संगीतकला

गायन - हिंदुस्तानी संगीत

भावगीत

थाट पूर्वी

संगीत-प्रेमी रसिकहो, नमस्कार !
मित्रहो, ‘हिंदुस्तानी संगीत’ ह्या लेखमालेतील, ह्या भागात आपल्याला ‘थाट पूर्वी’ , ह्या थाटाची आणि त्यावर आधारीत असलेल्या रागांची ओळख करुन घ्यायची आहे. मारव्याप्रमाणेच कातर व उदास मूड असलेल्या ह्या थाटात तसे फारसे प्रचलीत असलेले राग नाहीत. राग पूर्वी, राग बसंत, राग पुरिया धनश्री हे थाट पूर्वीवर आधारीत असलेले काही मोजके प्रचलीत राग.

‘पहिला चेंडू ‘ टाकण्याआधी थाट पूर्वीचे स्वरुप कसे आहे ते बघू या. (ह्या लेखमालेतून मी तुम्हाला निव्वळ ‘बाऊंसर’च टाकत असतो, असा कृपया समज करुन घेऊ नका हं ! गोलंदाजीत मी अगदी कच्चा लिंबू आहे, तुम्ही अगदी सहज ‘सेंचुरी’ माराल. ह्याचे कारण मी ‘नेट प्रक्टीस’ च्या दरम्यान मी फारसा ‘नेट’ लावून कधी गोलंदाजी केलेली मला आठवत नाही. असो.)

थाट पूर्वी – सा, को.रे, ग, ती.म, प, को.ध, नि.
आणि ह्या थाटावर आधारीत एक राग, ‘राग पूर्वी’ असा आहे,
आरोह- सा, को.रे, ग, ती.म, प, को.ध, नि, सा!
अवरोह- सा!, नि, को.ध, प, तीं.म, ग, को.रे, सा
वादी स्वर- ग , संवादी स्वर- नि.
गान समय- संधिकाल

‘राग पूर्वी’ हा पूर्वी थाटातील एक अतिशय भावगर्भ आणि हृदयस्पर्शी असा राग आहे. ह्याचे अतिशय बोलके उदाहरण म्हणजे सुरेश वाडकर ह्यांनी गायलेले आणि हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबध्द केलेले ‘दयाघना, का तुटले चिमणे घरटे’ हे सुधीर मोघे ह्यांचे गीत ! ह्या गीतातील ‘बालपण ऊतू गेले, तारुण्य नासले, अन वार्धक्य साचले’ ह्या काळीज पिळवटून टाकणा-या भावना ‘राग पूर्वीच्या’ सूरांनी इतक्या समर्थपणे पेलल्या आहेत की त्यांचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य आहे. ह्या गीताची चाल हृदयनाथजींनी, राग पूर्वीतील एक चीज ‘रसुलील्ला’ च्या आधाराने बांधली आहे. रसिकहो, हे गीत जर आपण संध्याकाळच्या सुमारास ऐकले तर ते आपल्याला जास्त परिणामकारक वाटेल. ह्याचे कारण असे की ‘राग पूर्वी’ हा संध्या समयीचा राग आहे, आणि कुठलाही राग किंवा त्यावर आधारीत गीत जर, त्या रागाच्या गायन-वादनाचा जो समय शास्त्राने ठरवून दिलेला आहे, त्या वेळेस ऐकल्यास, तो राग किंवा ते गीत, जास्त प्रभावी वाटते.

‘राग पुरिया धनश्री’ हा थाट पूर्वी वर आधारीत असलेला आणखी एक लोकप्रिय राग आहे. ह्या रागाने भावगीतांच्या दुनियेला दिलेली एक अजरामर भेट म्हणजे, आशाजींनी गायलेले ‘जिवलगा, राहिले रे, दूर घर माझें’ हे भावगीत ! हृदयनाथजींनी ह्या गीतातील भाव खुलविताना राग पुरीया धनश्रीच्या सूरांचा अतिशय खुबीने आणि कलात्मक पध्दतीने उपयोग केलेला आहे. ही चाल ऐकताना, ‘ पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’ ह्या शब्दांची आपणास अक्षरश: प्रचीतीच येत नाही का ?

हुबेहुब ‘जिवलगा’ सारखीच चाल असलेले आणि आशाजींनीच गायलेले ब्रज भाषेतील ‘ गे माई री’ असे एक गैरफिल्मी भावगीत आहे. ब-याच वर्षांपूर्वी आकाशवाणीवरील सुगम संगीताच्या कार्यक्रमातून हे लागायाचे. आपल्यापैकी गेल्या पिढीतील ब-याच जणांनी हे गीत ऐकले असेल.

ह्याच रागावर बेतलेले एक बरेचसे अलिकडले चित्रपटगीत म्हणजे ‘ रंगीला’ ह्या चित्रपटातील ‘हाय रामा, ये क्या हुआ’ हे उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ वर चित्रीत करण्यात आलेले गीत!

८० च्या दशकातील लताजींनी गायलेले, ‘बदलते रिश्ते’ ह्या चित्रपटातील , ‘मेरी सासोंको जो महका रही है, पहले प्यार की खूशबू ‘ हे एक खूप गोड चालीचे गीत! ह्या गीताच्या चालीतील सूर सुध्दा राग पुरीया धनश्रीचेच.

थाट पूर्वी वर आधारीत आणखी एक बहारदार राग म्हणजे ‘राग बसंत’. नावाप्रमाणेच वसंत ऋतुमधे गायल्या जाणारा हा राग आहे.

‘केतकी गुलाब जुही, चंपक बन फुले’ हे मन्ना डे आणि पं.भीमसेन जोशी ह्यांनी गायलेले ‘बसंत बहार’ ह्या चित्रपटातील, गीत ऐकले नसेल असा माणूस विरळाच! अप्रतिम गायकी, वसंत ऋतुचे अगदी जिवंत चित्रण करणारे लडिवाळ शब्द, आणि ह्यावर कळस चढविणारी नितांत सुंदर चाल, असा त्रिवेणी संगम असलेले हे गीत, राग बसंत-बहार ह्या रागात स्वरबध्द करण्यात आले आहे. हा रागात आपल्याला, राग बसंत आणि राग बहार, ह्यांच्या स्वरांचा अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने केलेला मिलाफ ऐकायला मिळतो. संगीत क्षेत्रातील दोन दिग्गज; मन्ना डे आणि पं. भीमसेन जोशी ह्या दोन भिन्न शैलीच्या दिग्गज गायकांनी हे गीत गाताना, ह्या गीताच्या चालीचे अक्षरश: सोने केले आहे.

ह्या गीतातील राग बसंत आणि राग बहार हे दोन्ही राग, मन्ना डे आणि भीमसेनजी अशी मानवी रुपे घेउन प्रत्यक्ष रसिकानाच भेटायला आले आहेत, अशी एक कवी कल्पना हे गीत ऐकताना माझ्या मनात नेहमी डोकावून जाते.

‘राग बसंत’ वरच आधारीत एक अगदी अलिकडील चित्रपटगीत म्हणजे ‘देवदास’ ह्या चित्रपटातील ‘काहे छेड छेड मोहे’ हे कविता कृष्णमूर्ती ह्यानी गायलेले अतिशय मधुर चाल असलेले गीत. चित्रपटात हे गीत, ‘चंद्रमुखी’ म्हणजे माधुरी दिक्षित हिच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.

थाट पूर्वीवर आधारीत आणखी दोन राग म्हणजे राग श्री आणि राग परज. तसे पाहिले तर हे राग अनवटच म्हणायला हवेत; आपल्याला ते बहुदा शास्त्रीय संगीताच्या मैफीलीतुन किंवा रेडिओवरील कार्यक्रमातुनच ऐकायला मिळतील. ह्या रागांवर एखादे गीत आधारीत असल्याचे माझ्या तरी माहितीत नाही.

हा लेख संपविताना एक गोष्टीचा उल्लेख करणे मला आवश्यक वाटते आणि ती म्हणजे एखाद्या गीताची चाल, एखाद्या रागात बांधताना, संगीतकारावर, त्या रागातील, शास्त्राच्या नियमाप्रमाणे असलेले सर्व सूर, चालीत आलेच पाहिजेत असे मुळीच बंधन नसते. गीताची रंजकता वाढविण्यासाठी तो इतर रागांचे सूर सुध्दा त्या चालीत घेऊ शकतो. सुगम संगीतकाराला हे स्वातंत्र्य असते. म्हणूनच एखाद्या रागावर आधारीत असलेले चित्रपटगीत ऐकताना, आपल्याला बरेच वेळा इतर रागांचे सूर सुध्दा ऐकायला मिळतात आणि त्यात वावगे असे काहीच नाही. परंतु एखादा राग किंवा ख्याल, शास्त्रीय पध्दतीने सादर करताना, शास्त्रीय संगीत गाणा-याला मात्र हे स्वातंत्र्य नसते. शास्त्रीय संगीताच्या नियमाप्रमाणे, त्या रागात जे सूर असतील, तेच सूर घेउन तो राग, त्या गायकाला सादर करावा लागतो. सादरीकरणाच्या पध्दतीत मात्र त्याला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असते.

अच्छा, आता आपला निरोप घेतो, लेखमालेतील पुढील भागात आपली भेट होईलच!

– जयंत खानझोडे