सृष्टीरंग

भारतीय उपग्रह : भाग ४ – ओशियनसॅट

Indian Satellite Part भारताचा जवळजवळ दोन तृतीआंश किनारा हा सागरी किनारा आहे. यातून मोठ्या प्रमाणात उपजीविका तयार होतात. शिवाय सागरी जीवन हे आपल्या जैविक विविधतेमधील मोठा भाग आहे. किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांची संख्या देखील लक्षणीय आहे. मानव निर्मित तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये सागरी पट्टा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यासाठी समुद्र आणि त्याचा किनारा, त्याचे वातावरण तसेच सागरी जीवन यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक संस्था तर आहेतच, परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सागरी अभ्यास करणारे उपग्रह पाठविणे हाही भाग येतो. ओशियनसॅट १ हा केवळ सागरी अभ्यासासाठी पाठविलेला पहिला भारतीय उपग्रह आहे. हा इंडीयन रिमोट सेन्सिंग मालिकेमधील आठवा उपग्रह आहे. समुद्र विज्ञान अभ्यासासाठी यात विशेष असे सागरी रंगीत मॉनीटर कॅमेरा आणि मल्टीफ्रिक्वेन्सी स्कॅनिंग मायक्रोव्हेव रेडीओमीटर अशी दोन उपकरणे जोडलेली होती.

हा उपग्रह २६ मे १९९९ रोजी प्रक्षेपित करण्यात आला होता. रंगीत मॉनीटर सागरी कॅमेराच्या सहाय्याने प्रामुख्याने समुद्राचा रंग ओळखला जाण्याची व्यवस्था होती. यामुळे त्या समुद्रातील हरितद्रव्याची घनता, फायटो प्लान्कटन, एअरोसोल्स कोणत्या प्रकारचे आहे हे समजणे शक्य होते. शिवाय, तेथील सागरी जीवन समजू शकते. मल्टीफ्रिक्वेन्सी स्कॅनिंग मायक्रोव्हेव रेडीओमीटरमुळे तेथील सागरी वातावरणातील मायक्रोव्हेव रेडीएशन्स मोजणे शक्य होते. यामुळे तेथील तापमान, वाऱ्याचा वेग, ढगांमधील बाष्पता आणि पाण्याच्या ढगांची घनता समजणे शक्य होते. याचा उपयोग समुद्री वादळे, तुफान, पावसाचे प्रमाण आणि सुनामी सारख्या धोक्यांचे संकेत मिळू शकतात.

या मिशनचे नियोजित आयुष्य पाच वर्षांचे होते परंतु प्रत्यक्षात मात्र या उपग्रहाने ११ वर्षे काम केले. आता मात्र आपण याला ८ ऑगस्ट २०१० रोजी निष्क्रिय केले आहे. या मिशनच्या यशामुळे आता आपण ओशियनसॅट २ ही मिशन आखली गेली. हा उपग्रह इंडीयन रिमोट सेन्सिंगच्या दुसऱ्या मालिकेमधील उपग्रह आहे. हा उपग्रह २३ सप्टेंबर २००९ रोजी पाठविण्यात आला. या मिशनचे मुख्य उद्दिष्ट हे सागरी जीवन आणि सागरी हवामान तसेच सागरी किनाऱ्याचा अभ्यास हे आहे. यासाठी या उपग्रहावर तीन उपकरणे आहेत. सागरी रंगीत मॉनीटर कॅमेरा, पेन्सिल बँड स्कॅटरोमीटर आणि वातावरणाचा अभ्यास करणारा रेडिओ ओक्युलटेशन साऊंडर देखील आहे. प्रामुख्याने मासेमारीकरता संभाव्य जागा शोधणे, समुद्रस्थितीविषयी माहिती देणे, किनाऱ्याच्या परिस्थितीविषयी माहिती पुरवणे आणि संभाव्य धोक्यांची सूचना देणे ही या उपग्रहाची कामे आहेत. यापैकी साऊंडर हे उपकरण इटालियन स्पेस एजन्सीचे आहे.

– सुजाता बाबर