किलबिल – (पक्षांची माहिती देणारे सदर)

येई साद कुहू कुहू कुहू – (कोकीळ)

Koyal वसंताच्या आगमनापासून ऐकू येणारा ‘कुहूsकुहू’ सरत्या ग्रीष्मातही तसाच जोरकस ऐकू येतो. कुहू अशी साद ऐकू आली की ‘कोकिळेला कंठ फुटला म्हणायचा’ असे सहज उद्गार निघतात. पण अनेकांना हे माहीत नसते की पंचमातील साद कोकिळेची नसून कोकीळ नर पक्ष्याची आहे. या मधुर आवाजाने अनेक कवी व लेखकांच्या साहित्यात या पक्ष्याने महत्त्वाचे स्थान मिळवले आहे.

या वर्षी नाशिक शहराच्या पश्चिम भागात कोकीळ नराची साद संख्येने जरा कमी झालेली जाणवली. पंचवटीत एका मित्राकडे गेलो असता मी तसं म्हणताच तो म्हणाला, ‘आमच्या भागात तर यावर्षी त्यांचा आवाज आणि वावर अधिकच वाढलेला आहे.’
‘यंदाच्या सिंहस्थात आमच्याकडच्या कोकिळांनी पंचवटीत मुक्काम हलवलेला दिसतोय!’, मी म्हणालो, ‘कदाचित तुमच्या भागात कावळयांची घरटीही वाढलेली दिसतील’. कोकीळा मादी बहुदा कावळयाचं घरटं अंडी घालण्यासाठी शोधत असते. कोकीळ नर व मादी ऐतोबा आहेत. बहुतेक सर्व पक्षी आपल्या कुवतीनुसार सुबक वा ओबडधोबड घरटं तयार करतात. पण कोकीळ नर मादींना ‘असावे घरकुल आपले छान’ ही कवी कल्पना वाटत असावी. मूर्ख लोक घरं बांधतात यावर त्यांचा विश्वास असतो. घरटं बांधलं नाही तरी यथाकाल अंडी देण्याची वेळ येते मग कावळीच्या नकळत तिथे कोकीळ मादी अंडी घालते. कावळी मादी ती अंडी उबवते. बाहेर आलेल्या पिलांना भरवते. ही पिले उडून जाईपर्यंत तिला त्याचा थांगच लागत नाही.

कोकीळ कावळयासारखाच काळा कुळकुळीत पण जरा सडपातळ आणि डौलदार दिसतो. महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे त्याचा लाल डोळा. काळया मखमलीवर लाल माणिक जडवावं तसा तो भासतो. कोकीळ मादी काही वेगळाच पक्षी आहे इतपत वेगळी वाटते. नर नखशिखांत काळा, मादी मात्र फिकट राखी रंगावर त्याच गडद रंगानं खडी काढावी अशी. नराची नजर गरीब तर तिची कावेबाज. तिच्या अप्पलपोटया स्वभावाचे दर्शन अनेकदा घडले आहे. आमच्या शेजारच्या अंजीराला फळे लागली की अनेक पक्षी तिथे गर्दी करत. पण जोपर्यंत कोकीळाताई तिथे असते तोपर्यंत ती त्यांना तिथे फिरकू देत नसे.

‘कोयलिया बोले अंबुवा की डारपर’ असे ख्यालाचे मुखडे बांधणा-यांपासून सर्वसामान्य लोक कोकीळाच गाते असे मानत असतात. बिचारा कोकीळ ‘कुहू कुहू’ असे वारंवार ओरडत राहून त्याचा गळा सुजला तरी त्याला खानदानी गवयी म्हणून दाद देत नाहीत. काही गैरसमज कायम ठेवले जातात त्यांपैकीच हा एक.

दर १८ वर्षांनी ‘कोकीळा व्रताचा’ महिना येतो त्यावेळी कोकीळेचे दर्शन झाल्याशिवाय किंवा आवाज ऐकल्याशिवाय भाविक महिला अन्नग्रहण करीत नाही. त्यावेळी अनेक कोकिळांना लोकांकडून बंदीवास धडवला जातो.

मादीचे लक्ष वेधण्याकरता कोकीळ ओरडतो, तेव्हा कधीकधी ती त्याला प्रतिसाद देते. पुष्कळदा अगदी मध्यरात्री कोकीळ एकदम ओरडायला सुरूवात करतो. पण कधीकधी त्या रात्री मादी ओरडून त्याला जाग आणते. रोजच्यारोज आधी नर ओरडला की मादी याची एका पक्षीमित्राने ठेवलेली नोंद माझ्या संग्रही आहे. तुमच्यापैकी अशी नोंद कोणी केली असेल वा एकावेळी तो ओरडू लागला की किती वेळी ओरडत होता याची नोंद किंवा अशाच तऱ्हेच्या नोंदी आमच्याकडे कळवल्या तर ती माहिती अनेकांपर्यंत पोहचवता येईल.

कोकीळ – koel/asian koel [Eudynamys Scolopacea (Linn.)]
आकार घरकावळयाएवढा (सुमारे ४३ सेंमी.) पण कावळयाहून सडपातळ आणि लांब शेपटी. भारतभर सर्वत्र आढळतो.
विणीचा हंगाम एप्रिल ते ऑगस्ट
या काळात त्याचा कुहू कुहू आवाज जाणवत असल्याने त्याचे अस्तित्व कळते. मादी कीSकीSकी अशी ओरडते.
खाद्य प्रामुख्याने बोरासारखी छोटी फळे, तुती, चेरी, अळया, सुरवंट खातात.

– दिगंबर गाडगीळ

Digambar Gadgil श्री. दिगंबर गाडगीळ हे निवृत्त आयुर्विमा अधिकारी आहेत. सायन्स फीचर्स या उपक्रमाचे ते प्रमुख आहेत तसेच ते वृत्तपत्रांतून विज्ञान पुरवणीसाठी लेखन करतात. गेल्या २५ वर्षापासून पक्षीनिरीक्षणाचा त्यांचा छंद आहे. नाशिकच्या पक्षीमित्रमंडळ या संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी (१९८१)व सध्या अध्यक्ष (१९८९ पासून) आहेत. महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे ते कार्यकर्ते आहेत. एप्रिल २००४ मध्ये नांदेड येथे झालेल्या २१ व्या महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.