कार्तिकी एकादशी (कार्तिक शुध्द एकादशी)

kartiki ekadashi वर्षातून दोन महाएकादशी असतात. पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते . आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात, तर कार्तिकी एकादशीला पंढरपूरहून आळंदीस येतात. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महात्म्य असते आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वरांचे महात्म्य असते.

या दिवशी लोक उपवास करतात. भजन-कीर्तनात दिवस घालवितात. विठ्ठलाची महापूजा करतात.

मोक्षदा एकादशी

mokshada-ekadashi कुरूक्षेत्राच्या रणभूमीवर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो उपदेश केला ती गीता ! तो दिवस मार्गशीर्ष शुध्द एकादशी हा होता. म्हणून या दिवसाला गीताजयंती असे म्हणतात. गीतेला आपण मोक्षदायिनी मानतो. म्हणून मग या एकादशीला मोक्षदा एकादशी असेही गौरविले गेले. ही मोक्षदा एकादशी आचरल्याने पितरांचा उध्दार होतो, त्यांना मोक्ष मिळतो, अशी परंपरेची श्रध्दा आहे. त्याची एक कथा आहे. ती कथा अशी – चंपक नगरीच्या वैखानस राजाच्या स्वप्नात एकदा त्याचे पितर आले. त्यांनी आपण सोसत असलेल्या नरकयातनांचे राजाकडे वर्णन केले. यामुळे दु:खी झालेल्या राजाने एका ऋषीला यावर उपाय सांगण्याची विनंती केली. त्या ऋषीने मोक्षदा एकादशी करण्याचा सल्ला राजाला दिला. त्याप्रमाणे राजाने मोक्षदा एकादशी केल्याने त्याच्या पितरांना मोक्ष मिळाला.

ही एकादशी निर्जला एकादशी सारखीच अतिमहत्त्वाची मानली जाते. म्हणजे ही एकादशी केली तर इतर सर्व एकादश्या केल्याचे पुण्य लाभते अशी लोक श्रध्दा आहे.