संगीतकला

गायन - हिंदुस्तानी संगीत

भावगीत

थाट आसावरी

नमस्कार संगीत-प्रेमी रसिकहो, नामवंत संगीत-तज्ञांनी आयोजित केलेल्या मार्गदर्शनपर संगीत-शिबिरात आपली परत एकदा भेट होते आहे. ह्या वेळेला आपल्याला आसावरी थाट आणि त्यावर आधारीत राग ह्यांची माहिती करुन घ्यायची आहे. चला तर बघू या, संगीतक्षेत्रातील कुठल्या दिग्गजांच्या भेटीचा, आपला योग आहे ते?

अरे, इथे समोर ह्या डेरेदार आम्र-वृक्षाखाली काही मंडळीचा गप्पांचा फड जमलेला दिसतो आहे. जरा जवळ जाऊन बघू या का ? अरे हे तर प. भीमसेनजी जोशी दिसताहेत. हा तर अलभ्य लाभच म्हणायचा. त्यांचे नुसते नाव ऐकूनच आपली गानसमाधी लागली बुवा! चला तर, पंडितजींना भेटू या!

“नमस्कार, पंडितजी!”
“नमस्कार! सुस्वागतम! बसा.”

“आम्ही सर्व मराठीवर्ल्डची रसिक मंडळी आपल्या मार्गदर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून ह्या शिबिरात आलो आहोत. थाट आसावरी आणि त्यावरील आधारीत राग हयांविषयी आम्हाला काही माहिती द्याल का?”

“जरुर सांगेन. करु या का सुरुवात?”

“हो, हो.” – मराठीवर्ल्डची मंडळी सरसावून बसतात.

“मंडळी, राग आसावरीला ‘आसावरी’ हे नाव ‘सौवरी’ हया एका प्रदेशाच्या नावावरुन पडले असावे असे म्हणतात. हा भूभाग सुमारे १५०० वर्षांपूर्वी, दक्षिण सिंध व कच्छची भूमी हयांच्या सान्निध्यात अस्तित्वात होता. हया प्रदेशाची संस्कृती प्राचीन भारतीय संस्कृतीला खूपच जवळची होती.

आसावरी हे मूळ रागाचे नाव आहे, परंतु पं. विष्णू नारायण भातखंडे हयांनी ‘आसावरी’ हे थाटवाचक नाव म्हणून पुढे आणले “.

” पंडितजी, ‘आसावरी’ हे एका स्त्रीचे नाव आहे. त्या नावाचा ह्या थाट किंवा रागाशी काही संबंध आहे का? ”

अशी काही आख्यायिका जरी नसली, तरी ह्या थाटातील जे राग आहेत त्यांच्या सुरावटींवर रंगविलेली काही कल्पना चित्रे मात्र जरुर आहेत. पूर्वीचे संगीतकार शिष्यांना संगीत शिकविताना एखाद्या रागाची संकल्पना व स्वरुप अधिक स्पष्ट करण्यासाठी त्या रागाचे सूर ऐकल्यावर त्यातून भासमान होणारी किंवा ‘व्हिजुअलाईज’ होणारी एखादी कथा किंवा कथासूत्र सांगत अशी कल्पनाचित्रे जर डोळयासमोर ठेवून ह्या रागाचा रियाझ केला तर त्या रागातील भाव आपल्या गायनात उमटण्यास खूपच मदत होते असे ते मानीत. जसे पहा-

थाट आसावरीपासून निर्माण झालेल्या राग आसावरी, राग जौनपूरी, राग दरबारी कानडा, राग अडाणा, व राग गंधारी ह्यावर आधारीत एक कथा-सूत्र आहे. सुरांतून जाणवणारी कल्पनाचित्रे अशी-

राग आसावरी चे सूर – प्रेयसी, म्हणजे आसावरी, साजश्रृंगार करुन अगदी आतुरतेने आपल्या प्रियकराला भेटायला जाते परंतु काही कारणावरुन प्रियकर तिची निर्भत्सना करुन तिला परत पाठवितो. त्यामुळे आसावरी खिन्न व उदास होऊन माघारी फिरते.

राग आसावरी चे सूर राग जौनपूरीचे सूर – निराश झालेल्या आसावरीच्या मनात आपल्या प्रियकराला भेटण्याची आस परत एकदा जागृत होते. ती परत एकदा श्रृंगार करण्यास सज्ज होते. परंतु प्रियकराला भेटण्याची असीम इच्छा आणि तो परत आपल्याला नाकारेल ही भीती ह्या भावनांचा ऊन-पावसाचा खेळ तिच्या मनात चालू राहतो.

राग दरबारी कानडा – चंद्रोदय झाल्यावर प्रियकराच्या मनात आपल्या प्रेयसीला भेटण्याची तीव्र इच्छा जागृत होते. तो प्रेयसीकडे जाऊन तिची परत चलण्यासाठी मनधरणी करतो. परंतु प्रेयसी त्याला नकार देते.

राग अडाणा – प्रेयसीने आपल्या बरोबर चलावे म्हणून उदासीन झालेला प्रियकर तिच्यावर काहिशी बळजबरी करु बघतो परंतु प्रेयसी त्याला झिडकारुन तिच्या सख्यांसमवेत ओढयावर पाणी भरायला निघून जाते.

राग गंधारी – प्रियकर आणि प्रेयसीमध्ये गैरसमजाचे वादळ शमून त्यांचे पुनर्मिलन होते.

“व्वा! कल्पनाच खूप रम्य आणि रोमँटीक आहेत!” – एक श्रोता.

“पंडितजी, हया रागांविषयी अजून काही सांगा ना! ”

“हो, आपण हयांतील काही रागांविषयी थोडक्यात माहिती घेऊ या. राग आसावरीपासूनच सुरुवात करू या. परंतु त्या आधी थाट आसावरी कसा आहे, ते बघा.”

त्याचे स्वर – सा, शु.रे., को.गं., शु.म., प, को.ध, को.नि असे आहेत आणि त्यावर आधारीत राग ‘आसावरी’ असा –

आरोह- सा, शु.रे, शु.म., प, को.ध., सा!
अवरोह- सां!, को.नि., को.ध, प, शु.म, को.ग, शु.रे, सा.
वादी स्वर- को.ध. संवादी स्वर- को.ग.

राग आसावरीतून जे भाव व्यक्त होतात, त्यांचे अगदी समर्पक वर्णन करणा-या दोन ओळी मला आठवताहेत. बघा किती सुंदर लिहिलेल्या आहेत-

लाविलेल्या प्राणज्योती, आज मी नयनावरी,
छेडीती तारा मनाच्या, विरहिणी आसावरी.

राग ‘दरबारी कानडा’ हा आसावरी थाटापासून निर्माण झालेला एक सुप्रसिध्द, प्रचलीत व मनमोहक राग. अनेक चित्रपट गीते, नाटयगीते हया रागात स्वरबध्द करण्यात आली आहेत.

‘मृगनयना रसिक मोहीनी’ हया नाटयगीतातील, प्रेयसीच्या सौंदर्याचे वर्णन, राग दरबारी कानडाच्या सुरांनी अधिकच खुलविले आहे. तसेच, ‘रजनीनाथ हा, नभी उगवला’ हे नाटयगीत सुध्दा राग दरबारी कानडाच्या सुरातच स्वरबध्द झाले आहे.

“पंडितजी, हया नाटयगीतावरुन एक गंमत आठवली. माझा एक मित्र खूप खटयाळ होता. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला, संध्याकाळी उपवास सोडण्याआधी, तो घरी बायकोला, उगवलेल्या चंद्राकडे बोट दाखवून, हे नाटयगीत म्हणून दाखवायचा. ह्याचे कारण असे की चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडायचा नाही असा त्याच्या बायकोचा आग्रह असायचा आणि ते त्याला फारसे रुचत नसे ”

नाटयगीतातील पहिल्या ओळीला जोडून तो, “भूक लागली, वाढ तू मजला’ अशी पुस्तीही जोडायचा”.

सर्व उपस्थितामधे खसखस पिकते.

“ह्याशिवाय, ‘झनक झनक, तोरी बाजे पायलिया’ हे मन्नाडे ह्यानी गायलेले ‘मेरे हुजूर’ चित्रपटातील श्रृंगार रसात चिंब भिजविणारे गीत आपण ऐकले असेलच. ही किमया राग दरबारी कानडाच्या सुरांनीच केली आहे. तसेच, ‘बैजू-बावरा’ ह्या चित्रपटातील ‘ओ दुनियाके रखवाले’ हे परमेश्वराची आर्त आळवणी करणा-या गीतातील दर्द सुध्दा राग दरबारी कानडाच्या सुरांनीच जागविला आहे. ‘तोरा मन दर्पन कहलाए’ ह्या आशाजींनी गायिलेल्या ‘नीलकमल’ चित्रपटातील भक्तीरसप्रधान गीताच्या चालीत याच रागाच्या सुरांची पखरण करण्यात आली आहे.

मंडळी, एका गोष्टीची आपण रसिकांनी नोंद घ्यावी; ती म्हणजे राग ‘दरबारी कानडा’ हा एकच राग आपल्याला निरनिराळया प्रकारचे रस व भाव व्यक्त करताना दिसतो आहे. जसे श्रृंगार-रस, भक्ती रस, विरह-भावना, इ. आणि हे फक्त ह्याच रागाच्या बाबतीत आहे असे नाही, तर शास्त्रीय संगीतातील जवळ-जवळ प्रत्येक रागात ही ताकद आहे आणि भारतीय शास्त्रीय संगीताचे हेच खरे शक्तीस्थान आहे.

“पंडितजी, राग जौनपुरी आणि राग अडाणा विषयीही काही सांगा ना!”

‘हो. राग जौनपुरी हा शास्त्रीय संगीत सादर करणा-या गायकांचा आवडता राग! आकाशवाणीवरील गाण्याच्या कार्यक्रमातून सकाळच्या वेळेस हमखास हा राग तुम्हाला ऐकावयास मिळेल. परंतु असे असले तरी राग जौनपुरीत स्वरबध्द झालेली नाटयगीते किंवा चित्रगीते बघावयास मिळत नाहीत. नाही म्हणायला ‘कुहू कुहू बोले कोयलिया’ ह्या रागमालेत स्वरबध्द झालेल्या चित्रपटगीतातील, ‘चंद्रिका देख छाई’ ह्या कडव्याची चाल राग जौनपुरीत बांधण्यात आली आहे.

राग ‘अडाणा’ हा आसावरी थाटातील तसा काहीसा अनवटच राग. क्वचित प्रसंगी एखाद्या मैफिलीतून तो गायला गेलेला तुम्हाला आढळेल. संगीत ‘एकच प्याला’ मधील ‘झणी दे कर या दीना’ हे नाटयगीत राग अडाणा मध्ये स्वरबध्द करण्यात आले आहे.

‘पंडितजी, राग ‘सिंधू भैरवी’ हा थाट आसावरीतून जन्मला आहे असे ऐकले आहे, ते खरे ना! श्रोत्यांची पृच्छा.

“अगदी खरे. तसे पाहिले तर ‘भैरवी’ रागाचे सगळे प्रकार हे ‘भैरवी’ थाटातूनच निर्माण झाले आहेत, परंतु ‘सिंधु-भैरवी’ हा ‘भैरवी’ रागाचा असा एकमेव प्रकार आहे की ज्याचा जन्म ‘भैरवी’ हुन भिन्न अश्या थाटातून झाला आहे. विशेषत: ठुमरी गायनासाठी ह्या रागाचा हमखास वापर केला जातो. मोहमद रफी व सुमन कल्याणपूर ह्यांनी गायलेले ‘अजहू न आये बालमा, सावन बीता जाए’ ह्या चित्रपटगीतातील विरहवेदना राग ‘सिंधु-भैरवी’ चे स्वरच आपल्यापर्यंत पोहचवतात.”

पंडितजींनी संगीत सागरातील काही सुंदर शिंपल्यांतील मोत्यांचे मनोहारी दर्शन आम्हाला घडविले होते. त्यामुळे मराठीवर्ल्डचे श्रोते ख-या अर्थाने धनवान झाले होते. पंडितजींचे मन:पूर्वक आभार मानून आम्ही त्यांचा निरोप घेतला. मंडळी, आता आपण एक ब्रेक घेऊ या ना. पुढील भागात आपण आणखी एका नवीन थाटाची माहिती करुन घेऊ या!

– जयंत खानझोडे