किलबिल – (पक्षांची माहिती देणारे सदर)

सुगरण कॉलनी

Sugaran‘काय पक्षीमित्र सकाळी सकाळी इकडे कुठे? सावरकरनगरमधून जात असताना एका मित्रानं हटकलं’
‘इथे जवळच सुगरण कॉलनीत गेलो होतो.’
‘सुगरण कॉलनी?’ त्याचा चेहरा गोंधळला होता. ‘मी इतकी वर्ष इथं रहातोय. पण सुगरण कॉलनी मला माहित नाही.’
‘कशी माहित असेल कारण हा काही पोस्टल पत्ता नाही. ती आहे सुगरण पक्ष्यांची एक कॉलनी त्याचा गोंधळ दूर करत मी म्हणालो.’
‘माझ्या एका मित्राच्या अंगणातल्या नारळाच्या झाडाच्या समांतर अशा दोन झावळयांवर बया पक्ष्यांनी मोजून एक मजली तेरा घरटी केलेली आहेत. त्याच्या खिडकीतून ती छान बघता येतात. ती पहाण्यासाठी मी गेलो होतो.’

पक्षी सृष्टीतील बहूतेक पक्षी विणीची वेळ आली की घरटी बांधायच्या उद्योगाला लागतात. टिटवीसारखे काही पक्षी केवळ जमिनीवर खळगा करून तिथे अंडी घालतात. तर बया पक्ष्यांचे घरटं म्हणजे उत्तम कारागिरीचा नमुना, म्हणूनच त्या पक्ष्याला सुगरण हे नाव मिळालेलं आहे. सर्वच पक्षी जवळपास मिळणा-या काडया, काटक्या, गवत, दोरा, गुंतवळ, पाने, कापूस, चिंध्या यांचा वापर करून घरटी तयार करतात. घरटी बांधायची कला त्यांना उपजतच प्राप्त झालेली असते. पुढच्या पिढीला ती शिकवावी लागत नाही. अनेक पक्षी नर मादी मिळून घरटं बांधतात पण सुगरणीच्या बाबतीत हे काम केवळ नरानं करायचं असतं. विणीच्या हंगामाव्यतिरिक्त बया तर मादी चिमणीसारखाच दिसतो. तुमच्या जवळपास दिसला तरी चिमणी समजून तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष कराल. पण पावसाळा सुरू झाला की बया नराचा झोकच पालटून जातो. अंगावर हळद माखावी त्याप्रमाणे त्यांचं डोकं आणि गळयाखालचा भाग पिवळा होतो. आता घरटं बांधण्याचं काम सुरू करायचं असतं. गवताच्या लांब लांब काडया चोचीने खुडून झाडावरती पक्की जागा हेरून तो घरटं बांधायला सुरवात करतो. इथे त्याने नारळाच्या पानाचेच सोपट वापरलेलं होतं. चोचीने गवताची काडी खालीवर गुंफत तो हे काम करतो. खालच्या बाजूला ते घरटं पुंगीसारखा गोल आकार धारण करतं. गोल फुगवटयाची जागा अंडी ठेवण्यासाठी त्या बाजूला कापूस किंवा मऊ पदार्थ ठेवला जातो. वा-याने घरटं हलू नये म्हणून आत मातीचे गोळे ठेवून ते जड केलं जातं. घरटं तयार होत आलं की, शेंडयावर बसून पंख हालवीत ची ची करत तो मादीला बोलावतो. मादी येते घरटं बघते. इंजिनीयरने बांधलेलं घर आर्किटेक्टनं तपासावं तशी ती पहाणी करते. घरटं पसंत पडलं तर नर मादीचं मीलन होतं मग यापुढची उस्तरवारी म्हणजे अंडी घालणं ती उबवणं ही कामं मादीला करावी लागतात. नर दुसरीकडे कुठेतरी चांगली जागा पाहून दुसरं घरटं विणायला घेतो. आणखी एक संसार थाटण्यासाठी.

बया किंवा सुगरण ploceus philippinus [Baya Weaver Bird]
आकार चिमणीएवढा (सुमारे १५ से.मी.) विणीच्या हंगामाखेरीज नर वा मादी चिमणीसारखेच (मादी) दिसतात. चिमणीच्या चोचीपेक्षा अधिक भक्कम चोच. सरळ कापल्यासारखी छोटी शेपटी.
विणीचा हंगाम मे ते सप्टेंबर मान्सूनच्या पावसाप्रमाणे, भोग मागे पुढे.
आवाज चिट् चिट् चिट्
विणीच्या हंगामात नर ची s ची – ई असा लांबलचक आवाज काढतो.
खाद्य किडे – आळया

ब्लॅक आयबिस काळा शराटी

ibis मी रोज सकाळी ज्या बागेत हास्यक्लबसाठी जातो त्याच्या बाजूच्या झाडावरून गेले काही दिवस कुत्र्याच्या पिलानं ओरडावं तसा कुई-कुssई – कsर्र कssर्र असा आवाज ऐकू यायचा. कुत्र्याच्या पिलाच्या आवाजापेक्षा तो मोठा असायचा. तो ब्लॅक आयबिसचा आवाज आहे हे मला ठाऊक होतं. पण तो दिसायचा नाही. त्या दिवशी मात्र जवळच्या मोबाईल टॉवरवर बसून तो ओरडताना दिसला. तो एकटाच नव्हता तर त्याचे चार सवंगडी चारी दिशांनी त्या टॉवरवर बसलेले होते. एकाचे कर्रss थांबले की दुसरा तो सूर पकडायचा, असं त्यांचं समूहसंगीत चालू होतं. आम्ही जोपर्यंत बागेत होतो. तोपर्यंत त्यांची आरडाओरड चालूच होती. आम्ही परत निघालो. त्याचवेळी तेही टॉवरवरून उठून घोळक्याने कssर्रss करीत दूर गेले. ही माणसे एकत्र येऊन हातवारे काय करतात किंवा मधूनमधून मोठयाने हसतात हा काय प्रकार आहे हे बघण्यासाठी तर ते तिथे जमले नव्हते?

दक्षिणेत आयबिस कमी झाले आहेत असं कुठतरी वाचल्याचं एक पक्षी-मित्र म्हणाला. पण गेली काही वर्ष नाशकाच्या पश्चिम भागात आयबिसची संख्या वाढते आहे. तीन वर्षापूर्वी ‘अहो गाडगीळ, माझ्या घराशेजारच्या झाडावर एक विचित्र पक्षी येऊन बसतो तो बघायला येता का? ‘ असा फोन आल्यानं मी त्या घरी सकाळी पोचलो होतो. तिथे शेजारच्या झाडावर एकांडा ब्लॅक आयबिस बसलेला होता. (अलीकडे ब-याच वेळेला तो या जागेवर बसलेला असतो असं त्यांनी सांगितल्यावर तो घरटं करण्याच्या विचारात आहे का याकडे लक्ष ठेव आणि तसं दिसल्यास मला कळव, असं मी त्यांच्या मुलीला बजावलं होतं पण तिनं पुढं काहीच कळवलं नाही. अशी निरीक्षणं करण्यासाठी चिकाटी लागते.) ग्लॉसी आयबिस किंवा व्हाईट आयबिस एखादया मोठया झाडावर घरटयांची हाऊसिंग कॉलनी उभारतात. तो प्रकार ब्लॅक आयबिसला मंजूर नाही. तो उंच झाडावर एकेकटा बंगला बांधत असतो.

सुमारे आठ सें. मी. चा हा काळा कुळकुळीत पक्षी त्याची खालच्या बाजूला वळलेली तलवारीसारखी लांब वाकडी चोच, कुशीवर पंखात दिसणारा पांढरा ठिपका आणि डोक्यावरचं लाल पागोटं एकदा नीट निरखून पाहिलं की, माणूस त्याला विसरणार नाही. हा कधी कधी पाण्यात उभा रहात असला तरी इतर बऱ्याच पाणपक्ष्यांच्या मानाने त्याचे पाय काहीसे अखूड आहेत. पाण्याजवळ अधूनमधून वावरत असला तरी पाणी हवच असं नाही. माळावर शेताच्या बांधावर व अन्यत्रही तो दिसतो. भोसला शाळेच्या आवारात त्याचं अनेकदा दर्शन झालं होतं. मासे, बेडूक, सरडे, किडे हे त्यांचं खाद्य.

ibis जगभरात आयबिसच्या २४ जाती सापडतात. उष्ण आणि समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशात सर्व खंडातून त्यांच वास्तव्य असतं. भारतात मात्र ब्लॅक आयबिस, ग्लॉसी आयबिस आणि व्हाईट आयबिस या तीनच जाती आढळतात. त्यातला व्हाईट आयबिस रंगानं पांढरा पण डोकं आणि चोच काळी असा असतो. अमेरिकेतील पांढरा आयबिस मात्र लाल चोचीचा असतो. एके काळी इजिप्तमध्ये असणारा सेक्रेड आयबिस Threskiornis aethiopica आता तिथून गायब झालेला आहे. पण प्राचीन काळात त्याची काढलेली चित्रे आणि ममी तिथे आढळतात. तिथे तो पवित्र मानला जायचा म्हणूनच त्याला हे नाव मिळालं असावं. कोणे एके काळी तो तिथून दक्षिणेला गेला तिथ तो अजून सापडतो. आपल्याकडेही हा पांढरा आयबिस दिसतो. कॅरेबियन प्रदेशात सर्वात देखणा असा स्कार्लेट आयबिस (Eudocimus ruber) सापडतो. पण त्याच्या सुरेख लालरंगी पिसांकरता त्याची फार मोठी हत्या झाली.

माहिती घेण्याच्या ओघात आपण थेट परदेशात जाऊन आलो. पण एवढया दूर जाण्याची गरज नाही. सकाळी कॉलेज रोड, गंगापूररोड, या परिसरात फिरायला जाणा-यांना कर्रकर्र असा आवाज एकू येत असेल तर त्यांनी जरा थांबून वर बघितल्यास हे काळे शराटी त्यांना सहज दिसतील.

ब्लॅक आयबिस काळा शराटी[Pseudibis papillosa]
आकार गावठी कोंबडी एवढा, सुमारे ७५ से. मी. (पण लांबट आकाराचा. शेपूट वेगळी अशी उठून दिसत नाही. नर मादी दिसायला सारखे)
विणीचा हंगाम निश्चित नाही. स्थूल मानाने मार्च ते सप्टेंबर.
घरटे उंच झाडावर, वाडग्यासारखे मोठे असते व ते काडयांनी बनविलेले असते.
खाद्य मासे, बेडूक, सरडे, किडे.

– दिगंबर गाडगीळ