या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली. येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले त्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केली. हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्यांच्या स्वरुपात आहे. गिरीजा म्हणजे पार्वती. मत आणि पार्वतीचा पुत्र गणेश म्हणजे तिचा आत्मज. त्यावरून त्यास गिरिजात्मज म्हटले जाऊ लागले. गजाननाची पुत्र म्हणून प्राप्ती व्हावी म्हणून या गुहेत पार्वतीने बारा वर्षे तपश्चर्या केली व गणेशाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. त्यानुसार भाद्रपद चतुर्थीस सचेतन होऊन बटुरुपात तो प्रकट झाला तेव्हा त्याला सहा दात व तीन नेत्र होते. गौतम ऋषींचा गणेशास येथे लाभ झाला. सतत १५ वर्षे गणेशाने येहते वास्तव्य केले म्हणून या क्षेत्राचे महात्म्य थोर आहे. येथे एकूण २८ लेण्या आहेत. मंदिर सातव्या लेणीत असून त्याला गणेश लेणी म्हणतात. ६ व्या लेणीत बौद्ध स्तूप असून येथे सात वेळा आवाजाचा प्रतिध्वनी उमटतो. लेणीस जाण्यासाठी ३२१ पाय-या आहेत. गणेशाची मूर्ती लेणीच्या भिंतीत स्वयंभू प्रकट झालेली आहे. लेणी परीसर पुरातत्त्व विभागाच्या अधिकारात पुरा आहे. मंदिरात प्रवेशासाठी पुरातत्त्वविभाग पाच रुपये शुल्क आकारते.
जुन्नरजवळ लेण्याद्री हा लेणी असलेला पर्वत असून गिरीजात्माजाचे मंदिर डोंगरावरील आठव्या गुहेत आहे. देवळात जाण्यासाठी ३६७ पाय-या आहेत. डोंगरात कोरलेले हे मंदिर अखंड अशा एकाच दगडात कोरलेले असून दक्षिणाभिमुख आहे. दालनात गणपतीची प्रतिमा असून त्याला एकही खांब नाही. तसेच दालन आकाराने मोठे
आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या गिरीजात्माजाच्या मूर्तीवर उजेड असतो. मंदिरात दगडात खोदलेली गिरिजात्मजाची उत्तराभिमुख व ओबडधोबड मूर्ती असून गणेशाची मान डाव्या बाजूला वळलेली असल्याने गणपतीचा एकच डोळा दिसतो.
स्थान : पोस्ट गोळेगाव, तालुका जुन्नर, जिल्हा – पुणे, पिन.को. ४१० ५०२
अंतर : मुंबई – कल्याण – माळशेज घाट – मढ – लेण्याद्री १८० कि.मी.
पुणे-नारायणगाव-जुन्नर-लेण्याद्री १२० कि.मी., जुन्नर- लेण्याद्री ७ कि.मी., नाशिक – आळेफाटा – ओतूर -लेण्याद्री १४० कि.मी., अहमदनगर – आळेफाटा – ओतूर – लेण्याद्री १०० कि.मी.,
जवळची ठिकाणे : ओतूर- पुरातन कोपर्दीकेश्वर मंदिर व संत तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य स्वामी यांची संजीवन समाधी.
माळशेज घाट : थंड हवेचे ठिकाण व अभयारण्य.
शिवनेरी किल्ला : शिवाजी महाराजांचे जन्मस्थान.
कुकडेश्वर : कुकडी नदीच्या उगमाजवळील कुकडेश्वर मंदिर.
नाणेघाट : प्राचीन राजमार्गावरील ऐतिहासिक घाट.
सर्व देवांनी मिळून या गणेशाची येथे स्थापना केली. विघ्नसुराचे पारिपत्य करण्यासाठी गणेशाने येथे अवतार धारण केला. अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ सुरु केला. ही वार्ता इंद्रास कळताच त्याने यज्ञात विघ्न आणण्याची विघ्नसुरास आज्ञा दिली. विघ्नसुर केवळ यज्ञाचा नाश करून थांबला नाही तर त्याने सर्वच देव व धर्माला आव्हान दिले. देवांनी संकट दूर करण्यासाठी गणेशाची आराधना केली. मग गणेशाने पराशर ऋषींचा परत्र म्हणून येथे अवतार घेतला व विघ्नेश्वराचा वध केला. माझे नाव धारण करून आपण येथेच राहावे ही विघ्नेश्वराची प्रार्थना गणेशाने स्वीकारली व ते येथे विघ्नेश्वर नावाने राहिले. चिमाजी आप्पांनी वसईच्या लढ्यात विजय मिळवल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला. ट्रस्ट कडून दरवर्षी नाममात्र दरात तीनशे सामुदायिक विवाह येथे लावले जातात. तसेच गजानन सागरात नौका विहाराची सोय करण्यात आलेली आहे. अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जाणारा व विघ्नाचे हरण करणारा विघ्नेश्वर कुकडी नदीच्या तीरावर वसलेला असून ते गणपतीचे एक जागृत स्थान आहे.
मंदिराला दगडी तटबंदी आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराचा कळस व शिखर सोन्याचा आहे. प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दगडात कोरलेले भालदार-चोपदार आहेत. महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन उंच दीपमाला नजरेस पडतात. मंदिरात एकात एक अशी सभामंडपाची रचना असून प्रवेश द्वारातून प्रवेश करताच काळ्या पाषाणातील उंदीराची मूर्ती आहे. देऊळाच्या भिंतींवर चित्रकाम केलेले आहे. दोन सभामंडपातून आत गेल्यावर देवाचा गाभारा आहे. गाभा-यात डौलदार कमानीत बसलेली पूर्णा कृतीतील विघ्नेश्वराची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन डोळ्यात माणके तसेच कपाळावर व बेंबीत हिरे आहेत. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पिताळ्याच्या मूर्ती आहेत. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
स्थान : तालुका- जुन्नर, जिल्हा पुणे, पिन.को. ४१० ५०४
अंतर : पुणे – नाशिक राष्ट्रीय मार्ग क्र. ५० वरील नारायणगावच्या पश्चिमेस.
नारायणगाव – ओझर १२ कि.मी., ओझर ते लेण्याद्री १७ कि.मी., ओझर ते सिद्धटेक १८० कि.मी.
ओझर ते पाली १७५ कि.मी., ओझर ते मोरगाव१५० कि.मी., ओझर ते रांजणगाव ११० कि.मी.
ओझर ते महाड १३५ कि.मी., ओझर ते थेऊर १३२ कि.मी., ओझर ते भीमाशंकर ७० कि.मी.
ओझर ते शानिशिंगणापूर १४५ कि.मी., ओझर ते पुणे ८५ कि.मी., ओझर ते कल्याण ११८ कि.मी., कल्याण ते मुंबई ६४ कि.मी
जवळची ठिकाणे
आळे : पैठण येथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदविले त्या रेड्याची समाधी.
आर्वी : उपग्रह केंद्र.
खोडद : आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बीण.
भीमाशंकर : बारा ज्योतिर्लिंग पैकी एक स्थान.
हे क्षेत्र भगवान शंकरांनी वसविले असून त्यांनीच
गणेशमूर्तीची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींचा पुत्र त्रिपुरासुर हा गणेशाने दिलेल्या वरामुळे अतिशय उन्मत्त झाला होता. त्याने सर्व देवानाही जिंकले. सर्व देवांच्या विनंती वरून भगवान शंकराने या दैत्याचे पारिपत्य करण्याचे मान्य केले. शंकराने विनायकास प्रसन्न करून घेतले. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस याच ठिकाणी शंकराने त्रिपुरासुराचे पारिपत्य केले. त्या वेळपासून या पौर्णिमेस त्रिपुरी पौर्णिमा म्हणण्यात येऊ लागले. पेशव्यांनी येथील अन्याबा देवांना वंश परंपरागत देवाची पूजा करण्याची सनद दिली. मोरया गोसावी यांनी अन्याबा देवांना गणेशाची धातूची मूर्ती प्रसाद म्हणून दिली. त्या मूर्तीची उत्सवात मिरवणूक निघत असते.
भाद्रपद महिन्यात येथे घरोघरी गणेशाची स्थापना करण्याची प्रथा नाही तर मंदिरातील गणेशाची पूजा केली जाते. श्री व्यंकटेश हाच्रीच, पुणे यांच्या वतीने रोज सकाळी शिरा वाटप करण्यात येते. अष्टविनायकातील सर्वात शक्तिमान असे मानल्या जाणा-या महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन पद्धतीचे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की उत्तरायण व दक्षिणायन याच्या मधल्या काळात सूर्याची किरणे महागणपतीच्या मूर्तीवर पडतात. मंदिराचे प्रवेशद्वार भव्य असे असून प्रवेशद्वारावर जय-विजय हे द्वारपाल आहेत. मंदिरातील सभामंडपातून आत गेल्यावर गाभा-यात महागणपतीची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. गणपतीने कमळाची आसनमांडी घातलेली
आहे. गणपतीला दहा हात आहेत. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. मंदिराचे स्थान इ. स. दहाव्या शतकातील आहे .
स्थान : तालुका शिरूर, जिल्हा पुणे, हे स्थान पुणे- अहमदनगर राज्य मार्गावर आहे.
अंतर : रांजणगाव-पुणे ५० कि.मी., रांजणगाव-शिरूर १७ कि.मी., जवळच्या हायवेपासून पुणे- सोलापूर मार्गावरील चौफुला येथे जाता येते. आणि चौफुल्याहून थेउर, मोरगाव , व सिद्धटेकला जाता येते.
पुणे मार्गावरील प्रेक्षणीय ठिकाणे : वढू बुदृक – भीमा नदीवर श्री संभाजी महाराजांची समाधी, कोरेगाव पासून पाच कि.मी. आत.
तुळापुर : भीमा, भामा व इंद्रायणी या नद्यांचे संगम स्थान.
फुलगाव : श्रुतीसागर आश्रम.
अहमदनगर मार्गावरील ठिकाणे : शिरूर- प्राचीन श्री रामलिंग मंदिर.
निघोज : कुकडी नदीच्या पत्रात कुंडच्या आकाराचे नैसर्गिक खळगे. श्री मळगंगा देवीचे जागृत स्थान.