संगीतकला

गायन - हिंदुस्तानी संगीत

भावगीत

थाट मारवा

आजची संध्याकाळ ख-या अर्थाने अविस्मरणीय होती. निमित्त होते मराठीवर्ल्डच्या श्रोत्यांना संगीत-शिबिराच्या पुढील टप्प्यात थाट मारवा व त्यावर आधारीत रागांची माहिती करुन देण्याचे. म्हणून आम्ही सगळे संध्याकाळी शिबिरात फेरफटका मारायला बाहेर पडलो. आणि योगयोग बघा; राग मारव्याच्या गायनासाठी अगदी योग्य अशी वातावरणनिर्मिती निसर्गाने अगोदरच करुन ठेवली होती. म्हणजे संध्याकाळची अगदी कातर म्हणतात तशी वेळ, संध्याछायांचे अस्तित्त्वं ठायी-ठायी जाणवू लागलेले, सकाळी रम्य भासणारा नदीकाठ व काठावरील झाडे आता अगदी स्तब्ध, अधून मधून ऐकू येणारा एखाद्याच पक्ष्याचा चिवचिवाट, दूर नदीकाठावरचा एकला औदुंबर जळावर झुकून, आपल्याशिवाय आणखीही कोणाचे बिंब जळात दिसते आहे का, ह्याचा जणू फिरुन एकदा व्यर्थच असा शोध घेतो आहे, दूर नदीकिनारी एक मानवी आकृती अगदी एकटी, पाठमोरी बसून नदीच्या पात्राकडे एकटक बघते आहे, नदीचे पात्र अगदी संथ, शांत. हा तर निसर्गाने जिवंत केलेला चित्रमय मारवाच! मारव्याच्या अभ्यासासाठी अगदी ‘परफेक्ट माहौल’! आणि त्यात आम्हाला कोणाचा शामियाना दिसावा, तर दस्तुरखुद्द पं. हृदयनाथ मंगेशकर ह्यांचा! मग काय आम्ही निसर्गाचे, आणि आमच्या नशिबाचे मनापासून आभार मानले आणि शामियान्यात प्रवेश करते झालो.

पंडितजींना अभिवादन करुन आम्ही बैठकीवर बसलो. सुरुवातीचे औपचारिक बोलणे झाल्यावर आमच्या संगीत संवादाला सुरवात झाली. ‘पंडीतजी, आम्ही मराठी-वर्ल्डचे रसिक, थाट मारवा व त्यावर आधारीत रागांचा परिचय करुन घेण्यासाठी आपल्या शिबिरात आलो आहोत आणि त्याकरीता आपण आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी आपणास विनंती करतो’ आम्ही म्हणालो.

” रसिकहो, तुम्ही ख-या अर्थाने अगदी योग्य वेळेला आला आहात ” पंडितजी उठून खिडकीजवळ गेले आणि बाहेरच्या निसर्गाकडे बोट दाखवून म्हणाले, “मंडळी, बाहेर जे निसर्ग-चित्र आपण बघता आहात, ते जर एखाद्या चित्रकाराने अगदी हुबेहुब कॅनव्हासवर उतरवले, तर मी त्याला काय नाव देईन, माहिती आहे?- ‘मारवा’ “. थाट मारवा व त्यापासून तयार झालेले रागसुध्दा असेच आहेत, सध्या बाहेर दिसणा-या निसर्ग-चित्रासारखेच- उदास, कातर, आणि एकटेपणा अधिकच गडद करणारे !

‘पंडीतजी परत आपल्या बैठकीवर येउन बसले आणि म्हणाले, “कुठून सुरुवात करु?” ओ.के. आधी असे करु या, थाट मारव्याची थोडी शास्त्रीय माहिती घेऊ या आणि त्यानंतर त्यावर आधारीत रागांचा थोडक्यात परिचय करुन घेऊ या.

थाट मारव्याचे स्वरुप असे आहे –

सा, को.रे, ग, ती.म, प, ध, नि

आणि त्यापासून निर्माण झालेला राग मारवा असा आहे,

आरोह-सा, को.रे, ग, ती.म, ध, नि, सा !
अवरोह- सा!, नि, ध, ती.म, ग, को.रे, सा
वादी-को.रे. संवादी-धैवत
गान समय- संधिकाल

राग मारव्यासारखेच आरोह व अवरोह असलेले आणि थाट मारव्यापासूनच तयार झालेले आणखी दोन राग आहेत, ते म्हणजे राग पुरिया आणि राग सोहोनी. ही एक गंमतच आहे. ह्या तीनही रागांचे आरोह व अवरोह अगदी सारखे आहेत परंतु त्यांचे चलन किंवा सादरीकरणाची पध्दत वेगवेगळी असल्यामुळे ते एकमेकांपासून भिन्न आहेत. म्हणजे असे बघा, समजा दोन भाऊ आहेत, जुळे असलेले, दिसायला अगदी सारखे, परंतु दोघांचीही चालण्याची व बोलण्याची पध्दत एकमेकांहून जरा निराळी. तसेच काहीसे. परंतु असे असले तरीही, हे तीनही राग ऐकणा-यांच्या मनात ‘उदास व कातर’ मूडच ‘क्रिएट’ करतात. ह्या रागांवर आधारीत काही सिनेगीतांच्या चाली बघा, मी काय म्हणतो आहे ते अधिक स्पष्ट होइल’. पंडीतजींची बोटे हार्मोनियमवरुन फिरु लागली.

‘हे बघा, सुमन कल्याणपूर ह्यांनी गायलेले ‘शब्द-शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी’ हे भावगीत. ‘दुख: नको तुटताना, अश्रू नको वळताना, मी मिटता लोचन हे, उमलशील तू उरी’ असे म्हणणा-या प्रेयसीच्या, दीर्घकाळ सात्त्वि सुगंध देणा-या बकुळपुष्पासारख्या भावना, राग मारव्याच्याच सुरांनी अगदी अलवारपणे जपल्या आहेत. किंवा ‘स्वर-गंगेच्या काठावरती, वचन दिले तू मला, गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला’ हे प्रेयसीला गतजन्मीच्या अधु-या प्रेमाची ओळख पटवून देणारे गीत ऐका. ह्या गीतातील जन्म-जन्मांतरीची ओढ राग मारव्याच्या सुरांनीच जागविली आहे.

तसेच लतादीदीने गायलेले एक नॉन-फिल्मी गीत आहे; बरेच वर्षांपूर्वी विविधभारतीवर लागायचे, ते म्हणजे “सांज भयी, घर आ जा रे पिया..”. अतिशय भावगर्भ आणि सुंदर असलेली आणि राग मारव्यात असलेली ह्या गीताची चाल, राग मारव्याचे सगळे अंतरंगच आपल्याला उलगडून दाखविते. ह्या गीतातील एक ओळ बघा किती सुंदर लिहीली आहे, प्रेयसी म्हणते- “कापते पलकों पे असुवन के, जलते दीप बुझा जा रे, सांज भयी घर आ जा रे”. माझ्या मते तर ह्या ओळी लिहिल्या जात असतानाच राग मारव्याच्या सुरांनी त्यात घर केले असावे.

रामदास कामत ह्यांनी गायलेले ‘हे करुणाकरा, ईश्वरा, कृपादान मज दे’ हे ‘धन्य ते गायनी कळा’ ह्या नाटकातील, परमेश्वराची आर्त आळवणी करणारे नाटयगीतसुध्दा राग मारव्यातच स्वरबध्द करण्यात आले आहे. पंडीतजींनी ह्या सर्व गीतांची धुन आम्हाला वाजवून दाखविली.

मग पंडीतजींनी राग सोहोनीचे सूर छेडले. ते म्हणाले, ‘राग सोहोनी सुध्दा राग मारव्यासारखाच व मारव्याइतकाच विरहार्त प्रकृतीचा राग आहे. ‘एकली मी दीपकळी, मी अभागिनी’ ह्या प्रसिध्द नाटयगीतातील ‘दीपकळी’च्या एकलेपणाची वेदना राग सोहोनीचे सूरच आपल्यापर्यंत पोहचवतात. तिच्या एकलेपणात तिला साथ करायला फक्त राग सोहोनीचेच सूर असावेत, अशी माझी एक कवि-कल्पना आहे. पंडितजींची काव्यात्म वृत्ती मनापासून दाद देण्यासारखीच होती.

पंडितजींनी आपल्या संगीत निरुपणात राग सोहोनी संबंधी पुढे आणखी माहिती दिली. ते म्हणाले, ‘राग सोहोनीच्या सुरांमधे गुंफलेली आणखी एक स्वर-रचना म्हणजे स्व. मुकेश ह्यांनी गायलेले; ‘झुमती चली हवा, याद आ गया कोई, बुझती बुझती आगको, फिर जला गया कोई’ हे ‘संगीत सम्राट तानसेन’ ह्या चित्रपटातील प्रसिध्द गीत! मुकेशजींच्या मुलायम आवाजाने ह्या गीतातील भावांना एक आगळाच हळुवारपणा प्रदान केला आहे.

तसेच ‘कटयार काळजात घुसली’ मधील ‘सुरत पियाकी न छीन बिसराये’ ह्या स्व. वसंतराव देशपांडे ह्यांनी गायलेल्या, बहारदार नाटयगीताचा मुखडा राग सोहोनीमधेच बांधण्यात आला आहे.

” मित्रहो, आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या राग मारवा आणि राग सोहोनीतील सर्व गीतांच्या शब्दरचनेत आपल्याला एक साम्य आढळेल, ते म्हणजे ती सर्व विरहाची, एकटेपणाची भावना व्यक्त करणारी गीते आहेत आणि ही गोष्ट राग मारवा व राग सोहोनीचे राग-वैशिष्टयच अधोरेखीत करते, हे आपण कृपया लक्षात घ्यावे.” – पंडीतजींचे विश्लेषण खरोखरच मार्मिक होते.

चहापानाच्या एका ब्रेकनंतर आमचा सांगितिक प्रवास परत सुरु झाला.

“मंडळी, थाट मारव्यापासूनच तयार झालेला आणखी एक अतिशय लोकप्रिय व नितांतसुंदर राग म्हणजे राग ललत! ह्या रागातील एक प्रसिध्द नाटयगीत म्हणजे ‘संगीत मृच्छकटीक’ ह्या नाटकातील ‘सखे, शशिवदने’ हे गीत. पं. जितेंद्र अभिषेकी ह्यांनी अगदी जीव ओतून गायलेल्या ह्या गीतात, शब्दांचे आर्जव आणि राग ललतच्या सुरांचे मार्दव, ह्यांचा अजोड संगम झाला आहे”.

राग ललतच्या स्वर-सौंदर्याने नटलेली आणखी एक रचना म्हणजे ‘लीडर’ ह्या चित्रपटातील, ‘एक शहनशहाने, बनवाके हँसी ताजमहल, सारी दुनियाको मोहोब्बतकी निशानी दी है’ हे सिनेगीत. ही चाल अतिशय लोकप्रिय होण्यात राग ललतच्या सुरांचा खूप मोठा वाटा आहे, असे मी मानतो. तसेच ‘कोई पास आया, सवेरे सवेरे, मुझे आजमाया, सवेरे सवेरे’ ही जगजीतसिंग ह्यांनी गायलेली प्रसिध्द गझलसुध्दा राग ललतच्याच सुरांचा एक सुंदर अविष्कार आहे. ‘कटी रात सारी, मेरी मयकदे में, खुदा याद आया, सवेरे सवेरे’ हे जणू जीवनाचेच तत्वज्ञान सांगणा-या शब्दांना चाल द्यायला, संगीतकाराला राग ललतच्या सुरांपेक्षा अधिक समर्पक सूर सापडले नसते.

मंडळी, एक गोष्ट आपल्या लक्षात आली का ? ती म्हणजे, राग ललत ह्या एकाच रागात विविध भाव व्यक्त करणा-या संगीतरचना स्वरबध्द केल्या गेल्या आहेत, हे त्या रागाचे व पर्यायाने शास्त्रीय संगीताचे ख-या अर्थाने शक्तीस्थान आहे.

थाट मारव्यापासून तयार झालेल्या आणखी एका रागाचा येथे उल्लेख केल्याशिवाय थाट मारव्याचे विवेचन पूर्ण होऊ शकत नाही, आणि तो राग म्हणजे राग पुरिया कल्याण ! गंमत अशी की हा राग, जरी राग पुरिया आणि राग कल्याण ह्यांच्या संयोगाने तयार झाला असला, तरीही शास्त्रीय संगीताच्या नियमानुसार त्याचा समावेश थाट मारव्याच्या अंतर्गत केला जातो. भारतीय सिने-संगीतकारांनी ह्या रागाचा अतिशय लालित्यपूर्ण पध्दतीने उपयोग करुन अनेक गीतांना अगदी अवीट गोडीच्या चाली दिल्या आहेत. ह्या रागात बांधल्या गेलेल्या काही चाली बघा. पंडीतजींनी आम्हाला एकेक चाल वाजवून व म्हणून दाखवायला सुरुवात केली. ‘हे बघा, लता दीदीने गायलेली प्रसिध्द लावणी, “राजसा, जवळी जरा बसा, जीव हा पिसा, तुम्हाविण बाई”. ह्या लावणीतील शृंगाररस राग पुरिया कल्याणच्या सुरांनीच बहरला आहे. ह्याशिवाय आशाताईने गायलेले आणि श्रीधर फडके ह्यांनी स्वरबध्द केलेले ‘सांज ये गोकुळी, सावळी सावळी, सावळयाची जणू सावली’ हे सुधीर मोघे ह्यांचे गीत. ‘माऊली सांज, अंधार पान्हा, विश्व सारे जणु होय कान्हा’ असे सावळयाचे सृष्टीशी असलेले अद्वैत सांगणारे हे गीत देखील राग पुरिया कल्याणच्याच सुरांनी नटलेले आहे. ह्या गीतातील ‘मंद वा-यावरी, वाहते बासरी, अमृताच्या जणू ओंजळी’ ह्या ओळी ऐकताना तर माझ्या अंगावर अक्षरश: ‘अमृतमय’ रोमांच उभे राहतात.

ह्याच रागावर आधारीत लतादीदीने गायलेले एक सिनेगीत आहे, ‘दस्तक’ ह्या चित्रपटातील, ते म्हणजे- ‘बंधन टूटे ना सावरीया, श्याम करे पिया, तेरी उमरमे, लग जाये मेरी भी उमरीया’. स्व. मदनमोहन ह्यांनी राग पुरिया कल्याणच्या सुरांना घेऊन, ह्या गीताला दिलेली चाल इतकी सुंदर व मन मोहून टाकणारी आहे, की तिचे वर्णन करायला सारी विशेषणे थिटी पडावीत. ह्या गीतातील प्रेमासारखीच ती चाल सुध्दा अमर आहे’, पंडीतजी अतिशय ओघवत्या शैलीत निवेदन करीत होते.

‘थाट मारवाच्याच जातकुळीतील आणखी एक प्रचलित राग म्हणजे राग भटीयार. बराचसा धीरगंभीर प्रकृती असलेला हा राग आहे. ‘अर्थशून्य भासे मज हा, कलह जीवनाचा’ ह्या आशालता वाबगावकर ह्यांनी गायलेल्या प्रसिध्द नाटयगीतातील ‘मत्स्यगंधेच्या व्यथेला’ बोलके करणारे सुर, राग भटीयारचेच!

टी.व्ही. वर बरेचदा ‘राष्ट्रीय साक्षरता मिशन’ चा ‘प्रोमो’ लागतो. तो आपण ऐकला आहे का ? त्यातील कविता कृष्णमूर्ती ह्यांनी गायलेले ‘पूरबसे सूर्य उगा, फैला उजियारा, जागी हर दिशा दिशा, जागा जग सारा’ हे बॅकग्राऊंडला वाजणारे गीत त्यात आहे. अतिशय अर्थवाही असलेली ही चाल राग भटीयारवरच आधारलेली आहे.

रसिकहो, थाट मारव्याचेच अपत्य असलेला आणखी एक राग, जो काहीसा अनवट आहे, तो म्हणजे राग विभास. एक अतिशय सुंदर व सुप्रसिध्द असलेले सिनेगीत, ज्याचे शब्द आणि चाल खूप भावुक व नाजुक आहेत, राग विभास मधे रचण्यात आले आहे. ते सिनेगीत म्हणजे ‘उत्सव’ चित्रपटातील ‘सांज ढले, गगन तले, हम कितने एकाकी, छोड चले नैनोंको, किरनों के पाखी’ हे सुरेश वाडकर ह्यांनी गायलेले गीत. वसंतसेनेच्या आठवणीने मन जडभर झालेल्या चारुदत्ताच्या भावावस्थेचे ह्या गीतात किती यथार्थ वर्णन आहे, नाही का?’

“मंडळी, मला वाटते आपण आतापर्यंत केलेल्या चर्चेतून आपणास थाट मारवा व त्यावर आधारीत रागांविषयी हवी असलेली बरीचशी माहिती मिळाली असावी. आता थांबूयात का ?”

पंडीतजींनी केलेल्या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानले. शेवटी पंडीतजींनी राग मारव्यामधील एक हृदयस्पर्शी स्वर-रचना सादर करुन मैफिलीची सांगता केली, आणि आजची संध्याकाळ ख-या अर्थाने अविस्मरणीय केली.

अच्छा तर मंडळी, परत लवकरच भेटू या, आता आपला निरोप घेतो. बाय!

– जयंत खानझोडे