सृष्टीरंग

भारतीय उपग्रह : भाग ५ – एज्युसॅट

Indian Satellite Part जीसॅट ३ हा उपग्रह विशेष उपग्रह आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तो केवळ शिक्षणाला वाहिलेला उपग्रह आहे. हा उपग्रह २० सप्टेंबर २००४ रोजी प्रक्षेपित करण्यात आला. शिक्षण ही कोणत्याही देशातील विकासासाठी मूलभूत व्यवस्था असते. आपल्या देशातील ग्रामीण आणि शहरी जनतेच्या शिक्षणासाठी हा खास उपग्रह तयार करण्यात आला आहे. हा उपग्रह एज्युसॅट नावाने देखील ओळखला जातो.

हे मिशन इस्रो, मानवी संसाधन मंत्रालय, राज्य शिक्षण मंडळे आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्या सहयोगाने तयार करण्यात आले आहे. देशातील सर्व भागांमध्ये यांच्यामधून संप्रेषण साधता येईल अशी अनेक उपकरणे या उपग्रहामध्ये आहेत. आपल्या देशातील शिक्षणाची गरज पाहता आपल्याला दरवर्षी दहा हजार शाळा निर्माण कराव्या लागतील आणि हे शक्य नाही. वाढत्या दूरशिक्षणाच्या मागणीमुळे असे अनेक उपग्रह भविष्यामध्ये सोडावे लागतील.

ही मोहीम तीन टप्प्यांमध्ये आहे. पहिला टप्पा प्रायोगिक उपग्रह प्रक्षेपणाचा आहे. यात कर्नाटकामधील विश्वेशरैय्या टेक्नोलॉजीकल विद्यापीठ, मध्य प्रदेशातील राजीव गांधी टेक्निकल विद्यापीठ आणि आपल्या नाशिकचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या प्रयोगांतर्गत समाविष्ट होते. दुसऱ्या टप्प्यामध्ये यात अनेक राष्ट्रीय विद्यापीठांची संख्या वाढवण्यात आली आणि अखेरच्या टप्प्यामध्ये हे नेटवर्क संपूर्ण देशात कार्यरत होणार आहे. एज्युसॅट याकरता क्रांतीकारी उपग्रह ठरला.

दीड फुटाची लहान डिश अन्टेना; घर, शाळा, कॉलेज इथे लावून या उपग्रहाचा लाभ घेता येतो. यातून अनेक उपयुक्त आणि मान्यवरांची व्याख्याने ऐकता येतात. हा उपग्रह पाठविल्यानंतर एक वर्षाने आपल्या देशात व्हर्चुअल क्लासरूम प्रत्यक्षात आल्या आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात केरळमधील १५ शिक्षक प्रशिक्षण केंद्रे आणि ५० शाळा यांना जोडून श्री अब्दुल कलम यांनी या सेवेचे उद्घाटन केले होते.

१७ राज्य शासनाने पुढाकार घेवून अशा प्रकारच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. केरळ हे हा लाभ घेणारे पहिले राज्य ठरले. हा उपग्रह २०१० मध्ये डीकमिशन्ड करण्यात आला.

– सुजाता बाबर