आम्ही विष्णूपुरीला पोचलो तेव्हा सूर्य मावळतीकडे झुकलेला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यातल्या उन्हाच्या झळा सौम्य झालेल्या होत्या. जलाशयावरून येणा-या वा-यामुळे हया आणखीनच कमी जाणवत होत्या. गोदावरीने महाराष्ट्र सोडण्यापूर्वी तिला घातलेला शेवटचा बंधारा म्हणजे विष्णूपुरी. अडवलेले पाणी खालची पातळी दाखवत होते. पुढच्या महिन्यात कदाचित तिथून दिवसाआड पाणी पुरवले जाईल. पाणी कमी असूनही त्यातला एक ओहोळ बाजूला वळलेला होता. त्यात इथे तिथे थोडेसे पाणी साठलेले होते. मधुन मधुन बेटं उघडी पडलेली होती. त्या ओहोळावरून विजेच्या तारा गेलेल्या होत्या. त्यापैकी एका तारेवर ओळीने चार धीवर पक्षी बसलेले होते. ‘अरे’ आज यांची टोळी आलेली दिसते. आमच्यातला एक पक्षीमित्र म्हणाला. सामान्यपणे हे पक्षी टोळीने वावरत नाहीत, एक किंवा जोडी नजरेला पडते.
आपली दुर्बिंण डोळयावर चढवित दुसरा म्हणाला, ‘अरे ही टोळी नाही एक कुटूंब आणि त्यांच्याकडे आलेला पाहूणा दिसतोय’. खरंच त्यात एक नर, एक मादी आणि एक गेल्या हंगामात जन्मलेलं पिल्लू होते. सर्वांगावर काळे-पांढरे पट्टे असणारा हा खंडया पक्ष्याचाच एक प्रकार. मैनेपेक्षा थोडासा लहान असलेल्या या पक्षाची चोच मात्र खंजिरासारखी दणकट. त्या सर्वांचीच नजर खालच्या पाण्याकडे वळलेली होती. ‘नर मादी दिसायला सारखेच दिसतात मग तुम्ही एक नर व एक मादी हे नेमके कसे सांगता? असा एकानं प्रश्न विचारला.
‘तुमची दुर्बिंण त्यांच्यावर रोखा. ज्या पक्ष्याच्या गळयाखालचा काळा पट्टा तुटलेला दिसतोय ती मादी आणि जिथे दोन अखंड पट्टे दिसताहेत तो नर’. एवढयात नर तारेवरून खाली उडाला आणि हवेतचं त्यानं हेलिकॉप्टर सारखं फडफडणं सुरू केलं. काही वेळ असं स्थिर राहून त्यानं पाण्याच्या दिशेनं धाडकन अगं झोकून दिलं. पाण्यात कोसळून तो क्षणार्धात वर आला पण त्याच्या तोडांत मासा दिसला नाही. वर झेपावून तो पुन्हा त्याच तारेवर येऊन बसला. त्यापाठोपाठ शेजारचे दोन्ही पक्षी हवेत थरथरत उतरले. त्यांनीही पाण्यावर झेप मारली आणि तेही तसेच वर आले. त्यांचीही झेप फुकटच गेली होती.
गोदावरीला पूर आला की पुलावरून खाली पाण्यात उडया मारणा-यांची मला आठवण झाली. ते केवळ हौशीपोटी उडया घ्यायचे. त्यांना हेलिकॉप्टर सारखं तरंगता यायचं नाही की त्यांना मासे धरायचे नसतं. पण या खंडयाची प्रत्येक उडी मासा धरण्याच्या इर्षेतून होत होती. पण आज त्याचं नशिब जोरावर नव्हतं. लागोपाठ उडया मारूनही ते तसेच वर येत होते. आज त्यांना उपवास तर घडणार नव्हता?
भारतात खंडया पक्षाच्या सुमारे वीस जाती आहेत. त्यातला हा काळापांढरा बंडया सोडला तर बाकीचे चांगलेच चमकदार रंगाचे आहेत पण ते अशा त-हेने हेलिकॉप्टरसारखे फडफडत नाहीत. एरवी जलाशयावर एकटा दुकटा बंडया हवेत तरंगून पाण्यात झेप घेताना मी अनेक वेळापाहिला होता पण आज चौघांची सांघिक कसरत पहाण्याचा योग दुर्लभच होता.
खंडया– Halcyon smyrnesis, [White brasted Kingfisher] | |
आकार | साधारण मैनेएवढा |
विणीचा हंगाम | मार्च ते जुलै |
आवाज | मोठयाने कलकल. |
खाद्य | मासे, बेडकाची पिल्ल, टोळ, सरडे, कीटक . |
गैशिष्टय | जलाशयावर, उंच हवेत हेलिकॉप्टरसारखा जागच्या जागी भरभरत एकदम पाण्यात धाडकन उडी घेतो. |
तुम्ही सोलापूरला या. नानजला माळढोक दाखवण्याची जबाबदारी माझी आणि माळढोक दिसला नाही तर सगळा भाडेखर्च मी देईन. असे छाती ठोक आश्वासन बी. एस. कुलकर्णींनी दिल्यामुळे आम्ही तिथे थडकलो होतो. डाक बंगला सोडून १० मिनीटं चाललो असू एवढयात खरंच समोरच्या माळावर एक नर मोळढोक उभा दिसला! जणू तो आमचीच वाट पहात होता.
‘काय बी एस., हा माळढोक तुम्ही पाळलेला तर नाही?’ मी त्यांची फिरकी घेतली. ‘माझ्या पाठीमागे तुम्ही लोक माझा माळढोक कुलकर्णी असा उल्लेख करता हे मला माहित आहे. पण नानज आणि माळढोक यांची मी सांगड घातली म्हणून.’ कुलकर्णी म्हणाले.
समोरचा नर माळढोक ऐटबाजपणे उभा होता. सुमारे सव्वा मीटर उंचीचा हा पक्षी लांबून गिधाडासारखा वाटतो. बदामी पाठ, पांढरं पोट, डोक्यावर काळा तुरा अशा थाटात तो असल्यानं साधारण त्याच्यासारख्याच दिसणा-या पण ठेंगण्या आणि कमी वजनदार असलेल्या माद्यांच्या गराडयात तो असतो. आज मात्र माद्यांचे महिलामंडळ दूर कोठेतरी गेलेलं होतं. १५ किलोहून अधिक वजन असलेल्या माळढोकाला जमिनीवर थोडासा स्टार्ट घेतल्याशिवाय उडता येत नाही पण वर उडाला की बळकट पंखांनी हवा कापत मात्र तो छान उडतो. कमी पावसाच्या झुडपी गवताळ भागात तो रहातो. शिकारीमुळे माळढोकांची संख्या खूप घटली आहे. मादी माळावर कुठेही अंडी टाकून देते. त्यामुळे ती अंडी कोल्ह्या कुत्र्याकडून पळवली जाण्याचा धोका असतो. म्हणून वनखात्याचे कर्मचारी सर्वत्र हिंडून काळजी घेत असतात.
माळढोकांच्या संरक्षणाकरता १९८१ ते ८८ या काळात त्यांचा परिस्थिती विज्ञानविषयक अभ्यास बी.एन.एच.एस. ने सुरु ठेवला होता. त्या काळात आंध्रप्रदेशातील गोल्ला पाडू येथे रणजित यांच्या हाती तिथल्या वॉचमनने एक माळढोकाचे पिलू सोपवलं होते. २/३ आठवडयाचे ते पिलू घाबरलेले आणि भुकेलेले होते. आई विरहित पिलू वाढवायला मिळालेली ही चांगलीच संधी होती. त्याला उकडलेले अंडे, नाकतोडे, यांचा फराळ सुरू केला. महिनाभरात तो चांगला सुधारला एक किलोने त्यांचे वजन वाढलं तो नर होता हे ही आता स्पष्ट झालं. त्यांचं नाव रामू असं ठेवले. दिवसभर तो रणजीतच्या मागे फिरत असायचा. मात्र बरेच दिवस त्याला किडे भरवावे लागत . सुमारे आठ महिन्यांचा झाल्यावर मग तो स्वत: किडे पकडू लागला. बोरासारखी बारकी फळे तोडून खाऊ लागला. एकदोन वेळा माळढोकाच्या कळपात सोडायचा प्रयत्न केला असता घाबरून तो परत फिरायचा कदाचित पहिल्यापासून तो माणसात वावरल्याने पक्ष्यांमध्ये मिसळणे त्याला विचित्र वाटत होते. ८८ च्या मे महिन्यात हा प्रकल्प पुरा झाल्याने रामूला माळावर सोडून रणजितला मुंबईला परतावं लागले.
नाशिकजवळच्या ओझर परिसरात माळढोक हुडकून काढण्याचे आणि त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याचं श्रेय मानव वन्यजीव संरक्षक श्री. विश्वरूप शहा आणि त्यांच्या नेचर काँझरवेशन सोसायटीकडे जाते.
माळढोक – Choriotis nigriceps [Great Indian Bustard] | |
आकार | गिधाडापेक्षा मोठा, एक फुट, वजन सुमारे १६ किलो. |
विणीचा हंगाम | मार्च ते सप्टेंबर |
आवाज | हूडक – हूडक |
खाद्य | धान्य, रोपांचे कोंब, टोळ, सरडे, छोटे किडे. |
– दिगंबर गाडगीळ