वारली चित्रकला

Varli Chitrakala ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासींची चित्रकला ही त्यांच्या आयुष्याचं एक अविभाज्य अंग आहे. एक सहजगत्या उमलणारी भावाभिव्यक्ति आहे. भोळया भाबडया आदिवासींच्या खडतर आयुष्यातला तो एक आनंदाचा क्षण आहे. त्यांचं वेगळं जग, रीतीरिवाज, सण, उत्सव, दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंग नकळत हळुवारपणे त्यांच्या कुडाच्या भिंतींवर साकार होत जातात. गावात एखादं लग्न ठरलं की पंचक्रोशीतले लहान मोठे पुरूष-स्त्री चित्रकार उत्स्फूर्त भावनेने जमा होतात. मोठया उत्साहानं सारी घरं रंगवून टाकतात. असं त्यांचं जगणं आहे. रानफुलासारखं, निखळ नि मोकळं. त्यांनी रंगवलेलं प्रत्येक चित्र हे त्यांच्या भाबडया मनावर उमटलेलं त्यांचं स्वत:चं जग आहे. ही सारी संवेदनाक्षम मनाची प्रतिक्षिप्त क्रिया आहे. शेणा-मातीनं सारवलेल्या कुडाच्या भिंतीवर तांदळाच्या पेजेनं रंगवण्याचा त्यांचा आनंद अगदी पूर्वापारचा आहे. त्यात त्यांचं नृत्य, लग्न, वरात आहे. नारळाची, ताडीची झाडं आहेत, शेतं आहेत आणि… मोहानं भरलेली माणसंही आहेत. एक विशिष्ट प्रकारची अमूर्तवादी चित्रं इथं आपल्याला आढळतात.

वारली चित्रकलेचा स्त्रोत

वारली चित्रकलेचा परिपोष वारली संस्कृती आणि परंपरा व त्यांच्या सभोवतालच्या परिसरातील निसर्ग संपत्तींचा आधार घेऊन झालेला आहे. त्यामुळे वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, देवदेवता, दैनंदिन जीवन, लोकजीवन व त्याबरोबर आजूबाजूचा परिसर, परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदीनाले, डोंगर, पहाड, वने, नाचनृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, परिसर, जत्रा इ. विषयाला धरून भिंतीचित्रे रेखाटलेली दिसतात.

वारली चित्रातील आकार व रेषा प्रमाणबध्द नसल्या तरी वारली चित्रकाराच्या निरिक्षणाची व कल्पनाशक्तिची दाद ही चित्रे बघत असताना द्यावी लागते. कलेचे कोणतेही शास्त्रशुध्द शिक्षण या लोकांनी घेतले नसताना इतकी अप्रतिम चित्रे त्यांना सुचतात कशी ? असा प्रश्न पाहणा-यांच्या मनात आल्यावाचून राहात नाही. साध्या साध्या रेषांच्या माध्यमातून संकेत व्यक्त केले जातात. त्यांच्या या चित्रकलेत रेषाकृतीला व त्यापासून होणा-या आकाराच्या गुंफणीला महत्त्व असते. ब-याच आकारांची परत परत पुनारावृत्ती होत असते. पण त्यातही वेगवेगळया सौंदर्याकृतींची जाणीव कलात्मक पातळीवर कलाकाराला मिळत असते.

Varli Chitrakala वारली चित्रकलेत कलाकार आकारांशी खेळत असतात. विविध आकारांपासून ही चित्रकला आपल्याला आकर्षित करत असते. रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात. चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते, तिला आपले शरीर जणू गुरूत्त्वाकर्षणासारखे नैसर्गिकपणे दाद देते. त्यांच्या चित्रातील झाडे पाहा. वारली चित्रकार ही झाडे रंगविताना नेहमीच मुळाकडून शेंडयापर्यंत रंगवितो. अगदी सहजपणे त्यातून झाड व उगविण्याची भावना प्रकट होते. तशा आकारालाही सोपेपणा प्राप्त होतो. शहरी चित्रकार झाड काढताना त्याच्या नेमके उलट म्हणजे, वरून खाली रेषा काढतात. वारल्यांच्या मते खाली भूमीकडून वर उगवणारे झाड म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते.

वारली चित्र रेखाटन

Varli Chitrakala वारली चित्र रेखाटणीचे विशेष म्हणजे चित्र काढताना चित्रकार सुरुवातीला चित्र किती मोठे काढावयाचे ते प्रथम निश्चित करतो आणि त्या अनुरोधाने बाहेरील नक्षीकाम व मध्यवर्ती चित्राभोवतालच्या आकृत्या व नक्षी क्रमाक्रमाने काढत जातो. मनुष्य अगर प्राणी काढण्यासाठी सुरवातीस त्रिकोण काढून त्याला शरीर किंवा धड समजून हातपाय, डोके, शेपूट हे अवयव जोडले जातात. ही कलाकृती प्रथम रेषाकृतीने तयार केली जाते. वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्रे काढत असतात. चंद्राच्या गरगरीत वाटोळया आकारातून त्याने गोल घेतला. पानाच्या आकारातून त्याने गोल, त्रिकोण, अंडाकृती आकार घेतले. पाकळया आणि फांद्यांच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली. चंद्रकला व इंद्रधनुष्य यात त्याने कमानी व अर्धवर्तुळ पाहिले. आणि पक्ष्यांच्या भरा-या व माश्यांच्या पोहण्याच्या निरिक्षणाने समांतर व उभे आडवे रेषांचे आकार तो शिकला. जवळजवळ असलेले पाच तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला.

Varli Chitrakala अनेक आश्चर्यकारक आकार व रेषांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्राकृती प्रकट करण्याची त्याची ही सांकेतिकता विचार करण्यासारखी आहे.

जीवनातल्या घडामोडींचे त्यांच्या कलेत पडणारे प्रतिबिंब, अशिक्षित असूनही भिंतीचित्रणाच्या रेखाटनांमधल्या रेषेतला जोमदारपणा, थोडी बेढब असली तरीही असलेला हुकमी आगळेपणा आणि स्वतंत्रपणा या सगळया गोष्टी पाहून या कलावंतांच्या कलेच्या उंचीचा आपले मन वेध घेऊ लागते.

वारली चित्रकलेत रेखाटनांमध्ये प्रमाणबध्दता जरी नसली तरी त्या रेखाटनांमध्ये असलेला प्रवाहीपणा, मुक्तपणा आणि जोरकसपणा क्षणाक्षणाला जाणवतो.

सौजन्य – विवेकानंद चित्रकला महाविद्यालय, कराड