वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघ्नं कुरुमे देव
सर्वकार्येषु सर्वदा ||
भाद्रपद शुध्द चतुर्थीला महासिध्दी विनायकी असे म्हणतात. त्यादिवशी ‘गणपती बाप्पा मोरया’ हा आवाज सर्वत्र ऐकायला मिळतो. ‘मोरया’ म्हणजे नमस्कार. त्या दृष्टीने पाहता, ‘गणपती बाप्पा मोरया’ चा अर्थ गणपती बाप्पाला नमस्कार असा होतो.
प्रत्येक शुभकार्यात सर्वप्रथम श्रीगणेशाचे पुजन केले जाते. गणेशाची मूर्ती नसेल तर सुपारीचा गणपती बनवायचा, पण अग्रपूजन हे गणपतीचेच झाले पाहीजे. पौराणिक कथा आहे की, अजाणता गणपतीचे शिर कापून टाकल्यानंतर पार्वतीला संतुष्ट करण्यासाठी शंकराने आपल्या पार्षदाला जो कोणी प्राणी प्रथम दिसेल त्याचे शिर आणण्यास सांगितले. पार्षदाला सर्वप्रथम हत्ती दिसतो व पार्षद हत्तीचे मस्तक घेऊन येतो. गणपतीच्या धडावर ते मस्तक ठेऊन गणपती बाप्पाला जिवंत केले जाते व आपला सर्वांचा लाडका गणपती बाप्पा गजानन, गणेश, गणराज अशा विविध नावाने ओळखला जाऊ लागतो.
गणपती बाप्पाला हत्तीचे मस्तक लावण्यात एक वैशिष्टय आहे. हत्ती हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वांहून अधिक बुध्दीमान प्राणी आहे. गण-पती म्हणजे समुहाचा नेता होय. ह्याप्रमाणे नेता व तत्ववेत्ता ह्यांच्या जीवनात बुध्दीची तेजस्विता व समाजाला योग्य मार्गाने नेण्याची अभिलाषा असणे गरजेचे असते.
गणपतीचे हत्तीसारखे बारीक डोळे मानवी जीवनात सूक्ष्म दृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात. बारीक सुई देखिल जमिनीवरुन उचलण्याएवढी सूक्ष्म दृष्टी हत्तीची असते. मानवानेही स्वत:ची दृष्टी सूक्ष्म ठेवली पाहिजे आणि जीवनात नकळत घुसणाऱ्या दोषांना अडवले पाहिजे. हत्तीचे लांब नाक (सोंड) दूरपर्यंत हुंगायला समर्थ असते. नेता व तत्ववेत्ता यांच्यामध्ये दूरदर्शीपणा असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा गंध त्याला प्रथम आला पाहिजे, याचे ही सोंड सूचक आहे. गणपतीला दोन सुळे असतात. एक पूर्ण व दुसरा अर्धा असतो. पूर्ण सुळा श्रध्देचा व अर्धा सुळा बुध्दीचा प्रतिक आहे. गणपती बाप्पाला चार हात असतात. एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात मोदक व चौथ्या हाताने गणपती बाप्पा आपणास आशीर्वाद देतात.गणपती बाप्पाला लंबोदर असे सुध्दा म्हणतात. सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी स्वत:च्या विशाल उदरात साठवून ठेवल्या पाहिजेत ह्याची सूचना त्याचे मोठे पोट देते. गणपतीचे पाय लहान असतात त्यामुळे तो लवकर धावू शकत नाही. म्हणजेच कोणतेही काम करताना उतावीळ होऊ नये. जसा ससा व कासव यांच्या शर्यतीत कासव जिंकतो तसे हळूहळू पुढे जाणाऱ्याचे कार्य सुदृढ व सफल बनत जाते. गणपतीचे वाहन उंदीर आहे. गणपतीचे वाहन इतके लहान असण्याचे कारण म्हणजे उंदीर हा त्याला घराघरात घेऊन जातो. महापुरुषाची साधने अशी लहान व नम्र असली पाहिजेत. जेणेकरुन ते घराघरात प्रवेश प्राप्त करु शकतील व सर्वांसाठी प्रिय बनू शकतील. गणपतीचे वाहन उंदीर हे मायेचेही प्रतिक आहे. उंदराप्रमाणे मायादेखिल मानवाला फुंकर मारुन चावत असते. फुंकून फुंकून चावणाऱ्या या मायेला फक्त ज्ञानी तत्वज्ञानीच अंकुशामध्ये ठेऊ शकतो, तिच्यावर स्वार होऊ शकतो. गणपतीचे वाहन उंदीर आपल्याला फार सूचक गोष्टी समजावते.
गणपतीला दुर्वा फार आवडतात. लोकांच्या दृष्टीने ज्याला काही महत्त्व नाही, असे गवत त्याने आपले मानले व त्याचे मूल्य वाढविले. नेता आणि तत्त्ववेत्ता ज्यांना काही महत्त्व नाही, ज्यांना कोणी विचारत नाही, अशांना आश्रय देतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करुन जीवंत जीवन जगण्याची प्रेरणा देतात. दुसरे, दूर्वांना काही रंग नाही, सुगंध नाही. रंगविरहीत, सुगंधविरहीत; ज्याची जगाच्या दृष्टिने काही किंमत नाही असे कर्मदेखिल प्रभुचरणावर प्रेमाने वाहिले तरी त्याला आवडते.
गणपती बाप्पाला लाल रंगाचे फूल अधिक प्रिय आहे. लाल रंग हा क्रांतीचा सूचक आहे. शिवाय गणरायाला आपण तांदूळ वाहतो. तांदुळाला संस्कृतमध्ये ‘अक्षता’ म्हणतात. अक्षत म्हणजे जो तुटलेला नाही असा; जो खंडीत नाही तर अखंड आहे. देवाबद्दलच्या आपल्या अखंड भक्तीचे दर्शन अक्षता वाहण्यात आहे.
गणपतीला ‘वक्रतुंड’ म्हणतात. ऋध्दिसिध्दीपासून मुख फिरवून राहणाऱ्यालाच ऋध्दिसिध्दी मिळतात. वाकडे तिकडे चालणाऱ्याला, आडव्या रस्त्याला जाणाऱ्याला जो दंड देतो तो वक्रतुंड.
आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर आपल्या इंद्रियाचा एक गण आहे. आणि या गणाचा पती मन आहे. कोणतेही कार्य सिध्दीस न्यायचे असेल तर आपला हा गणपती ठिकाणावर असला पाहिजे. म्हणून गणपतीला प्रथम पूजण्याचा अर्थ असा की, मनाला कार्याच्या प्रारंभापूर्वी शांत व स्थिर करायचे; ज्याच्यामुळे काही विघ्ने येऊ नये व कार्य सरळपणे पार पडावे.
गणेश-चतुर्थीच्या दिवशी आणलेल्या गणपतीचे विसर्जन आपण अनंत चतुर्दशी-दिवशी करतो. जे सान्त आहे त्याला अनंतात, साकाराला निराकारात व सगुणाला निर्गुणात विलीन करतो.
‘अ’ कार म्हणजे गणपतीने घातलेले पद्मासन, ‘उ’कार म्हणजे विशाल पोट आणि ‘म’कार म्हणजे त्याचे मस्तक. अशी रसमय कल्पना ज्ञानेश्वर माऊलीने केलेली आहे. ध्येयमूर्ती, ज्ञानमूर्ती व मंगलमूर्ती गणेश, नेता व तत्त्ववेत्ता ह्यांचे आदर्श स्वरुप आहे.
– अर्चना जोगळे