किलबिल – (पक्षांची माहिती देणारे सदर)

भारतीय पक्षी

ह्या पृथ्वीवरील सगळे पृष्ठवंशीय किंवा पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांचे दोन वर्ग पडतात : उष्ण रक्ताचे प्राणी आणि शीत रक्ताचे प्राणी. उष्ण रक्ताच्या प्राण्यांच्या शरीराचे तापमान कायम असते. सभोवतालच्या वातावरणाचा त्यांच्या तापमानावर काहीही परिणाम होता नाही. ह्या प्राण्यांचे सस्तन प्राणी आणि पक्षी असे उपवर्ग पडतात. सस्तन प्राणी म्हणजे ज्यांच्या शरीरावर केस आढळतात, जे पिल्लांना जन्म देतात त्यांना आपले दुध पाजतात; तर पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात, ते अंडी घालतात आणि अंड्यांना आपल्या शरीरातील उष्णतेने उबवतात.

पक्ष्यांची व्याख्या करणे सोपे आहे. सगळ्या जगात पिसे असलेले प्राणी म्हणजे पक्षीच. पक्षी साधारणपणे उडतांना, घरटी बांधतांना आणि अंडी घालतांना बघायला मिळतात म्हणून सगळे पक्षी सारखेच असतात असा समज आहे. परंतू जरा बारकाईने निरीक्षण केले तर ह्या पक्ष्यांमध्ये विविध प्रकारचे आकार असतात आणि ते इतर पक्ष्यांच्या तुलनेत एकसारखे नसतात. ह्याचे उदाहरण बघायचे ठरले तर मानवाच्या हाताच्या अंगठ्या एवढा इवलासा सुमधुर गुणगुणणारा हमिंग बर्ड तर दुसरीकडे घोड्याच्या तट्टाएवढा उंच आणि मोठा शहामृग असे वेगळेपण बघायला मिळते. हजारो मैल उड्डाण करणारे पक्षी तर जमिनीला कधीच न सोडणारे पेंग्विन सारखे पक्षीही बघायला मिळतात. गुंतागुंतीची परंतु सुरेख रचनेची घरटी बांधणारे विणकर पक्षी, तर जमिनीवर अंडी घालणारे पक्षी सुद्धा बघायला मिळतात. विशिष्ट प्रकारचे अन्न लागणारे, मृत शरीरावर ताव मारणारे असेही पक्षी आपल्या सभोवताली बघायला मिळतात. वर्षातून दोन वेळेस लांब अंतरावर स्थलांतर करणारे तर सगळे आयुष्य छोट्याश्या बागेत घालवणारे सुद्धा पक्षी आढळतात.

आजमितीला पृथ्वीवर पक्ष्यांच्या जवळपास ८६५० जाती असून भारतातील १२०० पक्ष्यांच्या जाती ७५ कुलांचे आणि २० गणांचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजेच भारतातील पक्ष्यांची संख्या मोठी आहे आणि एकाच देशात आढळणा-या पक्ष्यांचे विविध प्रकार ह्यात आढळतात. आपल्या देशात आढळणारे थंड हवामान, राजस्थान मधील कोरडे वाळवंटी हवामान, डोंगराळ भागातील थंड हवामान, उष्ण आणि दमट हवामान, हिमालयातील आर्किट थंड हवामान असे हवामानाचे वैविध्य आपल्या देशात आढळून येते आणि पक्ष्यांसाठी हे अनुकुल ठरते. भारतात दाट – विरळ जंगले, मोकळी मैदाने, शेत, समुद्र किनार पट्टी, नद्यांची पात्रे, खडकाळ डोंगर आणि उंच पर्वत रांगा असा भूप्रदेश देखील अनेक पक्ष्यांना आकर्षित करत असतो. जगामध्ये आढळणा–या पक्ष्यांच्या विविध जातींचे अनेक प्रकार भारतात आहेत. काही पक्षी वर्षभर वास्तव्य करतात तर अनेक परदेशी पक्षी हिवाळ्यात स्थलांतर करून भारतात येत असतात.

इंडियन रॉबिन

Robin गेल्या काही दिवसात इंडियन रॉबिन पक्ष्याच्या जोडीची हालचाल नजरेत भरण्याइतकी वाढली होती. बराच वेळ ते या फांदीवरुन त्या फांदीवर तर कधी जमिनीवर तुरतुर किडे शोधत संगतीने वावरत असतात. इंडियन रॉबिन robin चिमणीपेक्षा मोठा आणि सर्वांगाने काळा कुळकुळीत. थोडी पावले तुरतुरुन झाली की क्षणभर थांबणार. यावेळी शेपूट मागे उंच उचलून धरणार तेव्हा शेपटीच्या बुडाशी असलेला तांबडसर भाग दिसतो. एरव्ही तो दडलेला असतो. उडत असतांना तो स्पष्टपणे जाणवतो. मादी नरासारखीच पण फिकट रंगाची तिच्या पंखात ठिपका नसतोच. robin एकमेकांचा पाठलाग करतांना नर चिरssचिरss असा आवाज ब-याच वेळा करीत होता. त्याच्या त्या आवाजामुळेच त्याला चीरक असं म्हणतात. त्यांची मोठी पाती शोभल असा मॅगपाय रॉबिन झळाळणारा काळयानिळया रंगाचा पण पोट मात्र पांढरे असणारा. विणीच्या हंगामात तो झाडाच्या शेंडयावर बसून छान गातो. म्हणून त्याला दयाळ हे नाव दिलेले आहे. मागे ऑगस्ट महिन्यात आम्ही महाबळेश्वरला वनखात्याच्या निवास्थानातच उतरलो होतो. दुस-या दिवशी भल्या सकाळी आजुबाजुला अनेक दयाळांनी सामुदायिक गाण्याचा जो धडाका लावला होता, त्यामुळेच जाग आली होती. ती सकाळ त्या समुहगानामुळे कायमची स्मरणात राहिली आहे.

माझ्या अंगणातल्या चीरकाच्या जोडीला त्या दिवशी नेमकी मेजवानीच मिळाली. अंगणाच्या कोप-यात वाळवीनं मोठं घर उभारलं होतं. त्यादिवशी ऊन खायला म्हणा की काही निमित्तानं ब-याचश्या कामकरी वाळवी बाहेर आलेल्या होत्या. त्या ह्या जोडीनं हेरल्या. नर त्या ढिगावर चढला आणि एक एक वाळवी पटापटा टिपून घेऊ लागला. बारा, तेरा…एकोणीस …वीस तब्बल सत्तावीस वाळवी टिपल्यावर तो तिथून उडाला. आज एका जागी त्याला चांगला फराळ मिळाला होता. एवढया वाळवी टिपल्या जात होत्या तरी बाकीच्यांची जीव वाचवण्यासाठी धावपळ कशी उडाली नाही हे आश्चर्यच होते. मादी चीरक वाळवीच्या उंचवटयाशी खालच्या बाजूला टेकली. आधाराकरता तिने आपली शेपटी जमिनीवर टेकवली होती. अशी बैठक जमवलेली असूनही ती नराप्रमाणे पटापटा वाळवी न वेचता जवळपास चोचीला येतील तेवढयाच उचलत होती. त्यांची मोजदाद करण्याचा उद्योग मी केला नाही. पण तिची कमाई दहाबाराच्या पुढची नसेल.

आणखी चार दिवसांनी भिंतीच्या खोबणीत घरटे करण्याचा उद्योग सुरू झालेला दिसला. तिथे खाली काडया कापूस पडलेला दिसला. त्या जोडीनं तिथंच घरटं बांधायला सुरवात केली होती. पण ते घरटं सहजासहजी माझ्याच काय मांजरी, कावळयाच्या नजरेत येणार होतं. ही चिरकी पहिलटकरीण असावी. नाहीतर अशा जागी घरटं बांधायची बुध्दी तिला झाली नसती. अर्धेअधिक घरटे बांधून झाल्यावर आपला बावळटपणा त्यांच्या लक्षात आला असावा. कारण ते बांधकाम अर्धवट टाकून ती जोडी दुसरीकडे कुठे सुरक्षित जागी निघून गेली होती.

चिमणी – Indian Robin [Sakicoloide Fulicata]
आकार चिमणीपेक्षा मोठा. सर्वांगाने काळा. फक्त नराच्या पंखात पाढरा ठिपका, जो उडतांना उठून दिसतो. वर उचललेल्या शेपटीच्या बुडाशी मळकट लाल भाग
विणीचा हंगाम एप्रिल ते जून
आवाज चिsर्र-चिsर्र
खाद्य किडे त्यांची अंडी, आळया

– दिगंबर गाडगीळ