कृष्णमूर्ती ज्योतिष


ऋणानुबंधाच्या गाठी…

Lagnagath Jyotishजन्मपत्रिकेच्या आधारे व्यक्तीचे भविष्य वर्तवणे याचबरोबर विवाहाच्या वेळेस वधू-वरांच्या पत्रिका जुळतात का, हे बघणे हा ज्योतिषशास्त्राचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. ह्यामध्ये पत्रिकांचे गुणमेलन करणे व त्याचबरोबर दोन्ही पत्रिकांच्या इतर बाबी तपासणे ह्या दोन महत्त्वाच्या गोष्ट आहेत. पण यापैकी बरेच वेळा फक्त गुणमेलनालाच जास्त महत्त्व देऊन इतर बाबी विचारात घेतल्या जात नाहीत. 36 पैकी किती गुण जुळतात?, किंवा मंगळ आहे का?, असल्यास तो चालेल का?, किंवा मंगळ सौम्य आहे की तीव्र आहे?, हे आणि एवढेच प्रश्न विचारले जातात. आणि एवढयावरच पत्रिका जुळते का नाही, हा निर्णय घेतला जातो. कित्येक पालकांनी विशेषत: मुलीच्या स्वत:कडे एक कोष्टक ठेवलेले असते. व फोनवरच चौकशी करून पत्रिका जुळते कस नाही हे ठरवले जाते…

वास्तविक पाहतो, हे एवढेच पुरेसे नाही. गुणमेलनापेक्षाही इतर महत्त्वाच्या बाबी म्हणजे मुलाला किंवा मुलीला संसारसुख आहे का?, घटस्फोट होण्याची शक्यता नाही ना?, संतती होईल का?, या व अशा इतर सर्व बाबींचे विश्लेषण आवश्यक आहे. ह्यासाठी ज्योतिष व पालक ह्या दोघांच्याही बाजूने सहकार्य अपेक्षित आहे. ज्योतिषाने मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेचे सविस्तर विवरण देणे व पालकांनी त्यासाठी आग्रह धरणे ह्या दोन्हीही बाबी अपेक्षित आहेत. सर्व मुद्दे (possitive it negative) पालकांसमोर ठेवल्यानंतर त्यांना आपोंआपच निर्णय घेणे सोपे जाईल. उदाहरणार्थ, समजा एखाद्या मुलाला नोकरी करणारी मुलगी हवी आहे, मुलगीही नोकरी करण्यासाठी तयार आहे, अशा वेळेस जर मुलीच्या पत्रिकेत नोकरीचा फारसा बरा योग नसेल किंवा काही इतर कारणांमुळे तिच्या हातून नोकरी होणार नसेल किंवा कमी पगाराचीच नोकरी मिळणार असेल, तर तशी स्पष्ट कल्पना पालकांना जर आधी दिली, तर त्यांचा त्यांनाच निर्णय घेणे सोपे जाईल. इतर अनेक बाबी विचारात घेणे गरजेचे आहे. जसे, ह्या दोघांचा स्वभाव एकमेकांशी जुळण्यासारखा आहे का?, संसारसुख कसे आहे?, इत्यादि. इथेही, परत सर्व बाबींचे सविस्तर विवरण देण्यासाठी ‘कृष्णमूर्ती पध्दती’ ही आवश्यकच आहे.

कित्येक वेळेला केवळ मुलाचे स्टेटस् बघून लग्न केले जाते. ‘पत्रिका’ हा विषय बाजूला ठेवला जातो. ‘हातचे स्थळ जाऊ नये’- ला जास्त महत्त्व दिले जाते. पण एक साधा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की, ‘मुलगा किंवा मुलगी’ यांना नुसतं बघून, किंवा त्यांच्याशी बोलून (by mere observation), आपल्याला त्यांचे भावी आयुष्य व त्यात होणा-या घटना, याची साधी कल्पनाही येत नाही, येऊ शकत नाही; ह्याच्यासाठी ज्योतिष आवश्यक आहे. पत्रिका जुळविण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची घाई करू नये. मुलीच्या पालकांनी देखील मुलाची पत्रिका संकोच न करता मागून घ्यावी, व आपल्या ज्योतिषाला दाखवावी. जे काही मुद्दे असतील ते स्पष्टपणे, जसेच्या तसे ज्योतिषाने पालकांसमोर मांडावे व पालकांनीही ‘आपल्याला हे सगळे मुद्दे चालतील का?’ याचा विचार करावा.

ह्या सगळया गोष्टी विचारात घेऊन पत्रिका दाखविल्या आणि जुळविल्या, तरच पत्रिका जुळवणे ह्या शब्दांना खरा अर्थ येईल व अनर्थ टळेल.

Astrologer अभय गोडसे,
http://www.abhaygodse.com