अमोल पालेकर – चित्रा पालेकर यांचा घटस्पोट झालाय, किशोर कुमारची संपूर्ण आयुष्यात चार लग्न झाली. लता मंगेशकर यांचं लग्नच झालेल नाही. तुम्ही म्हणाल, हे सगळं तुम्ही आम्हाला कशाला सांगताय? याचा संबंध काय? आहे, संबंध आहे. तुम्ही जर ज्योतिषशास्त्राविषयी थोड फार ऐकलं किंवा वाचलं असेल तर तुम्हाला हे नक्कीच माहिती असेल की कला या शब्दाचा संबंध शुक्राशी आहे. थोडक्यात, शुक्र हा कलेचा कारक ग्रह आहे. त्याचप्रमाणे, शुक्र हा स्त्री, लग्न, विवाहसौख्य इ. गोष्टींचा देखील कारक ग्रह आहे. तसेच सर्व प्रकारची भौतिकसुखं चैनीच्या वस्तु इ. गोष्टींचा कारक ग्रह शुक्रच आहे. जेव्हा एखाद्या माणसात आपण एखादी कला बघतो तेव्हा त्याच्या पत्रिकेत शुक्र ग्रह चांगला असतो. जो त्याला उपजत कलागुण देतो, त्यात नैपुण्य मिळवून देतो. पण, त्याचवेळेला शुक्राच्या अंमलाखाली येणाऱ्या इतर बाबतीत, म्हणजे, लग्न, विवाहसौख्य या बाबतीत एक प्रकारची प्रचंड ‘उणीव’ निर्माण करून ठेवतो, विवाहसौख्य मिळू देत नाही. तुम्ही म्हणाल, हे असं कसं? सांगतो, निसर्गाचा सगळयात मोठ्ठा नियम आहे तो म्हणजे ‘समतोल’ राखणे. जिथे ‘क्रिया’ आहे तिथे ‘प्रतिक्रिया’ देखील असतेच. एखाद्या ठिकाणी मातीचा डोंगर दिसल्यास नक्की समजावं की कुठेतरी खड्डा झालेला आहे. उन्हाळयात वाळलेल्या झाडांना परत पावसाळयात पालवी फुटते, उन्हाळा आणि पावसाळा ही दोन्ही निसर्गाचीच रुपं. एका हातानी निसर्ग देतो तेव्हा दुसऱ्या हातानी काहीतरी काढून देखील घेतो. ‘कुछ पाने के लिए, कुछ खोना पडता है’ हा देखील निसर्ग नियमच आहे. त्यामुळे त्याला ग्रह तारे तरी अपवाद कसे असणार? पत्रिका बघतं असताना काही वेळेला असं देखील पहायला मिळतं की एखाद्या मुलीला नोकरीत भरपूर यश देणारा ग्रहचं तिला सासुकडून त्रास दाखवत असतो. एखादा ग्रह जेव्हा एखाद्या बाबतीत चांगली फळं देतो तेव्हा त्याच्याच अंमलाखाली येणाऱ्या इतर काही बाबतीत काही ‘उणीव’ निर्माण करतो. शुक्राच्याही बाबतीत अगदी असच आहे. तुम्ही जर कलेच्या प्रांतात कार्यरत असलेल्या लोकांच्या आयुष्यावर नजर टाकलीत तर तुमच्या लगेच लक्षात येईल की त्यांच्या वैवाहिक सुखात प्रचंड कमतरता आढळते.
घटस्फोट, नवरा-बायकोचं अजिबात न पटणं, विवाहबाह्य संबंध, लग्न न करताच एकत्र राहणे, एखाद्या स्त्रीने विवाहित पुरूषाबरोबर लग्न करणे, असे असंख्य प्रकार कलावंतांच्या आयुष्यात थैमान घालत असतात. आत्ताचं एक ताजं उदाहरण म्हणजे लग्नानंतर 12-13 वर्षांनी झालेला अमीर खानचा घटस्फोट! अशी असंख्य उदाहरणं आहेत. नुसती नावं घ्यायचं म्हटलं तरी आख्खं पान भरेल. तुम्ही म्हणाल हे फक्त नट नटयांच्या बाबतीत अढळते का? मुळीच नाही, नृत्य, गायन, चित्रकला अशा विविध कलेच्या क्षेत्रातील दिग्गजांची नावं आठवून बघा आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर नजर टाका, तिथेही हाच प्रकार आढळेल. हे देखील फक्त नावाजलेल्या कलाकारांच्या बाबतीत आढळतं, असंही नाही. फारशा प्रसिध्दीस न आलेल्या कलाकारांच्या बाबतीत देखील हे होतच असतं फक्त ते कलाकार प्रसिध्द नसल्यामुळे, त्यांच्या बाबतीत आपल्याला माहिती होत नाही एवढच! माझ्या घटस्फोट घेणाऱ्या कलावंत मित्राला मी एकदा गमतीनं म्हटलं की, तुझे जितके जास्त घटस्फोट होतील तितका तु मोठा कलावंत होशील!
‘शुक्र’ हा सौंदर्याची आवड, मुक्त विचारसरणी, छान-छौकी ऐष करणे इ. गोष्टीही दर्शवितो. त्यामुळे, कलाकार हा कधी साचेबंद आयुष्य जगताना किंवा धोपट मार्गाने जाताना आढळत नाही. चित्र-विचित्र फॅशन्स करणे, त्यात सतत बदल करणे, त्याचप्रमाणे, अत्यंत बेताल वागणे, वेळ-कालाचे भान सोडून वागणे, ह्या सगळया गोष्टी जणु काही त्यांच्या अंगी बाणलेल्याच असतात. शुक्रतारा हा ज्याप्रमाणे संध्याकाळी उगवतो तसा ह्या कलाकारांचा दिनक्रम हा संध्याकाळी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी पहाटे संपतो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ह्या सगळयामुळेच की काय, बरेचसे कलाकार हे ‘विक्षिप्त’ ह्या विभागात मोडले जातात.
शुक्र हा मादक पेयांचा देखील कारक असल्याने व्यसनं नसलेला कलाकार विरळाचं! अतिमद्यसेवनामुळे नाटकाचे प्रयोग रद्द झाल्याची उदाहरणं पूर्वीच्या काळी ढिगांनी आढळतील. आता, स्पर्धेचं युग असल्यामुळे यात बराच फरक पडलाय. शुक्र हा दिखाऊपणा देखील दर्शवतो. त्यामुळे चित्रपटात हिरोची कामं करणारा नट हा प्रत्यक्ष जीवनात व्हिलन असु शकतो. किंवा चित्रपटात व्हिलनची कामं करणारा नट हा प्रत्यक्षात चांगला असु शकतो. दिखाऊपणा करण्यामध्ये खोटी स्तुती करणे वगैरे गोष्टी ओघाने आल्याच. शुक्र हा पैसा व श्रीमंतीचा देखील कारक, त्यामुळे, चित्रपटसृष्टी हा झटपट पैसे मिळवण्याचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. इथे रोडपतीचे करोडपती झाल्याची उदाहरणे देखील बरीच आढळतात. शुक्र हा मोहात पाडणारा ग्रह आहे, त्यामुळे चित्रपटसृष्टी#नाटयसृष्टी विषयी सामान्य माणसाच्या मनात प्रचंड आकर्षण असतं. हे सगळं फार सोप्प आहे, अशी एक धारणा असते पण प्रत्यक्षात मात्र दुरून डोंगर साजरे असतात. कारण यासाठी वेळी अवेळी जेवण, आड-निड दौरे, राजकारण, परफॉर्मन्स, रिटेक्स, यांसारख्या अनेक गोष्टींतून जावे लागते.
शुक्र हा तसा उच्छृंखल, त्यामुळे बहुतांशी कलाकार हे अत्यंत बेफिकीर, परिणामांची पर्वा न करणारे, प्रचंड मनस्वी, तितकेच हळवे, उडावु वृत्तीचे, उथळ असे असतात. अर्थातच बुध्दीजीवी कलावंत, निर्व्यसनी कलावंत, असे काही अपवाद आहेत. पण फारच थोडे!
ज्याप्रमाणे शुक्राच्या बाबतीतला हा आयुष्यातला समतोल आहे, त्याचप्रमाणे थोडयाफार प्रमाणात तो इतरही ग्रहांच्या बाबतीत दिसुन येतो पण तो तितका फारसा जाणवण्याइतपत किंवा इतका तीव्र नसतो, म्हणून तो लगेच नजरेत भरत नाही, एवढंच. कलावंताच्या बाबतीतल्या वर उल्लिखेल्या गोष्टी तुम्हाला या आधी देखील माहित असतीलच पण ते तसं का असतं याच उत्तर कदाचीत मिळालं नसेल. कलेचा सप्तरंगी अविष्कार हा प्रत्येकाला माहीत असतोच पण, ज्योतिशास्त्राच्या माध्यमातून उलगडलेला हा असा कलेचा आठवा रंग.
Astrologer अभय गोडसे,
http://www.abhaygodse.com