संगीतकला

गायन - हिंदुस्तानी संगीत

भावगीत

थाट व राग भाग २

मागील भागात आपण स्वर म्हणजे काय ते पाहिले.- ‘ज्या ध्वनीत माधुर्य आहे, आणि जो ध्वनी भाव व्यक्त करू शकतो तो ध्वनी म्हणजे ‘स्वर” अशी स्वराची व्याख्या पाहिली. शुध्द, कोमल आणि तीव्र असे स्वरांचे प्रकार लक्षात घेतले. नेहमी शुध्द स्वरूपात राहणा-या षडज् व पंचम स्वरांची जातकुळी पाहिली. सप्तकाबद्दलही माहिती घेतली. आता आपण थाट व राग या विषयांकडे वळूया.

थाट व राग – थाट हा रागाचा जनक आहे, म्हणजे, थाटपासून रागाची निर्मिती होते. थाट हा रागाचा ‘पिता’ आहे, असे म्हटले तरी चालेल. थाट हा अनुक्रमे येणा-या सात स्वरांचाच असतो. आणि त्यात सात स्वरांपैकी प्रत्येक स्वर फक्त एकदाच येऊ शकतो. मग तो शुध्द, कोमल किंवा तीव्र ह्यापैकी कुठल्याही स्वरूपात असो.

जसे कल्याण थाट – सा, रे, ग, ती.म, प, ध, नि……. एकूण सात स्वर
काफी थाट – सा, रे, को.ग, म, प, ध, को.नि…… एकूण सात स्वर

थाटातील काही निवडक स्वर घेऊन आपण रंगतदार राग निर्माण करू शकते, परंतु खुद्द थाट हा रंगतदार असेलच असे नाही. थाट हा स्वरांचा फक्त एक सांगाडा आहे व तो गेय नाही, म्हणजे तो गाता येणार नाही. त्यातून एकापेक्षा अधिक रंजक रागांची निर्मिती केली जाऊ शकते, आणि ते सर्वस्वी कलाकाराच्या टॅलेंट वर अवलंबून आहे. हिंदुस्थानी संगीतात दहा थाट आहेत-ते असे, भैरव, तोडी, भैरवी, बिलावल, आसावरी, काफी, कल्याण, पूर्वी, मारवा, खमाज. घरी पेटी असल्यास वर दिलेला थाटाचा स्वर-समूह त्यावर वाजवून पहा. बघा, तुम्हाला रंजक वाटतो का ते? कदाचित वाटणार नाही! आता ‘थाटाचे अपत्य’ म्हणजेच राग ह्याविषयी जाणून घेऊन या!

राग- रागाची शास्त्रीय व्याख्याच करायची असल्यास, ‘थाटातील निवडक स्वर घेऊन निर्माण केलेला ‘रंजक’ किंवा ‘कलात्मक’ स्वर समुदाय’ अशी करता येईल. रागात कलात्मक सुसंगती व रंजकता असावीच लागते. (नाहीतर श्रोत्यांना ‘राग’ येतो!) राग हा एक विशिष्ट भाव व्यक्त करणारा असून, तो गायनाच्या किंवा वादनाच्या कला-रूपात सादर करता येऊ शकतो. राग व थाटातील ह्यांचा आपापसातील संबंध अधिक स्पष्ट होण्यासाठी व्यवहारातीलच एक उदाहरण बघू या! समजा, आपण एखाद्या पंक्तीचा थाट महाराष्ट्रीयन असावा अशी ऑर्डर दिली तर, त्याबरोबर नेमके कुठले पदार्थ ‘मेनू’त हवे आहेत, हे सुध्दा सांगावे लागेल; नुसता थाट सांगून चालणार नाही. कारण महाराष्ट्रीयन थाटात पुरणपोळी, श्रीखंड-पुरी, आमरस-पुरी, नागपुरी वडा-भात, कढी, दाळभाजी, चटण्या कोशिंबीरी ह्या सगळयांचा समावेश होतो. पण आपण ह्या सगळया पदार्थाचीच एकदम ऑर्डर न देता, प्रसंगाला म्हणजे, प्रमोशन-पार्टी, वाढदिवस, इ. ना साजेश्या, काही निवडक पदार्थाचीच ऑर्डर देऊन एक चांगला ‘कोर्स’ कसा तयार होईल हेच बघणार की नाही? जणू काही आपण एखाद्या थाटातील काही स्वर निवडून एका विशिष्ट मूडला साजेसा राग तयार करतो आहोत. (पंक्तीचा ‘थाट’ बिघडला, तर सासरच्या मंडळींना ‘राग’ येतो तो वेगळा!)

रागाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, रागाच्या सादरीकरणासाठी, रागाच्या प्रकृतीला अनुरूप अशा वेळेचे व ऋतुचे बंधन आहे. त्यामुळे तो जास्त परिणामकारक होतो. (पण मनुष्य-प्राण्याला मात्र ‘राग’ येण्यासाठी वेळेचे बंधन मुळीच नसते, तरीसुध्दा आलेला ‘राग’ कधी-कधी खूपच परिणामकारक ठरतो!) जसे राग मियॉ-मल्हार हा वर्षाऋतुमध्ये गायला जावा असा प्रघात आहे, किंवा भैरव राग हा प्रात:समयीचा राग आहे. रागाचा आणखी एक गुणधर्म असा की, रागात ‘आरोह’, म्हणजे स्वरांचा चढता क्रम, आणि ‘अवरोह’, म्हणजे स्वरांचा उतरता क्रम असतो. त्यामुळे आकृतीबंध स्पष्ट होतो.

तसेच रागाला एक ‘वादी’ स्वर आणि एक ‘संवादी’ स्वरही असतो. ‘वादी’ स्वर हा रागाचा मुख्य स्वर असून, रागाचे स्वरूप प्रकट करण्यासाठी, गाताना त्याचा वारंवार उपयोग केला जातो. ‘संवादी’ हा रागाचा उपमुख्य स्वर आहे. ‘वादी’ व ‘संवादी’ हे त्या रागाचे ‘सचिन’ व ‘सौरभ’ असतात असे म्हटले तरी चालेल!

आता, कल्याण थाटातून निर्माण झालेला राग ‘यमन’ बघा. त्याचे थोडक्यात वर्णन खाली दिले आहे.

आरोह-सा, रे, ग, ती.म, प, ध, नि, सा……
अवरोह- सा, नि, ध, प, ती.म, ग, रे, सा
वादी स्वर-गंधार,
संवादी स्वर…..निषाद,
गान-समय…… रात्रीचा पहिला प्रहर.

ह्या रागात ‘कल्याण’ थाटातील सर्वच स्वरांचा उपयोग केला आहे, आणि आरोह व अवरोह, हे दोन्ही सात स्वरांचे आहेत, हे आपल्या लक्षात येईल. हा राग शृंगार-रस प्रधान आहे.

‘कल्याण’ थाटातून निर्माण झालेला आणखी एक राग म्हणजे ‘भूप’. त्याचे स्वरूप असे-

आरोह–सा, रे, ग, प, ध, सा……. अवरोह–सा, ध, प, ग, रे, सा……

वादी स्वर-गंधार, संवादी स्वर-धैवत, गान-समय….. संध्या-समय. येथे ‘कल्याण’ थाटातीलच ‘मध्यम’ व ‘निषाद’ हे स्वर वगळता सर्व स्वर आले आहेत. आरोह व अवरोह, ह्या दोन्हीमध्ये फक्त पाचच स्वर आहेत. हा राग भक्ति-रस प्रधान आहे. ह्यावरून आपणांस, एकाच थाटातून वेगवेगळी अभिव्यक्ति असलेले भिन्न राग कसे निर्माण होऊ शकतात, ह्याची थोडीशी कल्पना येईल. आता पेटीवर वरील रागांचे स्वर-समूह, आरोह-अवरोहासहीत वाजवून पहा; ते नक्कीच रंजक वाटतील!

थाट व रागाचे हे पुराण आता इथेच थांबवितो! नाहीतर तुम्हाला ‘राग’ येऊन तुम्ही म्हणाल ‘वेळेचे बंधन नसलेला हा कुठला राग?’ पुढील लेखात आपण निरनिराळे थाट, त्यातुन निर्माण झालेले प्रचलीत राग, आणि ह्या रागांवर आधारित प्रसिध्द गाणी ह्यांची सविस्तर माहीती घेऊ या!

– जयंत खानझोडे