ऋषीपंचमी (भाद्रपद शुदध पंचमी)

rushi-panchami भारतात जुन्या विद्वान ऋषींबद्दल वाटणारी आपुलकी, निष्ठा व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणून ऋषीपंचमी हा सण साजरा करतात.

सप्तर्षी, अरूंधती व गणपती यांची या दिवशी पूजा करतात. सप्तर्षींच्या सात, अरूंधतीची एक व गणपतीची एक अशा नऊ सुपा-या मांडून पूजा करतात. बायका या दिवशी बैलाच्या मेहनतीचे काहीही खात नाहीत. तसेच गाईचे दूध पीत नाहीत. असे करणे जेव्हा शक्य नसेल तेव्हा फक्त उपवास करतात. खेडेगावातील बायकांना हा उपवास शास्त्रोक्त पध्दतीने करता येतो कारण घराच्या मागील भागात भाजीपाला, वेल इत्यादी लावलेले असतात. त्यांचा ह्या दिवशी उपयोग होतो. या दिवशी पाच प्रकारच्या किंवा एकवीस प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्या जेवणाच्या वेळी गणपतीला नैवेद्य दाखवून मग जेवण करण्याची पध्दत आहे.

गौरीपूजन

gauri pujan गणपतीच्या बरोबरच गौरी हाही सण महाराष्ट्रात मोठया प्रमाणात साजरा होतो. गौरी एका दिवशी येतात, दुस-या दिवशी मिष्टान्नाचे जेवण जेवतात व तिस-या दिवशी आपल्या घरी परत जातात. त्या माहेरवाशिणी आहेत असे मानून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते. गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतिक आहेत असे मानले जाते.

यामागची पौराणिक कथा अशी की फार पूर्वी दानवांचे राज्य होते. दानव देवांना फार त्रास देत असत. सर्व देवांच्या स्त्रियांना ह्यामुळे आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली. म्हणून सर्व देवांच्या स्त्रियांनी एकत्र जमून महालक्ष्मीची मनोभावे पूजा व प्रार्थना केली. महालक्ष्मी प्रसन्न झाली व त्यांच्यावर आलेले संकट तिने टाळले. या प्रसंगाची आठवण म्हणून हा सण तीन दिवस साजरा केला जातो. आपले सौभाग्य अखंड रहावे हा त्यामागचा हेतू असतो.

गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात. तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात. काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात.

कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळयाकाठी अथवा विहीरीपाशी जाते. चार खडे ताम्हणात घेते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने चालावे असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून, हळद कुंकू लावून मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवतात. उभ्या गौरींची खास पातळे व दागिने असतात. गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. दोन सवाष्णीं गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील दारापासून मागील व दारापासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी “गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली” असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पध्दत आहे. उंबरठयावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवाष्णींनी उंबरठयाच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.

गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात. खोब-याची वाटी, फळे, कुंकवाचे करंडे ठेवतात. काही बायका गौरींपुढेलाडू, करंज्या, चकल्या इ. ताजे पदार्थ करून ठेवतात. गौरींपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता, दुर्वा, आघाडा, वस्त्र यांनी गौरींची पूजा करतात. त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळद-कुंकू, साखर देतात. दुस-या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात. दुस-या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात. तळण, खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करतात.

तिस-या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात.

तिस-या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी उतरवतात व त्यांचे विसर्जन करतात.

अनंत चतुर्दशी ( भाद्रपद शुध्द चतुर्दशी)

anant-chaturdashi अनंत चतुर्दशी हे व्रत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली तरच मागून घेतात. ओळीने चौदा वर्षे हे व्रत करण्याचा प्रघात आहे. सर्व व्रतांमध्ये अनंताचे व्रत कडक आहे. या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात. शुध्द पाण्याने ताम्रकलश चौरंगावर मांडून त्यास दोन छोटे रूमाल गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेज तयार करून ठेवतात. कलशावरील पत्रांत अनंताची प्रतिमा किंवा शाळिग्राम मांडून षोडशोपचारे पूजा करतात. समंत्रक चौदा गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याची पण पूजा करतात. पूजा झाल्यावर तो दोरा उजव्या हातात बांधतात. त्यानंतर अनंताची कथा भक्तिभावाने ऐकतात. रात्री मंत्रजागर, गाणी इ. कार्यक्रम करतात. अशा प्रकारे चौदा वर्षे अनंताचे व्रत करतात. इच्छित फळ प्राप्त होते. कित्येक ठिकाणी पिढयान्-पिढया हे व्रत केले जाते.