गोकुळ अष्टमी (श्रावण वद्य अष्टमी)

gokulashtami राम, कृष्ण, विष्णू व शंकर ही भारतीयांची आराध्य दैवते आहेत. श्रीकृष्ण तर त्याच्या गोकुळातील बाललीला, यमुनेवरील रासलीला आणि भगवतगीतेतील उपदेशांमुळे सर्वांचे आवडते दैवत झाला आहे. त्या श्रीकृष्णाच्यासाठी हा सण साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाने धर्माचे रक्षण करण्याकरिता ज्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला तो दिवस म्हणजे गोकुळ अष्टमी होय.

या सणामागील पौराणिक कथा अशी की श्रीकृष्णाचा मामा कंस. कंसाने प्रजेला खूप छळले. श्रीकृष्णाच्या आई-वडिलांना त्याने तुरुंगात ठेवले कारण त्यांना होणा-या मुलांपैकी एकजण कंसाचा वध करणार अशी आकाशवाणी झालेली होती. कृष्णाने कंसाचा वध करून आपल्या आई-वडिलांना बंदिवासातून मुक्त केले. ही कथा सर्वज्ञात आहेच. पुढे याच श्रीकृष्णाने कौरव-पांडव युध्दात पांडवांची बाजू घेऊन कौरवांचा पराभव केला. या गोष्टीचे स्मरण व्हावे म्हणून भारतात सर्व ठिकाणी गोकुळ अष्टमी हा सण उत्साहात साजरा केला जातो. ज्यांच्या घरी हा सण साजरा केला जातो ते सर्वजण ह्या दिवशी उपवास करतात. रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म साजरा करतात, काल्याचे कीर्तन करतात व सुंठवडा प्रसाद म्हणून वाटतात. ह्या दिवशी पाळणा फुलापानांनी सजवून तयार करतात. बळीराम, श्रीकृष्ण यांच्या मूर्ती तयार करून त्या पाळण्यात निजवतात. त्यास तोडे, साखळया असे दागिने घालतात. त्यांची पूजा करतात.

दुस-या दिवशी पारणे करतात. दहीहंडी फोडण्याचा सार्वजनिक कार्यक्रम चौकाचौकातून करतात. दहीहंडी म्हणजे मातीचे एक मडके असते. त्यात ज्वारीच्या लाह्या, पोहे, खोबरे, दही, साखर वगैरे पदार्थ कालवून घालतात व ही हंडी २०-२५ फूट उंचावर बांधून ठेवतात. मुले एका वर्तुळाकारात उभी रहातात व त्यांच्या खांद्यावर दुसरी मुले असे करीत उतरंड करून दहीहंडी फोडतात. आतील पदार्थ प्रसाद म्हणून सर्वांना वाटतात. दहीहंडी फोडण्यासाठी हजारो रुपयांची बक्षिसे लावलेली असतात.

गोकुळअष्टमीच्या दिवशी पूजा करीत असताना एखाद्या सवाष्ण स्त्रीने स्वतःला मूल होण्यासाठी पूजेतला बाळकृष्ण जर चोरून नेला तर तो शुभ समजला जातो. तो चोरलेला बाळकृष्ण वाजत-गाजत घरी नेतात. यथासांग पूजाअर्चा करतात. आपले कार्य सिध्दीस गेल्यावर तोच बाळकृष्ण पुन्हा वाजत गाजत आणून ज्या ठिकाणाहून चोरून नेला असेल तिथेच परत नेऊन ठेवतात. हा उत्सव श्रावण वद्य प्रतिपदेपासून गोकुळअष्टमीपर्यंत म्हणजे श्रावण वद्य अष्टमी पर्यंत असतो.

मंगळागौर ( श्रावण महिन्यांतील प्रत्येक मंगळवारी)

mangalagaur मंगळागौरीची पूजा म्हणजे उमा-शंकराची पूजा. पतीपत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात. लग्न झाल्यावर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात.

नवविवाहित स्त्रिया या दिवशी न्हाऊन, सोवळे नेसून पूजेला बसतात. पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. मंगळागौर पूजलेल्या मुलींनी शक्यतो मुक्याने जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात.

या पूजेकरिता अन्नपूर्णा देवीची मूर्ती, रोजचे पूजेचे साहित्य, बुक्का, अक्षता, पाच खारका, पाच सुपा-या, पाच बदाम, पाच खोब-याच्या वाटया, सोळा प्रकारची पत्री (पाने), दोन वस्त्र, आठ वाती, कापूर, गुलाल, बेल, फुले, दुर्वा, सोळा काडवाती, तुळशीची पाने, केळी किंवा पेरूचा नैवेद्य, पंचामृत, दुधाचा नैवेद्य, जानवे, सोळा विडयाची पाने, गणपतीसाठी सुपारी, अत्तर, शक्य असल्यास केवडयाचे कणीस, एक नारळ, कापड, हळद-कुंकू इ.साहित्याची गरज असते.

ज्यांच्या घरी मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी बायकांना हळदीकुंकवासाठी बोलावतात. हळद-कुंकू, विडयाची पाने, सुपारी व हातावर साखर देतात. सवाष्णींची गव्हाने ओटी भरतात. रात्रीसाठी पोळया, मटकीची उसळ, वाटली डाळ, करंज्या, चकल्या, लाडू वगैरे फराळाचे जिन्नस करतात व सर्वांना जेवायला बोलवतात. रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात.

रात्रभर मंगळागौर जागवतात. त्यावेळी उखाणे, फुगडया, झिम्मा, भेंडया असे खेळ खेळतात. सकाळी उठल्यावर स्नान करून दहीभाताचा नैवेद्य दाखवितात व पुन्हा मंगळागौरीची आरती म्हणतात. नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिला हलवल्यासारखे करतात. यानंतर विहीर, तळे, नदी यांपैकी कोठेही पाण्यात तिचे विसर्जन करतात.

या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात.

मंगळागौरीचे उद्यापन करावयाचे असल्यास त्यासोबत कोणाचीतरी मंगळागौर करावी लागते. त्या मंगळागौरीबरोबर आपल्या व्रताचे उद्यापन करतात. उद्यापनाचे वेळी आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी भटजींना बोलावतात. तांब्याच्या तांब्यात पाणी, अक्षता, आंब्याचा डहाळा ठेवून कलशाची पूजा करतात. मंगळवारी पुण्याहवाचन ठेवण्याकरिता होमहवनासाठी भटजींना बोलावतात. ज्या ठिकाणी होमहवन करतात त्याच ठिकाणी द्यायचे वाण ठेवतात. हे वाण आई-वडिलांना द्यायचे असते. आई-वडील जर नसतील तर भाऊ-भावजय यांना हे वाण देऊन उद्यापन करतात.

काजळ, दोन हिरव्या बांगडया, गळेसरी वगैरे सौभाग्यवाण, तांब्याच्या तपेल्यांत सोन्याचा लहानसा नाग घालून त्याला दादरा बांधून व लाडू असे वाण देण्याची प्रथा आहे. वडिलांना उपरणे, शर्ट, धोतर, टोपी देतात. आईला मणी-मंगळसूत्र व जोडवी देतात. मंगळागौरीच्या मुलींना खण किंवा कापड देतात. जिने मंगळागौरीचे उद्यापन केलेले असते तिला मणी-मंगळसूत्र, जोडवी, साडी, खण देतात.

बैल पोळा (श्रावण वद्य अमावास्या)

pola भारत हा शेतीप्रधान देश आहे. पारंपारिक पध्दतीने शेतीसाठी बैलाची अनमोल मदत घेतली जाते. बैल वर्षभर शेतात राबत असतो. त्याच्या कष्टामुळे धनधान्य मिळते. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्याने केलेल्या कष्टाचे स्मरण व्हावे म्हणून वर्षातून एक दिवस बैलपोळा साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे हा सण शेतकरी साजरा करतात. या दिवशी शेतकरी बैलांना अंघोळ घालून सजवतात. शिंगाना बेगड लावतात. पाठीवर झूल घालून सजवतात. बैलांना वाजत गाजत मारूतीच्या दर्शनाला नेतात. त्या दिवशी बैलांना पूर्ण विश्रांती देतात. संध्याकाळी बैल वाजत गाजत आले की त्यांची पूजा करतात व त्यांना पुरणपोळी खायला देतात.

ज्यांचा शेती हा व्यवसाय नाही ते लोक या दिवशी मातीच्या बैलाच्या मूर्ती विकत आणून पाटावर गहू पसरून त्यावर बैल मांडून त्यांची पूजा करतात. जेवणात पुरणपोळी हे प्रमुख पक्वान्न केले जाते.

पिठोरी अमावास्या (श्रावण वद्य अमावास्या)

या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावास्येला मुले होत व ती लगेच मृत्युमुखी पडत. या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली. चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले. पुढे ती पुन्हा घरी आली. विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले. अशा प्रकारे संतति रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठेरी अमावास्या करून देते.म्हणून ही अमावास्या महत्त्वाची आहे.

या दिवशी मुलाबाळांच्या वंशवृध्दीकरिता पूजा करतात. या दिवशी सवाष्ण ब्राम्हण ही जेवावयास घालतात. पुरणावरणाचा महानैवेद्य दाखवतात.