वादन

पारंपारिक वाद्य

शास्त्रीय गायक

घांगळी

संगीत हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. संगीत निर्माण करते ते वाद्य. संगीत वाद्यांचे ४ प्रकार आहेत. त्यात घनवाद्ये, तंतुवाद्ये, चर्मवाद्ये, सुषिर वाद्ये. आजच्या धकाधकीच्या जीवनात जुनी वाद्ये आणि संगीत यापेक्षा डी. जे., धांगडधिंगा संगीतच लोकांना आवडते आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये नवीन वाद्ये विकसित केली जात आहेत. तसेच प्रचलित वाद्यांमध्ये आवश्यक बदल होऊ लागले आहेत. आपल्या वाद्यसंस्कृतीमध्ये परंपरागत चालत आलेली अनेक वाद्ये आहेत. संस्कृतीचा महत्त्वाचा घटक म्हणून त्यांचा अभ्यास केला जायचा. मात्र, आज अशी अनेक वाद्ये काळाच्या पडद्याआड लुप्त होऊ लागली आहेत. आधुनिक काळाची गरज पाहता नाविण्यपूर्ण आणि बहुउपयोगी वाद्यांना प्रचंड मागणी असल्याचे जाणवते. आज परंपरागत किंवा प्राचीन वाद्यांचे अस्तित्व केवळ संस्कृतीकोश आणि वस्तुसंग्रहालये इत्यादी ठिकाणीच राहिल्याचे पाहायला मिळते. या लुप्त वाद्यांचा इतिहास आपल्याला माहित व्हावा यासाठी हा एक प्रयत्न –

घांगळी हे वारली समाजाचे पारंपरिक वाद्य आहे. हे वाद्य दिसायला रुद्रवीणेसारखे दिसते. वारली समाजात ज्याप्रमाणे नृत्याला महत्त्वाचे स्थान आहे त्याप्रमाणेच यावेळी वाजविले जाणारे घांगळी ह्या वाद्याचे महत्त्वही तेवढेच आहे. दिवाळी, शिमगा यांसारखे सण लग्नसमारंभात तसेच प्रार्थना करताना वारली स्त्री-पुरुष शरीर शृंगारुन निरनिराळी लोकनृत्ये करतात. त्यावेळी हे घांगळी वाद्य प्रामुख्याने वाजविले जाते. आपल्याला घांगळी हे वाद्य भू-मातेने दिले आहे, अशी वारली लोकांची श्रध्दा होती. हे वाद्य वाजविणार्‍यांना घांगळी भगत असे म्हणत. ह्या वाद्याला डाव्या हाताने छातीपाशी घट्ट धरुन उजव्या हाताने तारांना छेडून भगत वाजवितो तेव्हा त्याला इतर दोन भगत साथ देतात.

हे वाद्य सहजासहजी कोणीही वाजवू शकत नाही त्यासाठी खास प्रशिक्षण घ्यावे लागते. अनुभवी भगत ही विद्या तरुण मुलांना शिकवितात. हे शिक्षण पावसाळ्याच्या प्रारंभीचा काळात सुरू होऊन ते दिवाळीपर्यंत पूर्ण होते. या काळात शिकाऊ भगतांना काही व्रते कडकपणे पाळावी लागतात. जो भगत ही व्रते व्यवस्थित आचरणात आणणार नाही, त्यास शिक्षा केली जात असे. तरीही त्याच्यात सुधारणा झाली नाही तर त्याला शिक्षण देणे बंद केले जाते. भू-मातेने दिलेले हे वाद्य वाजविण्याची कला अवगत करण्यासाठी प्रचंड तपश्चर्येचीच आवश्यकता असते. असे यावरून समजते.

सध्या हे वाद्य कुठेही वापरले जात नाही. ते केवळ खेड्यातील वारली समाजातील सण, समारंभ यावेळीच दर्शनी पडते. घांगळी वाद्य बनविण्याचे कौशल्य मोजक्या लोकांनाच प्राप्त होत असे. त्यामुळे समाजात त्यांना भगतांइतकेच स्थान असे. बहुतेक भगत स्वत:च हे वाद्य बनवित. हे वाद्य बनविण्यासाठी दोन सुकलेल्या भोपळ्यांचा वापर केलेला असतो. दोन्ही भोपळ्यांना जोडण्यासाठी उत्तम प्रतीच्या बांबूंचा उपयोग केला जातो. नाद निर्माण करण्यासाठी या बांबूवर तारा बसविलेल्या असतात. या तारा छेडून जो नाद निर्माण होतो त्याच्या तालावर घांगळी भगत भू-मातेची प्रार्थना करणारे गाणे म्हणतो. त्याला पालघर असे म्हणतात. या गाण्याबरोबर भगत कथाही सांगतो. हे वाद्य वाजविण्यासाठी मोरपिसे, काचेच्या रंगीत बांगड्या, आरसा किंवा बोटांचा वापर केला जातो. घांगळी हा तंतुवाद्याचा आद्य प्रकार आहे.

एकतारी

ektaari कहे समय का एकतारा
कहे समय का एकतारा अक्षर-अक्षर दीप चले या सर्व शिक्षा अभियानाच्या गीतामधील एकतारा म्हणजे मराठीतली आपली एकतारी होय. कीर्तनातील एक अविभाज्य अंग म्हणून एकतारीचा वापर संत आणि फकीर करीत असत. वारक-यांचे वर्णन करायचे तर कपाळी बुक्का किंवा चंदनाचा टिळा, हातात झांजा किंवा एकतारी, गळयात तुळशीच्या माळा, मुखी विठ्ठलाचे नाम, ज्ञानेश्वरांच्या ओव्या किंवा तुकारामांचे अभंग असेच करता येईल.

एकतारी हे तंतुवाद्य प्रकारातील वाद्य आहे. त्याचा उपयोग हा भजन आणि सुगम संगीतात केला जातो. यात एकच तार लावून काडीच्या वरील बाजूस कसून बांधतात. ज्यातूनच वाजवून स्वर निर्माण करता येतात. याला वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे नाव आहे जसे पंजाबमध्ये इकतारा, उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगाल मध्ये एकतारा आणि महाराष्ट्रात एकतारी. एकेकाळी ह्याच्या स्वराने वारक-यांच्या मनावर अधिराज्य गाजविले पण आत्ताच्या रेडीमेड संगीत जमान्यात ही एकतारी नामशेष होत चालली आहे. ती आता केवळ वासुदेव, वारकरी, संत (पण जुन्या विचारांचे) यांकडेच पाहायला मिळते नाहीतर एखाद्या संगीत वस्तू संग्रहालयात.

असो, ही एकतारी हाती घेऊनच संत गाडगेबाबांनी समाजाला तन-मन स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. हीच एकतारी जेव्हा संत तुकारामांच्या हाती आली तेव्हा त्यांनी विठू भक्तीने अभंगवाणीची निर्मिती करुन जनजागृती केली. पंजाबी संतांनीही एकतारीचा उपयोग समाज जागृतीसाठी केला. ते “इकतारा बोले” म्हणत आणि पुढे आपल्याला द्यायचा संदेश देत असत. सत्तयुगात संत मीराबाईं कृष्णाची आळवणी केली ती एकतारी घेऊनच !

एकतारी भोपळ्याच्या खवक्यापासून किंवा लाकडापासून किंवा नारळाच्या वाटी पासून बनवतात. त्यानुसार त्याला नावही दिले जाते. हा खालचा भाग ३ फुटापर्यंत लांब बांबूच्या काडीशी जोडला जातो. त्यावर एकच तार गुंडाळून वाटीच्या विरुद्ध बाजूस घट्ट बांधले जाते. यातूनच एकतारीची निर्मिती होते. वादक आपल्या डाव्या हातात घेऊन वाजवितात. लोप पावत चाललेली ही एकतारी अजूनही काही प्रमाणात पाहायला आणि ऐकायला मिळते ते कीर्तनाच्या आणि सुगम संगीताच्या कार्यक्रमात.

सतार

sitar ‘सतार’हे तंबोरा या वाद्याशी मिळते-जुळते असणारे वाद्य होय. हे वाद्य भारतात फार पूर्वीपासून वापरले जाते. हे वाद्य अनेक नावांनी ओळखले जाते. देवदेवतांची वाद्ये वीणा, ब्रह्मवीणा, सरस्वती वीणा, किन्नरी या वाद्यांतून ‘सतार’ या वाद्याची निर्मिती झाली असल्याची नोंद आहे. तसेच काहींच्या मते, वीणा या वाद्याचे विकसित रूप म्हणजे ‘सतार’ होय.

‘सतार’ या वाद्याचे तूंबा व दांडी हे दोन प्रमुख भाग आहेत. त्यातील तूंबा किंवा भोपळा हा आकाराने गोल असतो. भोपळ्याच्या गोल भागावरील चपट्या भागावर लाकडाचे आच्छादन देतात, त्याला तबली म्हणतात. सतारीचा दुसरा भाग दांडी हा आहे. त्याचा आकार लांबट व चपटा असतो. दांडी ही भोपळ्याला जोडतात दुस-या टोकाला तारा गुंडाळण्यासाठी खुंट्या असतात, त्या खुंट्यापासून तारगहनापर्यंत सात तारा बांधलेल्या असतात. सतारीला जे पडदे असतात, ते त्या वाद्याची स्वरस्थाने आहेत. दांडीच्या मेरुपासून जोडापर्यंत पितळी कांड्यासारखे विशिष्ट अंतरावर १४ अथवा १६ पडदे असतात. त्यांची रचना स्वरांप्रमाणे केलेली असते.

‘सतार’ हे वाद्य वाजवताना विशिष्ट प्रकारची पोलादी तारेची अंगठी वापरायची असते, तिला मिजराब असे म्हणतात. ही अंगठी उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटात घालून सतारीच्या तारा छेडल्या जातात व डाव्या हाताच्या बोटांनी पडद्यावर तारा टेकून किंवा दाबून सतार वाजवितात. ‘सतार’ हे वाद्य वाजविताना दोन्ही हातांची बोटे या वाद्यावर कौशल्यपूर्ण रीतीने चालविल्यास त्याचे स्वर खूप सुमधुर असे उमटतात. ‘सतार’ या वाद्याच्या तारेवर पोलादी अंगठीने छेडले असता. जो आवाज निघतो, त्याला बोल म्हणतात. हे वाद्य शिकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पं. रवीशंकर हे प्रसिध्द सतार वादक आहेत. त्यांनी या वाद्याला जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवून दिलेली आहे.