संगीतकला

गायन – हिंदुस्तानी संगीत

भावगीत

संगीतकला

संगीत कला ही अतिप्राचीन कला आहे. आदि मानवाला अज्ञात गोष्टींची भिती वाटत असे. त्या अज्ञात शक्तींना प्रसन्न करण्यासाठी आदि मानव ढोल वा तत्सम चर्मवाद्ये वाजवू लागला. त्यातूनच पुढे संगीताचा जन्म झाला असावा, असा मानववंशशास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

खरेतर संगीताची पाळेमुळे ही त्यापेक्षाही फार खोलवर रूजली आहेत. भारतीय परंपरेतील महान ग्रंथ म्हणजे वेद. चार वेदांपैकी ‘सामवेद’ या वेदामध्ये संगीताची माहिती सापडते. भारतीय परंपरेमध्ये वेद हे अ-पौरूषेय मानले आहेत. म्हणजेच वेदांचा कर्ता हा मानव नसून, जगाचे नियंत्रण करणारी अज्ञात शक्ती हीच वेदांच्या निर्मितीचे कारण आहे, अशी भारतीयांची धारणा आहे.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या व्युत्पत्तीबाबत निरनिराळे सिध्दान्त प्रचलित आहेत. भारतीय संगीतामध्ये असलेली विविधता ही भारतातील नानाविध जाती-जमातींच्यामुळे आहे, असे म्हटले जाते. संगीताला वाहिलेला तसेच संगीताबद्दल सर्वंकष माहिती देणारा ग्रंथ म्हणजे, भरतमुनींचे नाटयशास्त्र होय. म्हणूनच ‘पाचवा वेद’ अशी संज्ञा वापरून ‘नाटयशास्त्राचा’ गौरव केला जातो.

नृत्य, गीत आणि वाद्य या तिन्हींचे मिळून संगीत बनते. राग व ताल या भारतीय संगीतातील प्राथमिक संकल्पना आहेत. ‘सा, रे, ग, म, प, ध, नि, सा’ या सात सुरांच्या आरोह-अवरोहातून ‘राग’ आकारास येतात. ताल हे लयीवर आधारित आहेत. ठराविक अंतरावर, ठराविक गतीने दिला जाणारा ठेका म्हणजे ताल होय.

भारतीय संगीताचे ‘हिंदुस्थानी संगीत’ व ‘कर्नाटक संगीत’ असे दोन प्रकार आहेत. साधारणत: उत्तर भारतीय संगीत हे हिंदुस्थानी संगीत मानले जाते, तर दक्षिण भारतीय संगीताला कर्नाटक संगीत असे नाव आहे. त्यातही कर्नाटक संगीत हे भारतातील अतिप्राचीन संगीत आहे, असे मानले जाते.

भारतीय संगीत हे रसभरित, वैविध्यपूर्ण आणि मनोरंजक आहे. भारतीय संगीताची नेमकी जाण येण्यासाठी, अवघा जीवनकाळ देखील कमी वाटावा, इतका हा संगीत-महासागर विशाल आणि सखोल आहे.