सृष्टीरंग

अंतराळ ही एक गूढ पोकळी

Antaral अंतराळ ही एक गूढ पोकळी. थंड, अंधारी. मनच नाही पण शरीराला तरंगत ठेवणारी पोकळी. आपण जरी पोकळी म्हणत असलो, तरी ती केवळ एक पोकळी नाही. प्रचंड मोठ्या अवकाशस्त वस्तूंनी भरलेली. कितीही शोध घेतला तरी रोज एक नवीन शोध देणारी ही प्रचंड पोकळी आहे. यात असंख्य आश्चर्ये आणि विस्मयकारक गोष्टी भरलेल्या आहेत. त्यातले विज्ञान आज आपल्याला जरी माहीत असले तरी त्या विज्ञानाचे देखील आश्चर्य वाटावे असे वास्तव. गणिताच्या आधारे, भौतिकशास्त्राच्या मूलभूत सिद्धांताच्या तत्त्वावर आधारलेले अंतराळ एक वास्तव आहे. हे आज आपल्याला स्पष्ट झालेले आहे. त्यामागे प्रचंड अभ्यास आहे. अगदी हजारो वर्षांपूर्वीपासून आणि विविध संस्कृतींनी केलेला अभ्यास आहे. अगदी आपली सूर्यमालाच पाहुया. यामधले सृष्टीचमत्कार तर अफाट आहेत.

एवढी मोठी सूर्यमाला पण फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी! म्हणजे अजून तरी इतरत्र जीवसृष्टी आहे हे आपल्याला माहीत नाही. आपल्या सूर्यमालेच्या बाहेर देखील अनेक विस्मयकारक गोष्टी आहेत. पण सूर्यमाला जरा आपल्या जवळची. म्हणजे एक तर आपले त्यात वास्तव्य आहे शिवाय आपण अंतराळामध्ये सूर्यमालेविषयी सर्वाधिक गोष्टी जाणतो. सूर्यमालेतील एक विस्मयकारक गोष्ट म्हणजे शनी ग्रहाच्या कड्या. आपल्या सूर्यमालेमध्ये केवळ शनिलाच कड्या नाहीत तर गुरु, युरेनस आणि नेपच्यून ग्रहांना देखील कड्या आहेत पण त्या बऱ्याच विरळ आहेत त्यामुळे सहज दिसत नाहीत. या ग्रहांना कड्या असल्या तरी शनीच्या कड्या सर्वांना आकर्षित करतात. साधारण ४ ते सहा इंची दुर्बिणीमधून पाहिल्या तर या कड्या आपल्याला शनिभोवती कान असल्यासारख्या दिसतात. शनी हा आपल्या सूर्यमालेतील आकाराने दुसऱ्या क्रमांकचा ग्रह. ही कडी बर्फ आणि अवकाशातील धूळ यांच्यापासून बनलेली आहेत. या कड्यांची जाडी साधारण एक किलोमीटर पर्यंत आहे. शनीपासून, म्हणजे त्याच्या विषुववृत्तावर साधारण ६६३० कि.मी. ते १२०,७०० कि.मी. इतल्या अंतरापर्यंत ही कडी पसरलेली आहेत. यांच्यामध्ये प्रामुख्याने बर्फ, सिलिका, आणि आयर्न ऑक्साईड ही रसायने आहेत. ही तयार कशी झालीत? तर सूर्यमाला तयार होत असतानाच त्याच्याभोवती फिरणाऱ्या एखाद्या उपग्रहाचे शनीच्या गुरुत्त्वाकर्षणामुळे तुकडे झाले असावेत. हे तुकडे शनीच्या गुरुत्त्वीय बलामुळे त्याच्या भोवती फिरत आहेत. याचे सात वेगवेगळे भाग आहेत. याला कॅसिनी विभाजन असे म्हणतात.

आपल्या सूर्यमालेतील अजून एक आश्चर्य म्हणजे मंगळ ग्रहावरचा सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखीजन्य पर्वत, ऑलिम्पस मॉन्स. हा पर्वत साधारण २२,००० मीटर उंच आहे. आपल्या माउंट एव्हरेस्टपेक्षा अडीच पट उंच. २०१३ मध्ये पॅसिफिक महासागराच्या तळाशी एक प्रचंड राक्षसी ज्वालामुखी शोधला आहे. हा साधारण ६४५ किलोमीटर इतका पसरलेला आहे. अर्थातच हा ज्वालामुखी ऑलिम्पस मॉन्सपेक्षा लहान उंचीचा आहे.

Antaral गुरु ग्रहावरचे प्रचंड मोठे वादळ हे देखील आपल्या सूर्यमालेतील एक आश्चर्य आहे. हे वादळ ग्रेट रेड स्पॉट किंवा GRS म्हणून प्रसिद्ध आहे. गुरु हा वायुरूप ग्रह, आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. याच्या पृष्ठ्भागावरील वायू हे वेगवेगळ्या दिशांनी जोरात वाहत असतात. याच्यामुळे गुरुवर GRS तयर झाला. आपण कॅसिनी नावाचा उपग्रह अवकाशात सोडला होता. त्याने या वादळाची प्रथम नोंद केली. १६६५ पासून म्हणजे गेली ३५० वर्षे हे वादळ चालूच आहे. याला गुरुवरचा लाल राक्षसी डोळा असेही म्हणतात. या डोळ्याच्या कडेला असलेले वारे ताशी ४५० किलोमीटर वेगाने वाहत असतात. कल्पना करा, आपण या वेगाने गेलो तर तासाभरात कुठे पोहचू! हा डोळा तसा फिकट रंगाचा असतो. पण अनियमितपणे तो गडद होत असतो. GRS हा पूर्व – पश्चिम २४ ते ४०००० किलोमीटर पसरलेला आहे. तसेच उत्तर – दक्षिण १२ ते १४००० किलोमीटर इतका पसरलेला आहे. त्यातून येणाऱ्या अवरक्त किरणांमुळे असे समजते की गुरुवर इतरत्र असलेल्या तापमानापेक्षा GRS थंड आहे. असेही संशोधन आहे की याची परिभ्रमण गती हळूहळू कमी होत चालली आहे. त्यामुळे हा GRS नष्ट होण्याची शक्यता आहे? म्हणजेच वादळ हळूहळू शमेल? कमी होईल? आणि हळूहळू नाहीसे होईल? कधी? अजून माहीत नाही!

अशीच अनेक आश्चर्ये घेऊन भेटत राहू! सध्या तरी एवढेच!

– सुजाता बाबर