कृष्णमूर्ती ज्योतिष


पत्रिकेच्या स्थानांविषयी…

आपली जन्मपत्रिका म्हणजे नेमकं काय असतं? ती कशी तयार केली जाते वगैरे या गोष्टींचा उल्लेख मी माझ्या मागच्या एका लेखात केलेला आहेच, पण, एकदा पत्रिका तयार झाल्यानंतर भविष्य कथनासाठी नेमका कुठल्या गोष्टींचा विचार केला जातो?, हा ही प्रश्न तुमच्या मनात आला असेलच. तसं बघितलं तर ब-याच गोष्टींचा विचार केला जातो. जसं प्रत्येक स्थान, ग्रह आणि कृष्णमूर्ती पध्दतीने सांगायचे झाल्यास उपनक्षत्रस्वामीचा विचार करावा लागतो. पण ह्या सगळयात मूलभूत गोष्ट म्हणजे, पत्रिकेतील ‘स्थानं’, यालाच ‘भाव’ असं देखील म्हणतात.

प्रत्येक पत्रिकेत असे एकूण १२ भाव म्हणजे स्थानं असतात. आपलं आकाश हे ३६० अंश आहे. प्रत्येक भाव हा ३० अंशाचा असतो आणि असे १२ भाव असतात. यापैकी प्रत्येक स्थान हे माणसाच्या आयुष्यातील कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी ठरवून दिलेले आहे. आता तुम्ही म्हणाल, की माणसाचं सगळं आयुष्य हे या १२ भावांभावेती आहे का? माणसाच्या आयुष्याची कितीतरी अंगं असतात, त्या सगळया गोष्टींचा बोध ह्या १२ भावांवरून होतो का? तर याचं उत्तर ‘हो’ असंच आहे. माणसाच्या जीवनात कितीही वेगवेगळया गोष्टी असल्या तरी त्या सर्व गोष्टी ह्या या १२ भावांमध्येच आहेत. प्रत्येक भाव हा अनेक वेगवेगळया गोष्टींचे द्योतक असतो. माणसाचा प्रश्न हा ज्या भावाशी निगडित असतो, तो भाव ज्योतिषाला अभ्यासावा लागतो. आता तुम्ही म्हणाल की, हे तर सगळं सोपं दिसतंय. प्रश्नाच्या अनुषंगाने जो भाव असेल तो अभ्यासला की झालं. पण असं मुळीच नसतं. प्रत्येक भाव हा जरी त्या त्या गोष्टीसाठी बघायचा असला तरी त्याच्या अनुषंगाने येणा-या इतर भावांचा विचार हा देखील करावाच लागतो, त्याशिवाय फलातील अचूकता येत नाही. आता वानगीदाखल काही उदाहरणे घेऊ. म्हणजे लगेच लक्षात येईल.

समजा एखाद्या व्यक्तीचा प्रश्न आहे की, मी नोकरी करेन की धंदा करेन, नोकरी धंद्यासाठी दहाव्या स्थानाचा विचार करावा लागतो. तसेच सहावे स्थान हे नोकर, नोकरीसाठी मानतात. तर सप्तम स्थान हे व्यवसाय/धंद्यासाठी मानतात. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता दशम स्थानाचा संबंध हा सहाव्या स्थानाशी आहे, की सप्तम म्हणजे सातव्या स्थानाशी आहे, याचा विचार करावा लागेल. सहाव्या स्थानाशी असेल तर नोकरी व सातव्या स्थानाशी असेल तर धंदा/व्यवसाय. पण समजा हा संबंध दोन्हीही स्थानांशी असेल तर काय? तर, त्यावेळेस कुठल्या स्थानाशी अधिक संबंध आहे, हे अभ्यासावे लागेल. व मगच उत्तर द्यावे लागेल. त्यात पुन्हा इतर ब-याच गोष्टी असतात. जसं काही व्यक्ती ह्या नोकरीबरोबरच जोड धंदा करत असतात. तर काही व्यक्तींनी पूर्वायुष्यात नोकरी केलेली असते व नंतर जोडधंदा करत असतात. अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यात पुन्हा कुठल्या वेळेस कुठली गोष्ट होईल, याचा विचार करण्यासाठी ‘महादशा अंतर्दशा’ याचा विचार करावा लागतो. पण त्याविषयी आपण पुढच्या लेखात बघू.

आणखी एक रूची वाटेल असे उदाहरण घेऊयात. आपण बरेच वेळेला बघतो की बरेचसे लोक स्वेच्छानिवृत्ती (व्ही.आर्.एस्.) घेतात. त्यासंदर्भात पत्रिकेत बघायचं झाल्यास नोकरी जाणे ह्या गोष्टीसाठी नवव्या स्थानाचा विचार करावा लागेलच. पण त्याचबरोबर धन स्थानाचा सुध्दा विचार करावाच लागेल. कारण ‘नोकरी जाणे’ व त्या बदल्यात एक मोठी रक्कम मिळणे या दोन्ही गोष्टी स्वेच्छानिवृत्तीत अपेक्षित असतात. तेव्हा ते दोन्ही योग बघावे लागतील. काही वेळेला काही व्यक्ती ह्या नोकरी बदलतात तेव्हा दोन घटना घडतात. एक म्हणजे ‘पहिली नोकरी जाणे’ व ‘नवीन नोकरी मिळणे’. तेव्हा यासाठी तिस-या व दहाव्या स्थानाचा विचार करावा लागतो. परत त्यात नवीन नोकरी ही पूर्वीच्या नोकरीपेक्षा चांगली असेल किंवा नसेल ह्या इतर गोष्टी आल्याच. बरेच वेळेला काही लोकांचा प्रश्न असतो की मी माझे ऋण म्हणजे कर्ज कधी फेडेन, किंवा मला एखादे ‘लोन’ मिळेल का? एखादे लोन मिळणे म्हणजे काय होतं? लोन देणा-या माणसाकडून पैसे जातात व लोन घेणा-या माणसाला ते मिळतात. पण परत फेडण्याच्या अटीवर. तर अशा वेळेस पत्रिकेत बघायचं झाल्यास, लोन देणा-या माणसाचं व्यय स्थान म्हणजे, म्हणजे पत्रिकेतील सहावं स्थान व लोन घेणा-या माणसाचं धन स्थान, किंवा लाभ स्थान यांचा विचार करावा लागेल. या गोष्टी जुळत असतील तरच ही शक्यता प्रत्यक्षात येते. नाहीतर लोन हे मिळणारच नाही. कारण समोरच्याव्यक्तीनी दिलंच नाही तर एखाद्याला मिळणार कसं? त्यात परत पुन्हा लोन सहज मिळेल की ब-याच खटपटी कराव्या लागतील, हे सगळं बघावंच लागेल. कर्ज फेडण्यासाठी बरोबर याच्या उलट गोष्टींचा विचार करावा लागेल. तसंच माणसाला आयुष्यामध्ये ज्या विविध गोष्टींचे लाभ होतात, जसं एखादं नवीन घर घेणे, लग्न होणे, संतती होणे वगैरे वगैरे या सर्व गोष्टींसाठी ‘लाभ’ स्थानाचा विचार करावाच लागतो. अन्यथा एखादी गोष्ट मिळून सुध्दा त्या गोष्टीचा आनंद ती व्यक्ती घेऊ शकत नाही. किंवा त्या गोष्टीचा आनंद मिळत नाही. म्हणून ‘कृष्णमूर्ती ज्योतिष’ पध्दतीत लाभ स्थानाला खूपच महत्त्व आहे.

‘कृष्णमूर्ती ज्योतिष’ पध्दतीत विरोधी भावांना देखील महत्त्व आहे. ‘विरोधी भाव’ म्हणजे एखाद्या घटनेच्या विरूध्द किंवा विरोधात फल देणारे भाव. म्हणजे, सहावं स्थान हे सातव्या स्थानाच्या विरोधात फल देतं, नववं स्थान हे दशम किंवा दहाव्या स्थानाच्या विरोधात फल देतं वगैरे वगैर. तात्पर्य हे की एखादा कालावधी हा जर एखाद्या घटनेच्या विरोधी भावांशी संबंधित असेल तर ती घटना होऊ देत नाही. आणि त्यात अनेक अडचणी येतात. लग्नासंबंधी बोलायचं झाल्यास एखादा कालावधी हा सातव्या स्थानांशी निगडित असेल पण त्याचबरोबर सातव्या स्थानांच्या विरोधात फल देणा-या सहाव्या स्थानाशी जास्त संबंधित असेल तर लग्न सहजपणे जमणार नाही. किंवा त्यात अडथळे उत्पन्न होतील. तसेच विवाहाचे सुख त्या प्रमाणात मिळणार नाही. नोकरीच्या बाबतीतही तसंच. जर एखादा कालावधी हा नोकरी धंद्याच्या विरोधी स्थानांशी म्हणजे नवव्या स्थानांशी संबंधित असेल, तर नोकरीच्या विरोधात फलं मिळतील. म्हणजे नोकरी जाणे, चांगली नोकरी न मिळणे, वगैरे, वगैर. स्थावर मालमत्ता खरेदी किंवा शिक्षणाच्या बाबतीतही तसंच. जो कालावधी चवथ्या स्थानाच्या विरोधी भावांशी म्हणजे, तिस-या स्थानाशी निगडित असतो, त्यावेळेस स्थावर मालमत्ता घेण्यात किंवा शिक्षण घेण्यात अडथळे निर्माण होतात.

आणखी एक मुद्दा इथे मांडावासा वाटतो तो म्हणजे, परदेशगमनाचा किंवा एखाद्या दूरवरच्या ठिकाणी होणा-या प्रवासाचा. एखाद्या व्यक्तीचं परदेशगमन किंवा एखाद्या दूरवरच्या ठिकाणचा प्रवास कधी होईल हे बघताना प्रवासाची जी स्थाने आहेत ती बघावीच लागतात. पण बरेच वेळेला प्रश्न असतो की एखादी व्यक्ती परत मायदेशी कधी येईल? यासाठी त्या पत्रिकेचे कुटुंबस्थान चतुर्थ स्थान ह्या दोन्ही स्थानांचा विचार करावा लागतो. कारण ती व्यक्ती जिथून म्हणजे ज्या देशातून निघाली, तिथेच परत येणार असते. आणखी एक गमतीशी उदाहरण म्हणजे आपण बरेच वेळेला बघतो की काही व्यक्तींची कार्यालये ही त्यांच्या घरापासून खूपच लांब असतात. तर काहींची कार्यालये ही अगदी घराजवळंच असतात. या बाबतीत पत्रिकेत बघायचं झाल्यास, दहावं स्थान जे नोकरी धंद्याचं स्थान आहे त्याचा संबंध जर प्रवासाच्या स्थानांशी असेल तर उदहरणार्थ, नववं किंवा बारावं स्थान तर त्या व्यक्तीचं कार्यालय किंवा कामाची जागा ही दूरवर असते. म्हणजेच्या त्या व्यक्तीला रोज लांबवर ये-जा करावी लागते. ती व्यक्ती तेवढा ‘प्रवास’ करते. ह्याच्या उलट जर दहाव्या स्थानाचा संबंध हा चतुर्थ स्थानाशी असल्यास त्या व्यक्तीचं कार्यालय किंवा कामाची जागा ही घरापासून जवळ असते. हा संबंध अधिक घनिष्ठ असल्यास त्या व्यक्तीचं घर हेच त्याचं कार्यालय असतं. किंवा घरातच कार्यालय असतं. काही वेळेला काही व्यक्ती हरवतात. किंवा स्वत: घर सोडून निघून जातात. त्या परत येतील का? ह्या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकुंडलीत बघताना देखील पत्रिकेतील स्थानांना महत्त्व आहे. हरवलेली व्यक्ती परत येण्यासाठी प्रश्नकुंडलीतील लाभस्थानाचा संबंध हा त्या हरवलेल्या व्यक्तीच्या स्थानांशी असावा लागतो. म्हणजे समजा प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीचा भाऊ, वडील, किंवा इतर कोणी नातेवाईक हरवला असेल तर हरवलेली व्यक्ती परत येण्यासाठी प्रश्नकुंडलीतील लाभस्थानांचा संबंध हा त्या त्या स्थानाशी असावा लागतो. म्हणजे, प्रश्नकर्त्या व्यक्तीचा भाऊ हरवला असेल तर भावंडाच्या स्थानाशी असावा लागतो. म्हणजे प्रश्नकर्त्या व्यक्तीचा भाऊ हरवला असेल तर भावंडाच्या स्थानाशी, वडील हरवले असतील तर वडिलांच्या स्थानाशी असावा लागतो. काही वेळेला एका स्थानाचा दुसऱ्या स्थानाशी संबंध असून चालत नाही तर दुसऱ्या स्थानाचाही पहिल्या स्थानाशी संबंध आवश्यक असतो. समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीसाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ हवे असेल आणि ते मिळेल का? असा प्रश्न असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर बघताना प्रश्नकुंडलीत तृतीय स्थानाचा लाभ स्थानाशी संबंध असेल तर उत्तर ‘हो’ येईल. म्हणजे, ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळेल. असं उत्तर येईल. पण जर का लाभ स्थानाचा संबंध तृतीय स्थानाशी नसेल तर अपेक्षित फल मिळत नाही. म्हणजे काय? तर प्रमाणपत्र मिळेल पण उद्देश साध्य होणार नाही. म्हणजेच अपेक्षापूर्ती किंवा इच्छापूर्ती होणार नाही. त्यामुळे काही वेळेला कुठल्या स्थानाचा कुठल्या स्थानाशी संबंध आहे हे देखील महत्त्वाचे ठरते.

ह्या सगळयावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की, तर्कशुध्द विचारसरणी म्हणजे ‘लॉजिकल थिंकिंग’ला ज्योतिषशास्त्रात किती महत्त्व आहे ते. पत्रिकेच्या कुठल्याही स्थानाचा एकांगी विचार करून चालत नाही. तर सगळया स्थानांचा एकमेकांशी असलेला संबंध हा विचारात घ्यावाच लागतो. नियम जरी तेच असले तरीसुध्दा प्रत्येक पत्रिकांची गणितं ही वेगवेगळीच असतात.

Astrologer अभय गोडसे,
http://www.abhaygodse.com