संगीतकला

गायन - हिंदुस्तानी संगीत

भावगीत

राजहंस माझा निजला

मराठी भावगीतांचा कालखंड साधारणपणे १९२५-१९७० हा आहे. त्यामध्ये १९४०-६० हा सुवर्णकाळ मानला जातो. श्री. गजाननराव वाटवे व लता मंगेशकर अशी दोन नावे चटकन आठवतात. ह्यांच्यामध्ये सुमारे ३०० स्त्री-पुरुष भावगीत गायक-गायिकांची यादी आहे. मराठी भावगीतांचा इतिहास अजून लिहिला जायचा आहे. तो लिहावा असा इथे हेतु नाही, पण त्या दिशेने टाकलेले छोटेसे पाऊल असे ह्या लेखमालेचे स्वरुप असणार आहे. भावगीत गायक/गायिकेची थोडक्यात माहिती, कामगिरीचा आढावा, एखाद्या गाण्याचे शब्द, त्यावेळची राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी मांडावी असा विचार आहे. जी गीते ध्वनिमुद्रित झाली त्यातली फारच थोडी आजही ऐकायला मिळतात, त्यांची गोडी अवीटच आहे.

एका अंदाजाप्रमाणे सुमारे २००० भावगीते तरी लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यातली काही ध्वनिमुद्रिकांवरती व आता ध्वनिफीती, सीडी वर ऐकायला मिळतात. आपल्या ‘मनात’ व ‘गळ्यात’ किती गाणी आहेत बरे? ‘साहित्य प्रसार केन्द्र, मुंबई’ ह्या प्रकाशनाने १९९० च्या सुमारास ‘गाणी गळ्यातली, गाणी मनातली’ चे ११ भाग प्रसिद्ध केले व गानरसिकांसाठी ११०० गाणी शब्दांसह सादर केली. त्याच्याही अगोदर १९६०-७० च्या दशकात मुंबई-पुण्यातील काही खाजगी प्रकाशकांनी ‘गोड गोड भावगीते’ चे अनेक भाग बाजारात आणले. एकेका गायक/गायिकेची सगळी लोकप्रिय गाणी पण पुस्तक रुपाने गानलुब्धांना मिळू लागली.

गंमत म्हणजे, पहिले भावगीत रंगभूमीवरील विख्यात अभिनेत्याच्या आवाजात मुद्रित झाले. गायक होते श्री. व्यंकटेश बळवंत पेंढारकार तथा बापूराव पेंढारकार (१८९२-१९३७) व गीतकार होते ‘गोविंदाग्रज’ म्हणजेच सुप्रसिद्ध नाटककार श्री. राम गणेश गडकरी (१८८५-१९१९). गीताचे बोल होते – ‘हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला’. त्यांच्या ‘वाग्वैजयंती’ ह्या काव्यसंग्रहात ही अठरा कडव्यांची कविता आहे व जुलै १९१२ मध्ये लिहिली आहे. बापूराव पेंढारकार हे ‘ललित कलादर्श कंपनी’ चे चालक, मालक, गायक, अभिनेते ! गडकरींचे ‘पुण्यप्रभाव’ हे एकच नाटक त्यांनी केले, पण त्यांच्या सहित्याचे ते चाहते होते. नाटकातल्या पदांमुळे ते ग्रामोफोन कंपनीचे अतियश लोकप्रिय कलाकार होते. १९२२ ते १९३६ पर्यन्त त्यांनी सुमारे १४० गाणी (म्हणजे ७० ध्वनिमुद्रिका) गायली. ध्वनिमुद्रिका खूप खपल्या.

गडकरी ह्यांच्या १९२६ सालच्या पुण्यतिथीला (२३ जानेवारीला), बापूराव मुंबईच्या फोर्टात ग्रामोफोन कंपनीचे स्टुडियोत गेले व ही कविता ध्वनिमुद्रित करुन आले, अशी आठवण त्यांचे सुपुत्र विख्यात गायक/अभिनेते श्री. भालचंद्र पेंढारकार यांनी सांगितली. ते नाटकातले पद नसल्याने गीत म्हणूनच मुद्रित झाले. गीताला इंग्रजीत ‘Lyric’ असे म्हणतात. पिलु रागातले हे गीत एप्रिल १९२६ मध्ये वितरित झाले व त्याच्या खपामुळे १९३१ मध्ये पुन्हा ध्वनिमुद्रिका बनविण्यात आल्या. ध्वनिमुद्रिकेच्या लेबलवर पिलु (Lyric) असे छापलेले आहे. एकुण १८ पैकी चारच कडवी तीन मिनिटांत बापूराव गाऊ शकले. काहीश्या जलद गतीने गायिलेल्या गीताचा भाव व आशय मात्र नेमकेपणाने मांडलेला आहे. खाजगीत, रंगभूमीवर किंवा संगीत कार्यक्रमांत बापूराव हे पद कधीही म्हणत नसत असे श्री. भालचंद्र पेंढारकार म्हणाले. आज मराठीतलं हे पहिलं मुद्रित भावगीत ऐकायला मिळत नाही. HMV P 7366 क्रमांकाची काळ्या लेबलची लाखेची ध्वनिमुद्रिका संग्राहकांकडे पडून आहे.

ह्या कवितेचा परिचय करुन देताना गडकरी लिहितात :
” पतिनिधनानंतर अल्पावधीतच बापडीवर एकुलत्या एक मुलाचे निधन पाहण्याचा प्रसंग आल्यावर असा भ्रम होणार नाही का? ”
(चाल – उध्दवा शांतवन कर जा…..)

“राजहंस माझा निजला”

हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला
का असले भलते सलते, बोलता अमंगळ त्याला
छबकड्यावरुनि माझ्या या, ओवाळुनि टाकुनि सकलां
घेते मी पदराखाली, पाहुच नका लडिवाळा
मी गरिब कितिही असले, जरि कपाळ माझे फुटले,
बोलणे तरीहि असले, खपणार नाही हो मजला, राजहंस माझा निजला…………१

हे असेच सांगुनि मागे, नेलात जिवाचा राजा
दाखविलाही फिरुनि नाही, नाहीत कां तुम्हां लाजा?
न्यावयास आता आला, राजहंस माझा राजा
हा असा कसा दृष्टावा, कोणत्या जन्मीचा दावा?
कां उगिच गळा कापावा, पाहूनी गरिब कोणाला, राजहंस माझा निजला…………२

या अर्ध्या उघडया नयनीं, बाळ काय पाहत नाही?
या अर्ध्या उघडया तोंडी, बाळ काय बोलत नाही?
अर्थ या अश्या हसण्याचा, मज माझा कळतो बाई
हे हसे मुखावर नाचे, जणु बोल दुग्धपानाचे. की मुक्या समाधानाचे
इतूकेही कळे न कुणाला, राजहंस माझा निजला…………३

जरि काळाचाहि काळ, बाळाला न्याया आला
तरि नाही मी द्यायाची, या जीवाच्या जीवाला
सारखी गाऊनी गाणी, निजवीन कल्पवर याला
जा! करा आपुलें काळें! माझेही दमले डोळे!
प्राणांचे पसरुनी जाळे, मी निजते घेऊन याला! राजहंस माझा निजला……………४

– सुरेश चांदवणकर
मानद सचिव, ‘Society of Indian Record Collectors’
मुंबई