कथा बिनाका गीतमालाची


बिनाका गीतमाला ने पहिले ऐकवलेले गीत

‘अगले पायदान पे है’ हे अमीन सयानी यांनी ऐकवलं की, श्रोते कान टवकारून ऐकायचे की, लोकप्रियतेच्या आधारावर आता कोणत्या गीताचा क्रमांक आहे? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यास ते कमालीचे उत्सुक असायचे.

१९५२ मधील डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या बिनाका गीतमालेच्या वार्षिक कार्यक्रमाची सुरूवात मात्र १९५३ पासून झाली. कारण १९५२ मध्ये फक्त पाचच बुधवारी बिनाकाचा कार्यक्रम प्रसारित झाला आणि १९५२ साल मावळतांना बुधवार होता ती तारीख अर्थातच ३१ डिसेंबर होती. त्या दिवशी प्रसारित झालेल्या कार्यक्रमाला वार्षिक कार्यक्रमाचे स्वरूप देणे, गीतांचा क्रम लावणे हे उचित नसल्याने केवळ लोकप्रिय गीतांचा विचार करूनच अमीन सयानी यांनी काही गीते श्रोत्यांना ऐकवली.

आज आपण १९५० ते १९६० या काळास हिंदी चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ म्हणतो. तेव्हा ओघानेच मनात प्रश्न निर्माण होतो की १९५२ मध्ये लोकप्रिय गीते कोणती असतील? १९५२ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट पाहाता सुंदर गीतांची एक भली मोठी यादी तयार होईल. त्यांच्यात क्रमवारी लावायची झाल्यास मतमतांतरे होतील. अर्थातच ३ डिसेंबरच्या पहिल्या कार्यक्रमात आणि नंतरच्या चार बुधवारच्या कार्यक्रमात ज्या चित्रपटगीतांचा समावेश होता त्यामध्ये ‘आन, दाग’ आणि ‘बैजू बावरा’ म्हणजेच संगीतकार नौशाद आणि संगीतकार शंकर-जयकिशन यांच्या गीतांनीच ‘धूम मचायी थी’ . अर्थात त्यात जास्त भरणा नौशाद यांच्या गीतांचा कारण ‘आन’ आणि ‘बैजू बावरा’ हे दोन्ही चित्रपट त्यांच्याच संगीताने सजलेले होते.

तशातच बिनाकावर वाजलेले पहिले गीत कोणते तर ते ‘बैजू बावरा’चे गीत. ‘बैजू बावरा’ मध्ये एकूण १३ गीते आहेत आणि सर्वच एकापेक्षा एक सरस आहेत. मग प्रश्न पडतो यापैकी कोणते गीत ‘बिनाका’त ऐकवण्यात आले? तर ‘तू गंगाकी मौज मे जमुना की धारा’ हेच ते बिनाकावर वाजले गेलेले पहिले गीत होय.

१९७८ मध्ये बिनाका गीतमालाच्या रजत जयंतीनिमित्त प्रसारित झालेल्या कार्यक्रमात अमीन सयानी यांनी सांगितले होते, ”या वर्षात तसा श्रोत्यांच्याकडून प्रतिसाद मागवून लोकप्रियतेच्या आधारे गीतांचा क्रम लावून बिनाकाचा वार्षिक कार्यक्रम सादर झाला नसला तरी त्यातल्या त्यात विचार करून १९५२ च्या लोकप्रिय गीतांचा क्रम पुढीलप्रमाणे लावण्यात आला आहे”. (अर्थात बिनाकाच्या पध्दतीप्रमाणे सर्वात जास्त लोकप्रिय गीताचा उल्लेख शेवटी करत आहे.)

१) ‘मै पागल मेरा मनवा पागल, पागल मेरी प्रीत रे’- चित्रपट-आशियाना (संगीतकार-मदन मोहन, गीतकार-राजेंद्रकृष्ण आणि गायक-तलत महमूद)
२) ‘तसवीर बनाता हू तेरी खूने जिगरसे’- चित्रपट-दीवाना (संगीतकार-नौशाद, गीतकार-शकील बदायुनी आणि गायक-मोहम्मद रफी)
३) ‘देखो जादू भरे मोरे नैन’- चित्रपट-आसमान (संगीतकार-ओ.पी.नय्यर, गीतकार-प्रेम धवन आणि गायिका-गीता दत्त)
४) ‘मुहब्बत ही न जो समझे वो जालीम प्यार क्या जाने?’- चित्रपट-परछाई (संगीतकार-सी. रामचंद्र, गीतकार-नूर लखनवी आणि गायक-तलत महमूद)
५) ‘ मै दिल हू इक अरभान भरा’ – चित्रपट-अनहोनी (संगीतकार-रोशन, गीतकार-सत्येंद्र अथैय्या आणि गायक-तलत महमूद)
६) ‘ये हवा ये रात ये चाँदनी’ – चित्रपट-सगदिल (संगीतकार-सज्जाद हुसेन, गीतकार-राजेंद्रकृष्ण आणि गायक-तलत महमूद)

आणि या गीतांच्याखेरीज आजच्या जमान्यातील भाषेत बोलायचे तर ‘टॉप थ्री’ गीतांमध्ये अनुक्रमांक तीनवर ‘आन’ चित्रपटातील ‘दिल मे छुपाके प्यार का तुफान’ हे रफीने गायलेले गीत होते तर द्वितीय क्रमांकावर ‘दाग’ चित्रपटातील ‘ए मेरे दिल कही और चल’ हे शैलेद्रने लिहिलेले आणि शंकर-जयकिशनने संगीतबध्द केलेले गीत होते. ते तलतने गायले होते आणि लता मंगेशकर यांनी ‘वेगळया मूड’मध्ये गायले होते. प्रथम क्रमांक ‘बैजू बावरा’च्या ‘तू गंगा की मौज’ने मिळवला. त्या गीताचे गीतकार शकील बदायुनी होते आणि संगीतकार नौशाद आणि गायक लता-रफी होते.

या सर्वाधिक लोकप्रिय गीतांखेरीज १९५२ या वर्षातील बिनाका गीतमालाच्या कार्यक्रमात ‘आन’ची दोन गीते (मान मेरा एहसान आणि तुझे खो दिया), ‘बैजू बावरा’ची दोन गीते (ओ दुनियाके रखवाले आणि बचपन की मुहब्बत को) तसेच ‘दाग’ मधील (प्रीत ये कैसी बोल रे दुनिया), ‘नौबहार’मधील (ए री मै तो प्रेम दीवानी), ‘शिनशिना के बबला बू’मधील (झूमे झूमे दिल मेरा) या गीतांचाही समावेश होता.

अशा तर्‍हेने १९५२ साल ‘बिनाका गीतमाला’ला जन्म देऊन संपले आणि मधुर गीतांची लोकप्रियता क्रमवारी असा एक नवा खेळ हिंदी चित्रपट गीतप्रेमींसाठी हिंदी भाषेतून बिनाकाच्या रूपाने सुरू झाला.

– पद्माकर पाठक, सातारा