फ्रेंच भाषेत दाढीला बार्बेट म्हणतात व त्यावरूनच त्याला इंग्रजी भाषेत ‘बार्बेट’ हे नाव मिळाले आहे. त्याला कॉपरस्मिथ असेही म्हणतात. त्याचं सरळ भाषांतर ताबंट असे होतं. ताबंट लोक हातोडयाने पत्रा ठोकताना जसा आवाज होतो तशा आवाजात हा पक्षी आवाज करायला लागला की कधीकधी शंभरावर अंक मोजले तरी त्याची टकटक चालूच राहते.
माझ्या शेजारच्या अंगणात एक अंजिराचे झाड होते. अंजिरे लागली की तांबट, बुलबुल, ब्राह्मणी मैना इ. ची एकच गर्दी तिथे होत असे. या पक्ष्यांसाठी काही फळे राखून ठेवण्याची उदारता आमचे शेजारी दाखवत असत. त्यामुळे ताबंट बरेच दिवस भेटत असे. लाल पिकल्या फळांनी लागवडलेल्या वड, पिंपळ, उबंर यांच्या जवळपास तो हमखास दिसतो.
सुतारपक्ष्याप्रमाणेच ताबंटही झाडाला रूपयाएवढे भोक पाडून घरटं तयार करतो. मऊ लाकूड असलेल्या झाडाची एखादी वठलेली फांदी तो हुडकून काढतो. पिपंळ, साबर वा शेवग्याचे झाड त्याच्या पसंतीला येते. साधारणपणे जमिनीपासून १०/१२ फुटांवर फांदीच्या खालच्या बाजूची जागा घरटयासाठी निवडली जाते. नरमादी जोडीने लाकूड पोखरण्याचे काम करतात. एकदा तर गंमतच झाली मार्च महिन्यात माझ्या अंगणातल्या मांडवावरच्या बांबूत एक दिवस एका तांबटानं दोन पेरांच्या मधल्या उघडया भागावर छिद्र करायला सुरवात केली. त्याचं घरटं तयार झालं. असतं तर त्याचं तोंड आकाशाकडे राहणार होतं. ते सुरक्षित कसं राहिलं असतं? माझ्या मते त्याचा हा उद्योग परंपरेला फाटा देणारा बावळटपणाच होता. पण तिसऱ्या दिवशीच त्याची चूक त्यांच्या ध्यानात आली असावी, किंवा बांबू फोडण्याचा उद्योग जमणारा नाही हे त्यांच्या लक्षात आलं असावं. आपल्या अंगणात जगावेगळ घरट तयार होणार व त्या घरटयाचं चित्रण करता येणार या माझ्या आशेवर पाणी पडलं होतं. साधारणपणे फेब्रुवारी ते जून पर्यंत तांबटाच्या विणीचा हंगाम असतो. पुष्कळदा दरवर्षी त्याच झाडावर पुन्हा नवीन घरटं कोरलं जातं. एका झाडावर तशी एका खालोखाल असलेली ५ घरटी मी पाहिली आहेत.
आता कधी ‘टॉक-टॉक’ असा आवाज तुमच्या कानी आला तर त्या आवाजाकडे लक्ष वळवा. तांबट पक्षी तुमच्या नजरेला येईलही. वसंत ऋतूत त्याची लगबग आणि प्रियाराधन चालू असतं म्हणूनच हिंदी भाषेत त्याला ‘छोटा बसंत’ म्हणतात.
तांबट – Creamsonbreasted Barbet or Coppersmith [Megalamia haemacephala] | |
आकार | चिमणीपेक्षा किंचित मोठा |
विणीचा हंगाम | जानेवारी ते जून |
आवाज | कुsक- कुsक एका पाठोपाठ अनेक वेळा |
खाद्य | वड-पिपंळाची फळे, उडणारे किटक |
घरटे | मऊ खोडाच्या उभ्या वाळक्या फांदीवर लांब आट पुटांवर रुपयाच्या आकाराचे खोदलेले |
पक्षी मित्र संम्मेलनाला जमलेले प्रतिनिधी नांदेडजवळच्या शिखाची वाडीला पोचले. तेव्हा सूर्य वर आलेला होता. तिथल्या तळयावरून येणारा गार वारा आल्हादायक भासत होता. तळयाच्या काठावरच्या शेतात पेरलेल्या भुईमुगातून वाट काढत आम्ही तळयाच्या दिशेने सरकलो.
‘पावशा ! आमच्यातल्या एक जण जवळजवळ ओरडलाच ‘इथं कोणी पावशे आलेला नाही’ विनोद करण्याचा मोह एकाला आवरला नाही. ‘तो बघा पावशा पक्षी तिथे बसलेला आहे’ असं म्हणताच सर्वांनी गर्रकन तिकडे तोंडे वळवली. आंब्याच्या दोन झाडांमधून दिसणाऱ्या तारेवर पावशा बसलेला होता. कबूतराच्या आकाराचा पाठीवर करडा, पोटावर पांढरट आणि त्यावर pavshyaपिंगट आडव्या रेषा असणारा हा पक्षी. त्याच्या लांब शेपटीवरही आडव्या रेघा दिसतात. लांबून पाहिला तर नक्कीच ससाण्याचा भास होतो. उडतांना आणि हलचाली करतानेही ससाणा वाटावा इतकी फसवणूक तो करतो. खरंतर दोन्ही अगदी वेगळया गुणाचे पक्षी. ससाणा जातिवंत शिकारी पक्षी तर पावशा किरकोळ आळया, किडे खाणारा. जोडीने अंजीर, बोरासारखी छोटी फळे खाणारा. त्याला तशी इतर शिकारी पक्ष्यांडून फारशी भीती नाही तरीही त्याने इतरांना फसवण्यासाठी ससाण्याचं सोंग घेण्याचा का प्रयत्न केलाय हे उमजत नाही. त्याला आधार देणारी एखादी लोककथा नक्कीच सापडेल. तिचा शोध घ्यावा लागेल.
शेतक-यांच्या वस्तीजवळ राहूनही त्याच्याकडे कुणाचे फारसे लक्ष जात नाही. कारण तो उगाच ओरडत नाही. पण उन्हाळा भरात आला की त्याचे डोके उन्हाने भरकटतं. पाऊस आला, पाऊस आला अशा कर्कश आवाजात तो ओरडू लागतो. पाऊस तर अजून लांबच असतो. पण तो आतापासूनच त्याची प्रतीक्षा करत ओरडू लागतो. उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या शेतक-यांसाठी त्याचा दिलासा अजूनतरी काही दिवस फसवा असतो. जून महिन्यात पावसाची सुरवात होईपर्यंत ‘पाऊस आला’ अशी त्याची आळवणी चालूच असते. यंदाच्या पाणी टंचाईच्या काळात पर्जन्यराजानं त्याची आळवणी जरा लौकर ऐकली तर किती छान होईल. हा विचार माझ्या मनात चमकून गेला. हे त्यांचं ओरडण साहेबाला फार विक्षिप्तपणाचं वाटलं असावं म्हणून तर त्याला ‘ब्रेन फिव्हर बर्ड’ हे नाव मिळालं असावं. आमच्या हिंदी भाषिक बांधवांना हे नाव रुचलेलं नाही. त्यांच्या मते तो ‘पो कहाँ !’ म्हणतो ते माझा प्रियकर किंवा प्रेयसी कुठे आहे? हे शोधण्यासाठी. नर मादी दोघं सारखेच दिसत असल्यानं साद घालणारा तो आहे की ती आहे हे सांगणे अवघड असते.
कोकिळाताई घरटं बांधण्याचे कष्ट घेत नाहीत. पावशाताई त्याच वर्गातल्या असल्यानं त्याही सातभाईच्या घरटयात आपली अंडी टाकून ती उबवून घेण्याचं काम करून घेतात. पक्षीसृष्टीत सुमारे ३९ जातीचे ऐदी पक्षी नेस्ट पॅरासाआईट आहेत.
पावशा – Common Hawk – cuckoo or Brain Fever Bird [Cuculus varius] | |
आकार | कबुतरा एवढा पण थोडासा सडपातळ |
वस्ती | भारतात बहुदा सर्वत्र. मनुष्य वस्तीच्या आसपास पण उन्हाळयात ओरडून अस्तित्व दाखवितो. |
आवाज | पाऊस आला |
विणीचा हंगाम | मार्च ते जून. |
घरटे | स्वत: घरटे न बांधता बॅबलरच्या घरटयात अंडी घालतो |
– दिगंबर गाडगीळ