कथा बिनाका गीतमालाची


‘बीनाका गीतमाला’ची जन्मकथा

”बिनाका गीतमाला’चे स्वरूप काय होते? तर हा कार्यक्रम म्हणजे केवळ सर्वाधिक लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम नव्हता, तर हा कार्यक्रम हेही सांगत असे की, गेल्या आठवडयात कोणती हिंदी चित्रपटगीते कोणत्या क्रमाने लोकप्रिय आहेत. हिंदी चित्रपटगीतांच्या लोकप्रियतेची अशी क्रमवारी केवळ बिनाका गीतमाला या कार्यक्रमाने सतत ४१ वर्षे जाणकारांपर्यंत पोहोचवली.

हिंदी चित्रपट गीतांच्या बाबतीतील ही अशी माहिती बिनाका गीतमाला सुरू होण्याआधी म्हणजे १९५२ पूर्वी आणि बिनाका गीतमाला संपल्यानंतर म्हणजे १९९४ नंतर कोणत्याही कार्यक्रमाने ठेवली नव्हती व ठेवली नाही.

हिंदी चित्रपट गीतांच्या इतिहासाच्यादृष्टीने बिनाका गीतमालाचे फार मोठे योगदान आहे. ७७ वर्षांच्या बोलपटांच्या इतिहासातील जवळ जवळ ४१ वर्षांची ही नोंद फार महत्वपूर्ण ठरते. त्या संदर्भातील खूप महत्वाची माहिती या नोंदीत समाविष्ट आहे.

जेव्हा टीव्ही नव्हता त्याकाळात सामान्य रसिकांना गाणी ऐकण्यासाठी रेडिओचीच गरज लागत होती, आजच्या इतका जाहिरांतीचा भडीमार नव्हता त्या काळात एका टुथपेस्टचा खप वाढविण्यासाठी हा कार्यक्रम असूनही हा कार्यक्रम फिल्मी गीतासाठीच आहे, असे वाटावे असे याचे स्वरूप होते.

बिनाकासारखे कार्यक्रम वारंवार तयार होत नसतात. रसिकांची आजची नवी पिढी या कार्यक्रमाचे तसे महत्त्व जाणू शकणार नाही, पण मागच्या एका पिढीचे भावविश्व या कार्यक्रमाशी गुंतलेले होते. अमीन सयानी यांचा आवाज ह्या कार्यक्रमाचा आत्मा होता. निवेदनशैलीचे आदर्श म्हणून ज्यांच्याकडे आदराने बघावे असे अमीन सयानी बिनाका गीतमाला कार्यक्रमाचे निवेदन करीत असत. त्यांच्या आवाजातील गोडवा, मार्दव, रसिकांशी संवाद साधण्याची शैली ही श्रोत्यांशी नाते जोडून गेली होती.

‘सीबा गायगी ऑफ इंडिया लिमिटेड’ या कंपनीने तयार केलेली बिनाका टुथपेस्ट व टुथब्रश यांची जाहिरात कशा पध्दतीने करावी याचा विचारविनिमय कंपनीचे मॅनेजर करत होते. त्याकाळात रेडिओ सीलोन इंग्रजी आणि हिंदी सेवा अशा दोन भागातून आपल्या श्रोत्यांचे मनोरंजन करत असे. त्यापैकी इंग्रजी विभागातर्फे लोकप्रिय गीतांचा ‘हिट परेड’ नावाचा एक कार्यक्रम सादर होत असे. त्याची लोकप्रियता पाहून (म्हणजे त्याकाळात दर आठवडयाला ९०० पत्रे येत असत) असाच एखादा कार्यक्रम हिंदी विभागातर्फे प्रसारित करावा असे रेडिओ सीलोनच्या व्यवस्थापनाने ठरविले आणि त्याचवेळी सीबा गायगी कंपनीच्या व्यवस्थापकांकडेही विचारणा झाली आणि त्यातूनच एका नव्या कार्यक्रमाचा जन्म झाला आणि त्याची रूपरेषा ठरली.

दि. ३ डिसेंबर १९५२ रोजी, बुधवारी, रात्री ८ ते ८.३०, यावेळेत बिनाकाचा पहिला कार्यक्रम सीलोन आकाशवाणीवर प्रसारित झाला. याबाबतीत निवेदक अमीन सयानीने म्हटले होते ”साल है १९५२! जिसमे एक नौजवान ब्रॉडकॉस्टरसे कहा गया है की वह एक्सपेरिमेंट के तौरपर ‘गीतमाला’ नामका एक रेडिओ प्रोग्रॅम लिखे, प्रोड्यूस करे और खुदही उसे पेश करे जिसके लिए उसे हर हप्ते २५ रुपये दिये जाएंगे…जी हाँ, वो नौजवान ब्रॉडकॉस्टर मैं ही था….खैर तो प्रोग्रॅम तैयार हुआ, ब्रॉडकॉस्ट हुआ और पहलेही हप्तेसे दाखील हो गया सुननेवालोंके दिलोंमें….”

बिनाका गीतमालाशी सबंधित जी कॅसेट पुढे कालांतराने एच.एम.व्ही कंपनीने तयार केली. त्यामधील अमीन सयानी यांच्या आवाजातील हे…आहे. आणि ”पहलेही हम दाखील हो गया सुननेवालोंके दिलोंमे…..” हे शब्दश: खरे आहे. १९५२ मध्ये बिनाका गीतमालाचे फक्त पाचच कार्यक्रम प्रसारित झाले, त्या तारखा होत्या ३ डिसेंबर, १० डिसेंबर, १७ डिसेंबर, २४ डिसेंबर, आणि ३१ डिसेंबर!

‘आन, दाग’ तसेच ‘बैजूबावरा’च्या गीतांनी तेव्हा अमीन सयानी यांच्या भाषेत ‘धुम मचाई थी!’ प्रचंड लोकप्रिय गीतांच्या बाबतीत अमीन सयानी यांनी रूढ केलेला हा शब्दप्रयोग ‘धुम मचाई थी!’ अशा अनेक गोष्टी बिनाका गीतमालामधून रूढ केल्या होत्या.

– पद्माकर पाठक, सातारा