भीमा नदीकाठी हे सिद्धिविनायकाचे मंदिर वसलेले आहे. या ठिकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक आणि या परिसराला सिद्धटेक असे म्हंटले जाते. भगवान विष्णूने येथील गणेश मूर्तीची स्थापना केली. मधु व कौटभ या दैत्यांचा वध करण्यासाठी श्री विष्णूने येथे विनायकाची आराधना केली. विष्णूस येथे सिद्धी प्राप्त झाली म्हणून येथील गणेशास सिद्धीविनायक म्हंटले जाऊ लागले. येथील दक्षिणवाहिनी असणा-या भीमा नदीला पूर आला तरी परिसरात नदीच्या प्रवाहाचा आवाज होत नाही. या नदीवरील दगडी घाट अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची असणारी ही एकमेव मूर्ती असल्याने तिचे सोवळे कडक आहे. गणेशास सकाळी खिचडी, दुपारी महानैवेद्य, संध्याकाळी दुध भात, व रात्री भिजलेल्या डाळीचा नैवेद्य असतो. हे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या महाद्वारावर नगारखाना आहे. महाद्वारातून आत गेल्यावर सभामंडप असून त्यापुढे गाभारा आहे. गाभा-यात उजव्या सोंडेची व शेंदूर लावलेली सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. त्याची एक मुंडी दुमडलेली असून त्यावर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गाभा-यातील मखर पितळाची असून त्यावर चंद्र, सूर्य, गरुड, नागराज यांच्या आकृती कोरलेल्या असून दोन्ही बाजूला जय-विजय आहेत.
स्थान : तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर
अंतर : अहमदनगर-पारगाव फाटा-श्रीगोंदा-सिद्धटेक ८२ कि.मी.
अहमदनगर-रुइछत्तिसि-श्रीगोंदा-सिद्धटेक ८९ कि.मी.
अहमदनगर-कर्जत-राशीन-सिद्धटेक १०७ कि.मी.
पुणे-भिगवण-राशीन-सिद्धटेक १४२ कि.मी.
पुणे-दौंड-पेडगाव-सिद्धटेक ११४ कि.मी.
पुणे-दौंड-शिरापूर ९९ कि.मी. पुढे एक किलोमीटर पायी रस्ता व भीमा नदीतून नावेने सिद्धटेक. मात्र जिल्हा बदल असल्यामुळे नावेची वाहतूक एकेरी आहे.
जवळची ठिकाणे : किल्ला व भीमेकाठाची प्राचीन मंदिरे
श्रीगोंदा : ज्ञानेश्वरीचे प्रवचनकार महान संत शेख महम्मद महाराज यांची समाधी
राशीन : देवाचे मंदिर व झुलती दीपमाळ
रेहेकुरी : अभयारण्य
भीगवण : पक्षी अभयारण्य
दौंड : विठ्ठल व भैरवनाथाचे मंदिर
अहमदनगर वरून रुइछत्तिसि मार्गाने आल्यास रणगाडयांचे प्रदर्शन व मांडव्य ऋषींचे मांडवगण पाहता येते.
बल्लाळाची कथा गणेश पुराण व मुद्गुल पुराणात आहे. कल्याण नावाच्या व्यापा-याचा बल्लाळ हा सुपुत्र. बालपणापासून त्याची विनायकावर श्रद्धा होती. त्याने गावातील इतर मुलांनाही भक्ती मार्गास प्रवृत्त केले. त्यामुळे गावातील मुलांचे अध्ययन व व्यवहाराकडे दुर्लक्ष्य होऊ लागले. हे पाहून त्याच्या पित्याचा क्रोध अनावर झाला. त्याने बल्लाळाच्या गणेशास दूर फेकून दिले. व बल्लाळाचे हाल करून त्यास झाडाला टांगून दिले. बल्लाळाने गणेशाची आराधना केली. गणेश त्यास प्रसन्न झाले आणि त्याच्या इच्छानुसार पाषाणरूपी मूर्तीत येथेच राहिले. व बल्लाळेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले. बल्लाळेश्वर मंदिराच्या अगोदर श्री धोंडी विनायकाचे मंदिर आहे. बल्लाळाच्या पित्याने फेकून दिलेली हीच ती मूर्ती. प्रथम या मूर्तीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. येथील बल्लाळेश्वराची पूजा सकाळी ११.३० पर्यंत स्वहस्ते करता येते. माघी चतुर्थीस मध्यरात्री श्री बल्लाळेश्वर स्वहस्ते प्रसादाचे सेवन करतात अशी श्रद्धा असल्यामुळे असंख्य भाविक या समारंभासाठी येतात.
रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नदीच्या सान्निध्यात स्वयंभु असे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सुर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात. मंदिराच्या आवारात मोठी घंटा असून सभामंडपाला आठ खांब आहेत. पुढील गाभा-यात दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहणा-या उंदीराची मूर्ती आहे. आतील गाभा-याच्या वरील बाजू घुमट आकार असून त्यावर अष्टकोनी कमळ आहे. या गाभार्यात बल्लाळेश्वराची डाव्या सोंडेची पाषाणाची मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ विशाल असून डोळ्यात व बेंबीत हिरे बसविलेले आहेत. चांदीच्या थाळीवर रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती चव-या ढाळीत आहेत.
स्थान : तालुका सुधागड, जिल्हा रायगड, पिन.को.-४१० २०५
अंतर : पाली-खोपोली ३८ कि.मी., पुणे १११ कि.मी., मुंबई १२० कि.मी.
पुण्यास जाण्यासाठी आता दोन मार्ग आहेत. एक खोपोली मार्गे व दुसरा ताम्हाणे घाटातून मुलाशी मार्गे.
निवास : भक्तनिवास (दूरध्वनी-(०२१४२) ४२२६३), बल्लाळेश्वर देवस्थान (दूरध्वनी-२४२२६३)
जवळची ठिकाणे : मंदिराजवळ सरसगड किल्ला.
सिद्धेश्वर : शंकराचे स्वयंभू स्थान (३ कि.मी.)
उन्हेरे : गरम पाण्याचे झरे
उद्धर : रामाने जातायुचा उद्धार केलेले स्थान (१० कि.मी)
रामेश्वर : शंकराचे स्वयंभू स्थान. येथील अस्थी कुंडात टाकलेल्या अस्थी पाण्यात विरघळतात.
सुधागड : किल्ला. भृगु ऋषीने स्थापन केलेले भोराई देवीचे मंदिर.
गोमाशी : भृगु ऋषीचे तपश्चर्येचे स्थान (१४ कि.मी.)
ठाणाळे : लेण्या.
उत्तर वरदायिनी : देवीने रामास वर दिला ते ठिकाण (१० कि.मी.)
जांभूळपडा : सिद्धलक्ष्मी मंदिर. दशभुजा व उजव्या सोंडेची जागृत गणेश मूर्ती.
पुई : एकवीस गणेश मंदिर.
पाच्चापूर-भोराई : भोराई किल्ला व देवीचे मंदिर