गुहा/लेंणी

मागाठाणे लेणी

Magathane Leni मागाठाणे लेणी ही इसवी सनाच्या सहाव्या शतकात बनविलेली बौद्ध लेणी आहेत.मुंबईतील बोरीवली स्थानकाच्या पूर्वेस बाहेर पडल्यानंतर पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दिशेने जाणारा एक रस्ता दत्तपाडा फाटक मार्गावरून मागाठाणेच्या दिशेला येताना टाटा स्टीलच्या आधी उजवीकडे असलेल्या बैठ्या वस्तीमध्ये ही मागाठाण्याची अतिशय महत्त्वाची लेणी पाहायला मिळतात.ह्या परिसराचा उल्लेख कान्हेरी लेण्यांपैकी २१ क्रमांकाच्या लेण्यातील शिलालेखात ‘इथूनच जवळ असलेल्या मग्गठाणे येथील अधेलीची जमीन कल्याण येथील व्यापारीश्रेष्ठी अपरेणुकाने कन्हगिरीच्या या बौद्धभिक्खू संघाला दान दिली असून त्यातून येणा-या उत्पन्नाचा वापर या भिक्खूसंघाच्या निर्वाहासाठी करण्यात यावा ‘ असा केला आहे. कान्हेरीच्या शिलालेखांमध्ये असलेल्या त्या जमिनीच्या बाजूला पाचव्या-सहाव्या शतकामध्ये या लेणींची निर्मिती करण्यात आली.

लेणी असलेल्या परीसराला पूर्वी मागाठाणे असे म्हणत. मुळात या लेणींवरूनच त्या परिसराला हे नाव मिळाले आहे. मग्गस्थानकपासून अपभ्रंश होत त्याचे मग्गठाणे आणि नंतर मागाठाणे असे झाल्याचे मानले जाते. काहींच्या मते मग्ग म्हणजे मार्ग आणि त्यावर थांबण्याचे ठिकाण म्हणजे मागाठाणे होय. कारण कोणतेही असले तरी मागाठाणे हे प्राचीन ठिकाण आहे, याबाबत कुणाचेच दुमत नाही. शिवाय या ठिकाणाला महत्त्व प्राप्त झाले तेही या लेणींमुळेच यातही वाद नाही.

मागाठाणे लेणी या पोईसर लेणी या नावानेही ओळखल्या जातात. पोईसर हे मागाठाणेच्या वेशीला लागून असलेले गाव आहे. आणि ते या लेणींपासून तुलनेने जवळ आहे. या लेणींचा उल्लेख बॉम्बे गॅझेटिअरमध्येही सापडतो. बॉम्बे गॅझेटिअरमधील उल्लेखानुसार आजूबाजूला दाट हिरवी झाडी असल्याने त्या बाहेरून दृष्टीस पडत नाहीत, असा आहे. जोगेश्वरीच्या लेणींचा विशेष म्हणजे तिथे लेणी वर आणि जमीन खूप खाली आहे, तसेच चित्र आपल्याला मागाठाणे लेणींमध्येही पाहायला मिळते. इथे मध्यभागी मोठ्या सभागृहाप्रमाणे असलेला भाग होता. त्याची लांबी-रुंदी सुमारे पंचवीस बाय सहा फुटांची असावी. लेणींच्या पूर्वेकडील बाजूस व्हरांडा असून तिथे असलेल्या स्तंभांवर डबल क्रिसेंट पद्धतीचे अलंकरण आहे. अशा प्रकारचे अलंकरण कोकणातील कुडा आणि कान्हेरी या अगदी सुरुवातीच्या काळातील लेणींमध्ये पाहायला मिळते.

डावीकडच्या बाजूस या लेणींचे मुख्य प्रवेशद्वार असून तिथे दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या होत्या. त्यावर दगडी झाकणेही होती. आतमध्ये असलेल्या चैत्यामध्ये सहा ते सात स्तंभांवर शंखाकृती रचना असून त्यावर फारसे अलंकरण नाही. सहाव्या शतकातील लेणींचा हा अवशेष इथे पाहायला मिळतो. इथे एक सर्वात महत्त्वाचे चैत्यही आहे. किंबहुना ते या लेणींमधील सर्वात महत्त्वाचे लेणे आहे, असे म्हणता येईल. हे आकारानेही सर्वात मोठे असून लेणींच्या वायव्येस आहे, असा उल्लेख गॅझेटिअरमध्ये सापडतो. तर या मोठ्या बुद्ध शिल्पाकृतीच्या दोन्ही बाजूस हातात मोठे कमळपुष्प घेतलेल्या अवलोकितेश्वराची शिल्पाकृती होती. ती आता धूसर दिसते. मात्र, या बुद्धमूर्तीच्या दुस-या बाजूस धर्मचक्र मुद्रेमधील ध्यानमग्न बुद्धाच्या विविध पाच छोटेखानी शिल्पाकृती दिसतात.

इथे असलेली तोरणाची कलाकृती मात्र अप्रतिम असून त्यावर उत्तम कोरीव काम करण्यात आल्याचे दीक्षितांनी म्हटले आहे. त्यावर हत्ती, मकर, उडणा-या अप्सरा अतिशय उत्तम पद्धतीने कोरलेल्या आहेत. वेरुळमधील विश्वकर्मा लेणींशी समांतर जाणारी अशी ही कलाकृती आहे. येथील शिल्पाकृतींवरून या लेणींची निर्मिती सहाव्या शतकात झालेली आहे. केवळ तेवढेच नव्हे तर मागाठाणेच्या आजूबाजूच्या परिसरात जे पुरातत्त्वीय अवशेष सापडतात तेदेखील हा लेणींचा परिसर सहाव्या शतकाच्या सुमारासचा असावा, असाच संकेत देतात त्यामुळे सहाव्या शतकात या परिसरात बौद्ध धर्माचे प्राबल्य होते, हेच या मागाठाण्याच्या लेणी सिद्ध करतात.

मागाठाणे लेणी ला कसे जावे?
मुंबईतील बोरीवली स्थानकाच्या पूर्वेस बाहेर पडल्यानंतर पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दिशेने जाणारा एक रस्ता दत्तपाडा फाटक मार्गावरून मागाठाणेच्या दिशेला येताना टाटा स्टीलच्या आधी उजवीकडे असलेल्या बैठ्या वस्तीमध्ये ही मागाठाण्यालेणी कडे जातो.

ठाणाळ लेणी

Thanale Leni अष्टविनायकांमध्ये स्थान प्राप्त झालेला पालीचा बल्लळेश्वर सरगडाच्या पायथ्याशी एका प्रशस्त देवालयात विराजमान झालेला आहे. रायगड जिल्ह्यात व मुधागड तालुका असलेले हे गणेशालय उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पण याच पाली गावाच्या वायव्येस अवघ्या २६ किमी अंतरावर असलेली ठाणाळ लेणी भटक्या मंडळीच्या शिवाय इतर कोणालाही फारशी माहित नाहीत.

ठाणाळ लेणी नाडसूर(नाद्सुर) या नावाने देखील परीचित आहेत. तेवीस लेण्याचा हा समूह सर्वप्रथम मराठी मिशन मुंबई यांनी इ.स.१८९० मधील जानेवारी महिन्यात जाऊन पाहिला आणि सुप्रसिद्ध पुरातत्व तज्ञ हेनरी कझिन्स यांच्या संशोधक नजरेसमोर आणला. इ.स १८९० मध्ये कझिन्सने ठाणाळे लेण्यांना भेट दिली आणि इ.स.१८११ मध्ये त्याने “Caves at Nadasur and Kharasamla” ही पुस्तिका प्रकाशित केली. खडसामला लेणी समूह ठाणाळयाच्या दक्षिणेस अवघ्या ९ किमी अंतरावर असून तो नेणावली या नावाने ओळखला जातो ठाणाळ या शब्दामधील ठाण म्हणजे स्थान आणि स्थानाचा अर्थ ’पूजास्थान ’ असा केला जातो. यातील ’ठ’ हे अक्षर स्थानवाचक आहे.

ठाणाळयाच्या उल्लेख प्राचीन ग्रंथात आढळत नाही. पण कोरीव लेण्यातील एका शिलालेखात ठाणाळयाच्या ओझरता उल्लेख आहे. नाशिक जवळ असलेल्या पांडवलेणी समूहातील तिस-या क्रमाकांच्या लेण्यातील ब्राह्मी शिलालेखेत दुस-या ओळीत गौतमी पुत्र सातकर्णी याने जिंकून घेतलेल्या प्रदेशांचा उल्लेख आहे. त्यात विझ, छवत, परीचात, सह्य, कणहगिरी, मंच, सिरीटन, मलय, महद इत्यादी पर्वतांचा पती म्हणून गौतमीपुत्र उल्लेख येतो. जर त्यांचा भौगोलिक क्रम पाहिला तर दक्षिणेला ठाणाळयाचा डोंगर असून चौलहून वाघजाई घाटातून जाणारा मार्ग या लेणी समूहाच्या जवळून जातो. विझ म्हणजे विंध्य, छवत म्हणजे ऋक्षव्रत किंवा सातपुडा, परीचात म्हणजे पालिताना किंवा अबू पर्वत, साह्य म्हणजे सह्याद्री,काणहगिरी म्हणजे कान्हेरी, मंच म्हणजे राजमाची या क्रमाने दक्षिणेकडे सिरीटन येतो आणि त्यामुळे त्याची भौगोलिक स्थान निश्चिती ठाणाळयाच्या डोंगर अशी करता येणे अगदी शक्य आहे. ठाणाळे लेणीसमूहात एकूण चार श्री च्या म्हणजे लक्ष्मी देवीच्या प्राचीन प्रतिमा असल्यामुळे हे स्थान सर्वात जुने स्थान शक्यता आहे.

Thanale Leni ठाणाळे येथील लेणी समूहातील सर्व लेणी पश्चिमभिमुख आहेत. या बौद्ध लेण्यांमध्ये एक चैत्यगृह, एक स्मारक स्तूप व एकवीस निवासी गुंफा आहेत. इ.स.वी.सन पूर्व दुस-या शतकात ठाणाळे लेण्याची निर्मिती केली या लेणीच्या दर्शनासाठी दक्षिणेकडून जावे लागते.

ठाणाळ लेणी ला कसे जावे?
पाली गावापासून ठाणाळे गाव नाडसूर मार्गे सुमारे २५ किमी अंतरावर आहे. ठाणाळे गावाच्या पूर्वेला घनदाट अरण्यात ही लेणी कोरलेली आहेत. पाली गावातून स्थानिक एस.टी.चा किंवा रिक्षाचा प्रवास करावा लागतो. ठाणले गावातून मात्र पुढे पायवाटेने सुमारे दीड तासांची पायपीट करून लेण्यांपर्यंत पोहोचता येते. रानात चकव्या वाटा पुष्कळ आहेत.म्हणून गावातून वाटाड्या सोबत घेणे उत्तम.